विशेष लेख : वृक्ष लागवड संमेलन एक अनोखं पाऊल

साहित्य संमेलन, नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून साहित्याचा, माय मराठीचा जागर होत असतांना आता महाराष्ट्रात आणखी एक अनोखं पाऊल पडत आहे ते “ वृक्ष लागवड संमेलना”च्या माध्यमातून.

राज्यातील हरित क्षेत्र वाढावं, त्यातून प्रदूषणमुक्ती आणि पर्यावरण संरक्षणाची पाऊलं अधिक गतिमान व्हावीत, समाजातील सर्व लोकांनी हातात हात घालून या कामास पुढे न्यावे, यासाठी विचारमंथन घडून यावे आणि प्रत्येकाचा या कामातील सहभाग वाढावा यासाठी प्रोत्साहित करणारा विचार या संमेलनाच्या माध्यमातून पुढे जाईल. संमेलनात राज्यातील ५० कोटी वृक्ष लागवड, नदी स्वच्छता आणि नद्यांचे पुनरुज्जीवन या विषयावर चर्चा होणार असून राज्य तसेच देशातील नामवंत व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. आपल्या सहभागातून या कार्यक्रमाला पुढे नेण्याची शपथ घेणार आहेत.

जागतिक उष्णतेत सतत होणारी वाढ, हवामान व ऋतू बदल, वारंवार पडणारे दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, कोरड्या आणि प्रदूषित होत असलेला नद्यां, भूगर्भातील कमी होणारी पाण्याची पातळी आणि जैवसृष्टीस निर्माण झालेला धोका यांची तीव्रता आणि दाहकता कमी करावयाची असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याशिवाय पर्याय नाही, हे जागतिक स्तरावर मान्य झाले आहे.

पर्यावरण संतुलन आणि जैवसृष्टीची स्थिरता राखण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या भौगोलिक क्षेत्राच्या कमीत कमी 33 टक्के क्षेत्र वन आणि वृक्षांच्या छायेखाली असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन जवळपास 20 टक्के आहे. ते क्षेत्र 33 टक्क्यापर्यंत नेणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय मेहनतपूर्वक आणि प्रामाणिकपणे गेल्या अडीच वर्षात सतत ध्यास घेत राज्यातील वनक्षेत्र 33 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी ते नाविन्यपूर्ण संकल्पना देखील राबवित आहेत. याची सुरुवात 1 जुलै, 2016 रोजी 2 कोटी वृक्षारोपणाच्या उद्दिष्टातून झाली. एका दिवसात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प होता परंतु प्रचंड लोकसहभागातून राज्यात एकाच दिवशी 2.83 कोटी वृक्ष लागवड झाली.

हरित महाराष्ट्रासाठी साद घातली तर लोक किती मोठा प्रतिसाद देतात हे यातून लक्षात आले. या कार्यक्रमात सातत्य ठेवलं तर राज्याचं वनाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यात लोक नक्कीच योगदान देतील असा विश्वास या पहिल्या कार्यक्रमातून मिळाला आणि त्यातून पुढील तीन वर्षांची ५० कोटी वृक्ष लागवडीची वाटचाल निश्चित झाली.

वृक्षारोपणाची गती तुटू न देता त्यामध्ये सातत्य रहावे म्हणून सन 2017 पासून 3 वर्षाकरिता 50 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले. त्यानुसार सन 2017 मध्ये 4 कोटी, सन 2018 मध्ये 13 कोटी आणि सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. सन 2017 मध्ये 4 कोटी उद्दिष्ट असताना विविध प्रशासकीय विभाग आणि लोकसहभाग यांच्या उत्तम प्रतिसादामुळे प्रत्यक्षात 5.43 कोटी वृक्ष लागवड झाली.

वृक्षारोपणाच्या पुढील 2 वर्षातील 46 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांना अधिक प्रभावीपणे सामावून घेण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी सर्व संबंधित घटकांबरोबर सातत्याने विचारविनिमय करण्यात येत असून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

सद्गुरु जग्गी वासुदेव, संस्थापक, ईशा फाऊंडेशन यांनी तामिळनाडूमधील वन आणि वृक्षाच्छादन वाढावे, म्हणून सन 2006 पासून ईशा फांऊडेशनमार्फत वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यास लोकसहभागाची जोड देऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. महाराष्ट्रात देखील ईशा फाऊंडेशनशी संबंधित अनेक लोक आणि स्वंयसेवक जोडले गेले आहेत. त्यांचा सहभाग घेऊन महाराष्ट्रातील वन आणि वनेतर जमीनीबरोबर नदीच्या दोन्ही काठांनी वृक्ष लागवड करण्याची मोहिम हाती घेण्यात येत आहे.

नद्यांच्या काठांवर माणूस स्थिरावला त्यातून मानवी संस्कृती विकसित झाली, बहरली. पण आज नद्यांना प्रदुषणाचा विळखा पडला आहे. नद्यांचे शुध्दीकरण, स्वच्छतीकरण आणि पुनरुज्जीवन करण्याचा व्यापक कार्यक्रम ईशा फाऊंडेशने “रॅली फॉर रिव्हर ” या योजनेखाली हाती घेतला आहे. या कार्यक्रमासंदर्भात जनजागृती व्हावी म्हणून मोठी मोहीम ईशा फांऊडेशनमार्फत दि. 1 सप्टेंबर, 2017 पासून हाती घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ दि. 1 जुलै, 2017 रोजी नवी मुंबई येथे झाला. सद्गुरु जग्गी वासूदेव या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी “रॅली फॉर रिव्हर ” या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील नद्यांच्या दोन्ही काठांवर ईशा फांऊडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहभागातून वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राजभवनात होत असलेले पहिलंवहिलं “वृक्ष लागवड संमेलन” नक्कीच या क्षेत्रातलं उल्लेखनीय पाऊल ठरणार आहे. मा. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, श्रीमती शायना एन.सी, भारतरत्न सचिन तेंडूलकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह राज्यातील नामवंत उद्योगपती, चित्रपटक्षेत्रातील मान्यवर, मुद्रित, द्रृकश्राव्य तसेच समाज माध्यमात काम करणाऱ्या प्रमुख व्यक्ती, बँक क्षेत्रातील पदाधिकारी, जीवन विमा कंपनी आणि इतर वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, नागरी विमान सेवाक्षेत्रातील अधिकारी, इंडियन मर्चट चेंबर ॲण्ड कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, शासनाच्या विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांचे समाजामध्ये खुप आदराचे स्थान आहे. त्यांनी दिलेले संदेश आणि विचार याचा समाजाकडून सन्मान केला जातो, त्यांचे विचार स्वीकारले जातात, हे लक्षात घेऊन हे सर्व मान्यवर जर राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी वृक्ष लागवड आणि नदी स्वच्छता आणि नदी पुनरुज्जीवनाचा विचार लोकांसमोर मांडला, त्यासंबंधीचे आवाहन केले तर हे दोन्ही कार्यक्रम वेगाने पुढे जाण्यास मदत होणार आहे.

संमेलनात ईशा फाऊंडेशनचे स्वंयसेवक “साऊंडस ऑफ ईशा” हा कार्यक्रम सादर करतील त्यानंतर उपस्थित मान्यवर वृक्षारोपण कार्यक्रम आणि “रॅली फॉर रिव्हर” या विषयावर एकत्रितपणे काम करण्याचे प्रतिक म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात मानवी भिंत तयार करतील. वाळूचा वापर करून कलात्मकतने संकल्पनेचे सादरीकरण करणारे कलावंत वनमहोत्सव आणि रॅली फॉर रिव्हर या विषयावर आपली कलाकृती सादर करतील. कार्यक्रमात वृक्ष लागवड आणि रॅली फॉर रिव्हर या दोन विषयाच्याअनुषंगाने उपस्थित मान्यवर शपथ ही घेणार आहेत.

संमेलनात सहभागी होणाऱ्या मान्यवरांच्या योगदानातून आणि लोकांच्या सहभागातून हरित महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छतेच्या प्रयत्नांना नक्कीच बळ मिळेल यात शंका नाही.

डॉ. सुरेखा म. मुळे

वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget