अनोख्या संवादयात्रेतून उलगडले मुख्यमंत्र्यांचे अंतरंग!

जगभरातील विद्यार्थ्यांशी सिंगापूरमधील कार्यक्रमात संवाद

मुंबई ( २८ सप्टेंबर ) : स्थळ-सिंगापूर येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलचा परिसर... निमित्त-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जगभरातील विद्यार्थ्यांशी संवादाचे... जगातील एका महत्त्वपूर्ण राज्याच्या आश्वासक तरुण नेत्यासोबतची ही संवादयात्रा उत्तरोत्तर फुलत गेली... वैयक्तिक आवडीनिवडी-छंदापासून ते जागतिक शांततेपर्यंतच्या विषयांवर रंगलेली ही सफर या नेत्याचे अंतरंग अनायसेच उलगडत गेली... आणि एकूणच या कार्यक्रमाने एक वेगळी उंची गाठली!

ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेचे सात देशांमध्ये सुमारे 20 कॅम्पस आहेत. सिंगापूरमधील या शाळेचा परिसर आज वेगळ्याच उत्साहाने गजबजला होता. या परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. औपचारिक प्रास्ताविकानंतर मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांसोबतचे प्रश्नोत्तराचे सत्र सुरू झाले.

पहिलाच प्रश्न विचारला टोकियोच्या विद्यार्थ्याने. स्वामी विवेकानंद यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव आहे आणि त्यांचा संदेश तुम्ही कशा अर्थाने पाहता? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘स्वामी विवेकानंदांनी एक गोष्ट अतिशय चांगली सांगितली. साऱ्या नद्या जर शेवटी एकाच समुद्रात जाऊन मिळणार असतील तर संघर्ष का? जगात संघर्ष का आढळून येतात? आज जगाला शांतता हवी आहे. समुद्र हे सत्याचे प्रतिक आहे. प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रभक्ती असतेच. पण, त्याला कृतीची जोड असणे अतिशय आवश्यक आहे. जातिभेद, भूक, गरिबी याविरूद्ध संघर्ष करण्याची प्रत्येकाची तयारी असणे आवश्यक आहे.’

सरकारला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत आपण घेतलेले कोणते दोन निर्णय महत्त्वाचे वाटतात आणि का असा प्रश्न अबुधाबीच्या विद्यार्थ्याने विचारला. या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासह शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय मला अत्याधिक महत्त्वाचा वाटतो. हा प्रश्न आपल्या आईला कोणता मुलगा चांगला वाटतो असे विचारण्यासारखे होईल. पण, आपण विचारताच म्हणून सांगतो. दुसरा निर्णय सरकारला सामान्य जनतेप्रती

उत्तरदायी करण्यासाठी सेवा हमी प्रदान करण्याचा निर्णय मला अधिक भावतो. जनतेला त्यांच्या कामांसाठी सरकारकडे यावे लागू नये, तर तो त्यांना हक्क स्वरूपात प्राप्त व्हावा, हीच त्यामागची भावना होती. बंगलोरचा विद्यार्थी म्हणाला, चांगले निर्णय घेण्यासाठी तुम्ही ओळखले जाता. चांगले निर्णय घेणारे नेतृत्व कसे तयार होते, याचा मंत्र सांगाल का? त्यावर मुख्यमंत्री उत्तरले, ‘अनेक लोक भीतीपोटी निर्णय घेत नाहीत. पण निर्णय घेतले पाहिजेत. निर्णयच न घेणे हा खरंतर गुन्हा आहे. जोखीम असली तरी पुढे गेले पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले मन ज्या निर्णयाला साद देते, तो निर्णय घेतलाच पाहिजे.’

अनेक विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक प्रश्नही यावेळी विचारले. तुमचे छंद कोणते आणि तुम्हाला कशात रस आहे, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तितकेच मोकळेपणाने उत्तर दिले. गेल्या तीन वर्षांत सिनेमागृहात जाऊन एकही सिनेमा पाहता आला नाही, अशी खंत व्यक्त करतानाच प्रवासातच जे काही सिनेमे पाहता येतात, तेवढाच छंद जोपासला जातो, असेही त्यांनी सांगितले. राजकारणात येण्याच्या प्रवासापासून ते इतरही अनेक प्रश्नांना यावेळी त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. तुम्ही आपल्या मुलीला अत्यंत व्यस्त व्यापातून वेळ देऊ शकता का, या क्वालालम्पूरच्या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांचे भावूक होणेही उपस्थितांनी अनुभवले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget