मुसळधार पावसातही... पुस्तकांच्या गावात रंगले ‘विंदाचे स्मरण!’

पुस्तकांचं गाव, भिलार ( १६ सप्टेंबर ) : गंभीर परिसंवाद, बहारदार कविसंमेलन आणि दर्जेदार अभिवाचन अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून, आज पुस्तकांच्या गावी (भिलार येथे) मुसळधार पावसातही ‘स्मरण विंदांचे’ हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम जणू विंदा करंदीकरांच्या साहित्याचे एकदिवसीय संमेलन होते. या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या अरुणाताई ढेरे आणि स्वागताध्यक्ष होते समस्त भिलारवासी.

‘स्मरण विंदांचे’ या पुस्तकांच्या गावी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन विंदांच्या कन्या जयश्री काळे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन सत्रात बाळासाहेब भिलारे यांनी भिलारवासीयांच्या वतीने सर्व उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. अरुणा ढेरे यांनी कार्यक्रमामागची भूमिका मांडली. जयश्रीताईंनी विंदांच्या आठवणी उलगडून सांगितल्या आणि शासनाच्या माध्यमातून हे समर्पक ‘विंदा-स्मरण’ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. जयश्रीताईंनी नुकतेच प्रकाशित झालेले विंदांचे बालकविता संग्रह पुस्तकांच्या गावाला सस्नेह भेट दिले. विंदांच्या ‘दातृत्व’ भावाबद्दल विशेष विशेष आठवणी त्यांनी सांगितल्या. उद्घाटन सत्रात राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दृक्श्राव्य संदेशाद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि विंदांना अभिवादन केले. तसेच विंदा करंदीकर यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणाऱ्या चित्रफीतीही या प्रसंगी दाखवण्यात आल्या. यावेळी भिलारच्या सरपंच सौ. वंदना भिलारे उपस्थित होत्या.

कविवर्य विंदांच्या वैश्विक भानाचा परामर्श परिसंवादाच्या माध्यमातून ज्येष्ठ अभ्यासकांनी घेतला. सांगलीचे डॉ. अविनाश सप्रे, कोल्हापूरचे डॉ. रणधीर शिंदे, बेळगावच्या डॉ. शोभा नाईक आणि पुण्याच्या डॉ. वंदना बोकील यांनी विंदांच्या कवितेच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंवर आपले सधन विचार उपस्थितांसमोर मांडले.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कवींनी आपल्या काव्यप्रतिभेचे उत्तम सादरीकरण केले. प्रदीप निफाडकर, वृषाली किन्हाळकर, उषा परब, संगीता बर्वे, पवन नालट, ऐश्वर्य पाटेकर, आबा पाटील, श्रीधर नांदेडकर, इत्यादी कवींनी उपस्थितांची मनं जिंकली. कविसंमेलनात सर्व श्रोत्यांना विंदांचे सार्थ स्मरण झाले. बहुतत्ववादी, नित्यनूतनेचा शोध घेणारे विंदा, विश्वभान साधणारी प्रतिभा असणारे विंदा, विज्ञानानिष्ठ विंदा अशा अनेक प्रकारे विंदा रसिकांना उलगडले. शेवटच्या सत्रात अभिराम भडकमकर, सौरभ गोखले, अतुल आगलावे आणि प्रमिती नरके यांनी अभिवाचनातून विंदा करंदीकर यांचे स्मरण साधले. या कार्यक्रमात सातारा व पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि भिलार परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget