ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन

मुंबई ( २५ सप्टेंबर ) : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. 

प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रविवारी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच आज पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.

समाजव्यवस्थेवरचा प्रभावी भाष्यकार गमावला : मुख्यमंत्री


ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाने आपल्या साहित्यातून समकालिन राजकीय-सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवून मराठी साहित्याला वास्तववादी वळण देणारा लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या साधू यांनी अनेक सामाजिक प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी केली. विशेषत: महानगरी जीवनातील व्यथा त्यांनी अचूकपणे मांडल्या. त्यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्या तर वाचकांच्या कायम स्मरणात राहतील. मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांनी पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला. त्यासोबतच पत्रकारांच्या नव्या पिढ्या घडविल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा गौरव प्राप्त झालेल्या साधू यांचे व्यापक लिखाण पत्रकारिता आणि साहित्य विश्वात येऊ पाहणाऱ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यासंगी पत्रकार आणि लेखकासोबतच पत्रकार घडविणारा प्राध्यापक आपण गमावला आहे.


परखड,व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो.. 
-सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे

पत्रकारिता, साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एका परखड, व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. ‘सिंहासन’, ‘झिपऱ्या’, ‘मुंबई दिनांक’ अशा एकाहून एक सरस कलाकृतींनी मराठी साहित्यविश्वात पत्रकार अरुण साधू यांनी स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले होते. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि चतुरस्त्र प्रतिभेच्या अरुण साधू यांनी मराठीत कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका, नाटक आणि ललित लेखन या विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून विपुल लेखन केले. त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या विविधांगी स्वरुपाच्या लिखाणाने साधू यांनी पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला होता. गेली 40 वर्ष सातत्याने समकालाचा वेध घेणारं लेखन अरुण साधू यांनी केले होते, त्यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली आहे, असेही तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.


साहित्य,पत्रकारितेमधील उत्तुंग व्यक्तिमत्त्व गमावले -संभाजी पाटील-निलंगेकर

साहित्य आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांवर आगळीवेगळी मोहोर उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांच्या निधनाने साहित्य,पत्रकारिता क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व गमावले
आहे, अशा शब्दात कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

शोकसंदेशात पाटील- निलंगेकर म्हणतात, पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा अरुण साधू यांनी उमटवला. ते पत्रकार असल्याने जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास लोकांना समजेल अशा अत्यंत साध्या-सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यात साधू यांचे मोलाचे योगदान आहे. 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलेल्या साधू यांनी कथा-कादंबऱ्यांबरोबरच नाटक, ललित लेखन आणि समकालीन इतिहास जगासमोर मांडला. त्यांनी लिहिलेल्या ‘सिंहासन’, ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांवर आलेले चित्रपटही प्रचंड लोकप्रिय ठरले. 30 हून अधिक वर्षे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या साधू यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, असेही शेवटी पाटील- निलंगेकर यांनी म्हटले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget