‘प्रेरणा’ सभांमधून होताहेत ‘डिजिटल शाळा’

चार जिल्ह्यातील जि.प. शाळा झाल्या डिजिटल

मुंबई ( २६ सप्टेंबर ) : ‘डिजिटल इंडिया’ बरोबरच राज्याने सुद्धा ‘डिजिटल महाराष्ट्र’ कडे वाटचाल सुरु केली असून सध्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरात सुरु असलेल्या ‘प्रेरणा सभां’मधून शाळांना सुद्धा
‘डिजिटल’ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातूनच धुळे, गोंदिया, हिंगोली, ठाणे या चार जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आता डिजिटल शाळा झाल्या आहेत. ग्रामस्थ आणि शिक्षकांनी एकत्र येऊन घेतलेल्या प्रेरणा सभांचे हे फलित मानले जात आहे.

राज्यात सध्या जिल्हा परिषदांच्या शाळांचे डिजिटलायझेशन सुरु आहे, त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे हर्षल विभांडिक यांनी... मुळच्या धुळ्याचे असलेल्या हर्षल विभांडिकांनी न्यूयॉर्क येथे काही काळ नोकरी केली. मात्र, आपल्या मायभूमीत काहीतरी करण्याची इच्छा त्यांची होती. या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला आणि मग या उपक्रमात आपणही सहभागी होऊन महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती करावी, असे त्यांना वाटू लागले. आपण ज्या जिल्ह्यात शिकलो त्या शाळेतल्या मुलांना सुध्दा चांगले शिक्षण मिळावे यासाठी आपण आपला सहभाग द्यावा, याच प्रेरणेतून 2015 मध्ये विभांडिक यांनी गावागावात जाऊन डिजिटल शाळेचा प्रसार- प्रचार सुरु केला. तिथूनच सुरु झाला डिजिटल शाळांचा
प्रवास... हर्षल विभांडिक यांनी स्वतःच्या धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल शाळा निवडल्या, यासाठी त्यांनी धुळयात 198 प्रेरणा सभा घेतल्या. या सभेतून शिक्षक, गावकरी यांनी डिजिटल शाळा यासाठी प्रेरित केले आणि त्यातूनच 7 कोटी रुपये जमा झाले. आतापर्यंत त्यांनी 22 जिल्हयांमध्ये 36 प्रेरणा सभा घेतल्या आहेत.

काय आहे डिजिटल शाळा ...

डिजिटल शाळा संकल्पनेविषयी विभांडिक सांगतात, गावातील शिक्षकांपासून ते गावातील लोकांना डिजिटल शाळेचे महत्त्व प्रेरणा सभेच्या माध्यमातून पटवून दिले. प्रेरणा सभेत मी लोकांना आणि विद्यार्थ्यांना डिजीटल माध्यमाचे महत्व, शाळा डिजिटल होण्याचे फायदे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगू लागलो. सोबतच डिजीटल शाळा म्हणजे काय, याचे प्रात्यक्षिकही दाखवू लागलो. डिजीटल वर्ग बनवण्यासाठी गावकऱ्यांकडून देणगी अगदी पाच रुपयांपासूनही देण्याचे आवाहन केले. आणि विशेष म्हणजे मला सर्व गावकरी आनंदाने आणि सढळ हस्ते मदत करु लागले.

आज दोनच वर्षात आतापर्यंत राज्यातील 67 हजार जिल्हा परिषद शाळांपैकी 58 हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत, तर आतापर्यंत धुळे, गोंदिया, हिंगोली, ठाणे या चार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल शाळा झाल्या आहेत. डिजिटल शाळा केल्याने मुलांचा सर्वांगीण विकासास हातभार लागत असून
मुलांचा हसत-खेळत अभ्यास होत आहे. या प्रणालीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उपस्थितीतसुद्धा फरक पडला आहे. गावातील इंग्रजी माध्यमातील शाळेचे विद्यार्थी आता जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेत प्रवेश घेत आहेत.

गावागावात होत आहे डिजिटल क्रांती

गावं डिजिटल करण्यापेक्षा शाळा डिजिटल करण्यावर भर देण्यात येत आहे. शाळेत शिकणाऱ्या विदयार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण देणेही गरजेचे आहे. डिजिटल प्रकारच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची कौशल्ये
वाढण्यास मदत होत असून पुस्तकातील धडे त्यांना थेट पडद्यावर चित्रे, चित्रफितींच्या माध्यमातून दिसत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत यायचे प्रमाण वाढण्याबरोबरच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादही वाढायला मदत होत आहे.

प्रेरणा सभेतून शिक्षणाचे प्रबोधन

मुळातच एखादा प्रकल्प, योजना किंवा उपक्रम ग्रामपातळीवर राबवायचा असेल आणि यशस्वी करायचा असेल तर तेथील स्थानिक लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचमुळे जेव्हा गावोगावी जाऊन डिजिटल शाळांविषयी प्रबोधन करण्यात येऊ लागले. शाळा डिजिटल करण्यासाठी लोकसहभाग किती आवश्यक आहे याबाबत प्रेरणा सभांमध्ये बोलले जाऊ लागले. प्रेरणा सभेतच डिजिटल शाळांसाठी लोकवर्गणी मागायला सुरुवात करण्यात आली. 5 रुपयांपासून ते कित्येक हजारांमध्ये वर्गणी जमवली जाऊ लागली. 70 टक्के लोकवर्गणी आणि 30 टक्के हर्षल विभांडिक यांनी त्या त्या शाळेसाठीचा खर्च असे आखून घेतले
आणि मग गावोगावी डिजिटल क्लासरूम उभे करण्याची मोहीम सुरु झाली.

डिजिटल शाळा करुन काम संपणार नाही, तर या डिजिटल शाळा सौरशाळा करण्याचे उदि्दष्ट ठरविण्यात आले आहेत. येत्या डिसेंबर 2017 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. गेल्याच महिन्यात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जिल्हा परिषदेची शाळा पहिली सौरशाळा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन अलिकडे डिजिटल शाळा, प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक अभियानासारख्या उपक्रमांनी बदलवून टाकला असून या शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा मुलांसाठी ‘ब्रेन गेन’ ठरत आहेत, हे निश्चित…
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget