महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये एक झाड - एक विद्यार्थी संकल्पना राबविणार- राज्यपाल

मुंबई (१७ सप्टेंबर ) : तामिळनाडूमध्ये एक विद्यार्थी-एक झाडं ही योजना विद्यापीठांमधून राबविली जात आहे. याचधर्तीवर महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्येही ही संकल्पना राबविली जाईल आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी नदी संवर्धन आणि वृक्ष लागवडीच्या कामात सहभाग घेतील, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

आज राजभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या “वृक्ष लागवड संमेलनात” ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वन विभागाचे राज्यमंत्री राजे अंब्रीश राव अत्राम, भारतरत्न खासदार सचिन तेंडूलकर, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु जग्गी वासुदेव, आमदार मंगलप्रभात लोढा, जेष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान, तनुजा मुखर्जी, अभिनेता विवेक ओबेरॉय, श्रीमती शायना एन.सी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज आपला भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या चौपट आहे. महाराष्ट्रातील जवळपास 65 टक्के लोकसंख्या ही तरुण वर्गात मोडणारी असून या तरुणाईने पुढे येत नदी संवर्धन आणि वृक्ष लागवड हे आपले मिशन म्हणून काम केले तर आपण आपले उदिदष्ट साध्य करु शकतो असे सांगून राज्यपालांनी आपणमहाराष्ट्र आणि तामीळनाडू येथील विदयापीठांचा कुलपती असल्याने येथील विद्यापीठांनी नदी संवर्धन आणि वृक्ष लागवड याबाबत भर दयावा तसेच यासंबंधीचा कृती आराखडा तयार करावा अशा सूचना आपण दिल्या असल्याचे सांगितले.

जल-वन आणि नदी संवर्धनाचा विचार शासन गावागावातून लोकांपर्यंत पोहोचवेल – मुख्यमंत्री
सदगुरुंनी मांडलेला जल, वन आणि नदी संवर्धनाचा विचार शासन गावागावातून लोकांपर्यंत पोहोचवेल असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण आणि आपली पुढची पिढी सुखी आणि संपन्न जीवन जगावी यासाठी नदी जगली पाहिजे हे एक चांगले मिशन सद्गुरुंनी आपल्याला दिले आहे. सदगुरुंचे हे मिशन आता शासन आपलं मिशन म्हणून स्वीकारेल आणि त्यावर काम करील. जल, जमीन आणि जंगल याचे महत्व आपल्या पुर्वजांना अधिक होते त्यामुळे परंपरेमध्ये गुंफून त्यांनी ही संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचवली. परंतू आपण हे विसरलो, संस्कृती ही नित्य नवीन असते. ती करोडो वर्षे जुनी असली तरी जुन्या चांगल्या परंपरा काळाच्या प्रवाहातही टिकून राहातात या संस्कारांना पुन्हा लोकांसमोर ठेवण्याची गरज आहे. आपण निसर्गाकडून खुप काही घेतो. परंतू आपल्याला त्यागातून सेवन करता आले पाहिजे, तरच वसुंधरा आपल्याला आशीर्वाद देईल.

वन से नदीतक, नदीसे वनतक- सर्वजण मिळून सृष्टीचे पोषण करू- सुधीर मुनगंटीवार
‘वन से नदीतक और नदीसे वन तक’ या संकल्पनेवर काम करततांना सर्वांच्या सहभागातून सृष्टीचे पोषण करू या असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते म्हणाले की, वन आणि जल या विषयावर ईशा फाऊंडेशनसमवेत काम करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. महाराष्ट्राला या दोन क्षेत्रात देशातच नव्हे तर विश्वात पायोनिअर राज्य करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, जो आपल्या सर्वांना मिळून यशस्वी करावयाचा आहे. राज्यात येत्या 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले की या मिशनला सदगुरु जग्गी वासुदेव यांचा आर्शीवाद आहे. ते पुजापाठ सांगत नाहीत तर वृक्ष लावा, नदी वाचवा, वसुंधरा जगवा असा संदेश देतात. वन है तो जल है जल है तो कल है, हे लक्षात घेऊन ज्या वसुंधरेने जीवन दिले, ऑक्सीजन दिला तिचे ऋण झाड लावून फेडता येईल. नदीला आपण माता मानतो,जिणे संस्कृतीचे पोषण केले त्यावर अतिक्रमण करून आपण शोषण करत आहोत. हे आता थांबवायची वेळ आली आहे. म्हणूनच शासनाने नमामि चंद्रभागा, नमामि गोदावरी सारखे कार्यक्रम ईशा फाऊंडेशनच्या मदतीने हाती घेतले आहेत. पर्यावरण संरक्षण हे एकट्या शासनाचे काम नाही. ते आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे काम आहे. इथे अनेक मान्यवर उपस्थित आहे त्यांच्या एका संदेशाने लाखो तरूण या चळवळीशी जोडले जाऊ शकतात. वन विभागाच्या 1926 हॅलो फॉरेस्ट, हरित सेना उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी दिली. येत्या 1 जुलै 2018 रोजी मी वृक्ष लावणारच असा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन ही त्यांनी केले.

रॅली फॉर रिव्हर हा निसर्गाचा आवाज- पंकजा मुंडे
रॅली फॉर रिव्हर हा निसर्गाचा आवाज असून तो सर्वांनी ऐकण्याची गरज असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, सुत्रं हाती घेतली तेंव्हा शासनाला दुष्काळाचा सामना करावा लागला. परंतू या आव्हानांना विकासाची संधी मानून शासनाने पर्यावरण रक्षणाची अनेक काम हाती घेतली यामध्ये वृक्ष लागवड, जलयुक्त शिवार योजनेतील कामे, जलसंधारणी कामे यांचा समावेश आहे. ईशा फाऊंडेशनने रॅली फॉर रिव्हर च्या माध्यमातून एक सुंदर काम हाती घेतलं आहे,त्यात सहभागी होणे हा आनंदाचा भाग आहे. आपण वसुंधरेकडून जे घेतले ते परत देण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. या सर्व कामात लोकसहभाग महत्वाचा आहे,नदीकाठी वृक्ष लागवड करतांना फलोत्पादनातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने या कामाला प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत होणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही काठांवर तसेच जलयुक्त शिवार योजनेतील कामांवर मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वृक्ष लागवड आणि नदी संवर्धनाचे सर्वंकष धोरण आखावे- जग्गी वासुदेव
वृक्ष लागवड आणि नदी संवर्धन या विषयावर काम करतांना जल, मृदसंधारण आणि नदीत पाणी राहील, नद्या आटणार नाहीत याची काळजी घेणे खुप महत्वाचे असून यासाठी एक सर्वंकष धोरण आखण्याची गरज असल्याचे जग्गी वासुदेव यावेळी म्हणाले. त्यासाठी रॅली फॉर रिव्हर हा कार्यक्रम ईशा फाऊंडेशनमार्फत राबविण्यात येत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, ही संकल्पना 16 राज्यात राबविली जाणार आहे. यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या हरित चळवळ अभियानातून या उपक्रमात सहभागी होईल याची आपल्याला खात्री आहे.

झाडांचं आयुष्य तुमच्या आमच्यापेक्षा अधिक असतं. तुम्ही झाडं लावा ती तुमच्या पुढच्या पिढीलाही जगवतील असे सांगून ते पुढे म्हणाले की, जल, वन संवर्धनाबरोबर मृदू संवर्धनाकडे लक्ष देणे ही तितकेच महत्वाचे आहे. ईशा फाउंडेशन यासंदर्भातला सर्वंकष विचार घेऊन काम करत आहे. कारण हे राष्ट्रहिताचे काम आहे. मातीला जीवन देण्याची गरज आहे. तिच्यातील ऑर्गेनिक कंटेन्ट कमी होत चालला आहे. त्यामुळे भविष्यात भारतातील 60 टक्के जमीन कृषीसाठी अनुत्पादक ठरण्याची भीती आहे. शेत जमीन अनुत्पादक होणार असेल तर आपण जगणार कसे हा विचार करतांना क्रॉप बेस ॲग्रीकल्चर ते ट्री बेस ॲग्रीकल्चर संकल्पनेतून फलोत्पादनाखालचे क्षेत्र वाढवणे, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन वाढवणे ही कामं ही प्राधान्याने हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

वन वे ट्रॅफिक थांबावी- सचिन तेंडूलकर
आपण आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेतो पण आपण आपल्या पृथ्वीची तशी काळजी घेतो का याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज असल्याचे सांगून खा. सचिन तेंडूलकर म्हणाले की आपण निसर्गाकडून फक्त घेतच आलो आहोत, ही वन वे ट्रॅफिक आता थांबायला हवी, वन, जल आणि नदी संवर्धनातून वसुंधरेप्रती आपले कर्तव्य बजावण्याची वेळ आली आहे. आपल्या पुढच्या पिढीला सुंदर जीवन देण्यासाठी हे काम अतिशय महत्वाचं आहे. महाराष्ट्र शासनाने हे काम अतिशय चांगल्याप्रकारे हाती घेतलं आहे तरीही जल, वन आणि नदी संवर्धनाचा संदेश मोठ्याप्रमाणात लोकांपर्यंत जायला हवा.. राज्यात मराठवाड्यात वृक्षाच्छादन सर्वात कमी आहे. शासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन तिथे लक्ष केंद्रीत केले आहे. आपण दत्तक घेतलेल्या डोंजा गावात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून या सर्व कामात आपण सहभागी होऊ, कामास पाठिंबा देऊ असेही श्री. तेंडूलकर यावेळी म्हणाले.

कार्यक्रमात शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात तसेच नदी पुनरुज्जीवन विषयावर चित्रफित दाखवण्यात आली तर सॅण्ड आर्टद्वारे या विषयावरील महत्वही अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget