अर्भकमृत्यूच्या कारणमीमांसेसाठी नियुक्त तज्ज्ञांच्या समितीची पहिली बैठक संपन्न

मुंबई ( १२ सप्टेंबर ) : नाशिक येथील अर्भकमृत्यू व राज्यातील उपजत मृत्यूंचे कारणमिमांसा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीची पहिली बैठक आज आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नाशिकसह राज्यातील 12 विशेष नवजात उपचार कक्षाचे (एसएनसीयू) श्रेणीवर्धन करण्यात येणार असून, त्या माध्यमातून 230 अतिरिक्त खाटा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर सांगली, धुळे, यवतमाळ, कळवण, अहेरी, अचलपूर, धारणी अशा आठ ठिकाणी नव्याने विशेष नवजात उपचार कक्षांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नाशिकसह अमरावती, चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात नवजात अतिदक्षता केंद्र (एनआयसीयू) प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचे प्रस्तावित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

नाशिक येथील अर्भकमृत्यू तसेच राज्यात होणाऱ्या उपजत मृत्यूंची नेमकी कारणे समजून घेण्यासाठी बालरोग तज्ज्ञ, निओनॅटल तज्ज्ञ यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्याची आज बैठक झाली. यावेळी निओनॅटल तज्ज्ञ डॉ. बी. एस. अवस्थी, डॉ. एन. एस. काबरा, अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावर, केईएमच्या निओनॅटॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. रुची नानावटी तज्ज्ञ उपस्थित होते.

यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री यांनी सांगितले, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये येत्या 15 दिवसांत अतिरिक्त बेड वाढविण्यात येणार असून राज्यातील अन्य 12 ठिकाणच्या एसएनसीयूंचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. त्यामध्ये नाशिक एसएनसीयूमध्ये सध्या 20 बेड असून अतिरिक्त 28 खाटांची त्यात भर पडणार आहे. त्याचबरोबर अकोला येथे 48 बेड असून 20 खाटांची भर पडणार आहे. जळगाव येथे 20 बेड असून 28 खाटांची भर पडणार असून चंद्रपूर येथे 16 बेड असून त्यात 20 अतिरिक्त बेड वाढणार आहे. गोंदिया येथे 27 बेड असून 16 अतिरिक्त बेड वाढणार आहे. जालना येथे 16 बेड असून 27 अतिरिक्त बेड मिळणार आहे. गडचिरोली येथे 12 बेड असून 30 अतिरिक्त बेडची संख्या वाढणार आहे. ठाणे येथे 16 बेड असून त्यात अजून 16 बेड अतिरिक्त मिळणार आहे. अमरावती येथे ही संख्या 22 असून 12 अतिरिक्त बेडची भर पडणार आहे. जव्हार येथे 12 बेड असून 16 अतिरिक्त बेड मिळणार आहे. उस्मानाबाद येथे 16 बेड असून 12 बेडची तर बुलढाणा येथे 21 बेड असून श्रेणीवर्धन केल्यामुळे 12 बेडची वाढ होणार आहे. राज्यातील 36 एसएनसीयूमध्ये सध्या 660 बेड असून श्रेणीवर्धनामुळे 230 अतिरिक्त बेड वाढणार असल्याने ही संख्या 890 इतकी होणार आहे.

नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयात नवजात अतिदक्षता कक्ष (एनआयसीयू) उभारण्याचे प्रस्तावित असून याबरोबरच अमरावती आणि चंद्रपूर येथेही प्रायोगिक तत्त्वावर अशाप्रकारचे कक्ष उभारण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत तज्ज्ञांनी बालमृत्यू, कमी वजनाचे अर्भक, त्यांना होणारा जंतूसंसर्ग, प्रतिजैविकांचा (ॲन्टीबायोटीक्स) वापर यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील एसएनसीयूमध्ये सी पॅप (ऑक्सीजन देणारे यंत्र) बसविण्याबाबत समिती सदस्यांनी सूचविले असून नवजात अर्भकांना देण्यात येणाऱ्या प्रतिजैवकांच्या वापराबाबत प्रोटोकॉल तयार करण्यात यावा. त्याचबरोबर एसएनसीयू मधील कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी केईएम रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ विभागामार्फत नर्स तसेच डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

जंतूसंसर्ग कमी करण्यावर भर देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात यावे. आई व मुल यांच्यातील भावबंध लक्षात घेता मातांना एसएनसीयूमध्ये आवश्यक ती जंतूसंसर्ग प्रतिबंधक काळजी घेऊन प्रवेश द्यावा व त्यांच्याकडून बाळाची काळजी घेतली जावी. असा प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जात आहे, त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने राज्यातील काही ठिकाणच्या एसएनसीयूमध्ये असा प्रयोग केला जावा, असे समितीतील तज्ज्ञांनी यावेळी सूचविले. राज्यातील एसएनसीयूमध्ये सामाजिक उत्तरदायित्व म्हणून बालकांची तपासणी तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्यात बालरोग तज्ज्ञांचे पॅनल करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केले. त्याला संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. जोग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, संचालक डॉ. सतीश पवार, सह संचालक डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget