'स्वच्छता हीच सेवा' अंतर्गत महात्मा गांधी जयंतीदिनी अनेक कार्यक्रम

अनेक सोसायटी व झोपडपट्ट्यांमध्ये सुयोग्य कचरा व्यवस्थापन सुरु !

ज्या सोसायट्यांमध्ये झाली अंमलबजावणी, त्यांचे पालिका करणार कौतुक !

मुंबई ( २८ सप्टेंबर ) : बृहन्मुंबई महापालिकेशी संबंधित विविध कामांसाठी अनेक नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयांमध्ये यावे लागते. त्या तुलनेत महापालिकेचे अतिवरिष्ठ अधिकारी सोसायटींना भेटी देत आहेत, घरोघरी जात आहेत, असे चित्र तसे दुर्मिळच ! मात्र, येत्या गांधी जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोबरला आपल्याला हे वेगळे चित्र दिसणार आहे. या दिवशी महापालिका आयुक्तांपासून सहाय्यक आयुक्तांपर्यंत अनेक वरिष्ठ अधिकारी हे ज्या सोसायट्यांमध्ये किंवा झोपडपट्टी परिसरांमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु झाले आहेत; शिवाय काही सोसायट्यांमध्ये सोसायट्यांच्याच स्तरावर गांधी जयंतीच्या निमित्ताने कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची सुरुवात केली जाणार आहे, अशा गृहनिर्माण सोसायट्यांना सदिच्छा भेट देऊन प्रकल्पांची पाहणी केली जाणार आहे. तसेच या दौ-यादरम्यान संबंधितांचे प्रातिनिधिक स्वरुपात अभिनंदन देखील केले जाणार आहे. या पाहणी दौ-यात स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घेण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

ज्या मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये सुयोग्य कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने कचरा विभक्तीकरण, ओल्या कच-यापासून खत निर्मिती इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण बाबींची यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे, अशा निवडक सोसायट्यांना गांधी जयंती दिनी महापालिका आयुक्त अजोय मेहता हे स्वतः भेट देऊन अशा सोसायटींचे प्रातिनिधिक स्वरुपात अभिनंदन करणार आहेत. तसेच बृहन्मुंबई महापालिका क्षेत्र हे शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे या तीन भागात विभागलेले आहे. या तिन्ही भागांचे अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व सहाय्यक आयुक्त हे देखील आपापल्या क्षेत्रातील निवडक सोसायटींना याच दिवशी भेटी देऊन त्यांचे कौतुक करणार आहेत.

या शिवाय के पश्चिम विभागात जुहू परिसरातील सुमारे २५ ते ३० हजार लोकवस्तीच्या नेहरु नगर झोपडपट्टी परिसरात दररोज सुमारे १० टन कचरा तयार होतो. या कच-याच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी पालिकेच्या 'दत्तक वस्ती योजने' तील स्वयंसेवक हे गेले अनेक दिवस अविश्रांत परिश्रम घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे या परिसरातील ओल्या कच-यापासून खत निर्मिती करणारा प्रकल्प आता पूर्णत्वास गेला आहे. यामुळे या परिसरातील सुक्या कच-याचे विलगीकरण परिसरातच करण्यात येऊन तो पुनर्चक्रांकित करण्यासाठी (Recycling) पाठविला जात आहे. या सर्व बाबींमुळे तब्बल २५ ते ३० हजार लोकवस्तीच्या या झोपडपट्टीमध्ये शून्य कचरा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली आहे. या झोपडपट्टी परिसराला देखील महापालिका आयुक्त आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी भेट देऊन त्यांचे अभिनंदन करणार आहेत.

केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार महापालिका क्षेत्रातील ज्या गृहनिर्माण संकुल / व्यवसायिक आस्थापना ज्यांचे एकूण चटई क्षेत्र हे २० हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक आहे; किंवा ज्या संकुलांमधून दररोज १०० किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होत आहे; अशा संकुलांनी आपापल्या परिसरात निर्माण होणा-या ओल्या कच-याची विल्हेवाट संकुलातच करावयाच्या दृष्टीने प्रकल्प उभारणे व राबविणे, यासाठी २ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असल्याचे आदेश यापूर्वीच महापालिकेद्वारे संबंधित संकुलांना देण्यात आले आहेत. याबाबत देण्यात आलेल्या यापूर्वीच्या आदेशांनुसार महापालिका आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याच भूमिकेतून पालिकेने अनेक ठिकाणी कचरा विषयक प्रदर्शनांचे आयोजन केले. तर सर्व २४ विभागात कचरा व्यवस्थापन मदत कक्ष (Help Desk) देखील सुरु केले आहेत.

तथापि, २ ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीबाबत ज्या संकुलांनी महापालिकेकडे मुदतवाढीसाठी अर्ज केले आहेत, अशा संकुलांनी लेखी हमी दिल्यास त्यांना प्रकरणपरत्वे जास्तीतजास्त ३ महिन्यांची मुदतवाढ दिली जाणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget