कर्जमाफीच्या निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरु राहील - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना :

 पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा राज्यस्तरीय सोहळा संपन्न

· पहिल्या टप्प्यात साडे आठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 कोटी जमा

· राज्यस्तरीय सोहळ्यातून मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पालकमंत्र्यांशी संवाद

 · जलयुक्त शिवार योजनेतून 20 लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण

 · आजपासून राज्यभरात कापूस खरेदी केंद्र सुरु

· खरेदी केंद्रावर आधार क्रमांक आधारित नोंदणी करणार

मुंबई ( १८ ऑक्टोबर ) : कर्जमाफीच्या निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. योजनेच्या अंमलबजाणीच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. त्या माध्यमातून साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यात कर्जमाफीसाठीचे 4 लाख 62 हजार खातेदार असून प्रोत्साहनपर रक्कम योजनेचे 3 लाख 78 हजार खातेदार आहेत. या पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी 3200 कोटी तर प्रोत्साहनपर रक्कम योजनेसाठी 800 कोटी असे एकूण 4000 कोटी आज जमा करण्यात आले आहेत. 15 नोव्हेंबरपर्यंत 85 टक्के काम पूर्ण करण्यात येईल, असे
मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्याचा राज्यस्तरीय सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, मुख्य सचिव सुमित मल्लिक आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 8 विभागातील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय सोहळ्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी
बांधवांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. राज्यस्तरीय सोहळ्यातून मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पालकमंत्र्यांशी संवाद साधला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, आजचा दिवस हा महत्त्वाचा आणि कर्तव्यपूर्तीचा आहे. बळीराजावर आलेले संकट दूर करण्यासाठी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नैसर्गिक संकटामुळे शेतीचा विकास दर उणे होता. उत्पादन घटले होते, यावर मात करण्यासाठी सुरुवातीचे दोन वर्ष आम्ही शेतीत गुंतवणूक वाढविली. ही गुंतवणूक
जवळपास तीन पटीने वाढविण्यात आली. त्यामुळे आज ज्या भागात काही उगवत नव्हते, तेथे फळबागा लागवड झालेल्या आहेत. आता शेतीचा विकास दर 12.5 टक्क्यांवर गेला असून त्याचे उत्पादन 40 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. शेतीतील गुंतवणूक वाढल्यामुळे हे यश मिळू शकले. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून 20 लाख हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले असून शेतीच्या क्षेत्रात पुढील पाच वर्षे अशाच प्रकारे गुंतवणूक करत राहिलो तर उत्पादन दुप्पट होण्यास मदत होणार आहे. गेली अनेक वर्षे शेतकरी संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर होते. त्यांना पुन्हा सावकाराकडे जावे लागू नये, यासाठी अशा शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज रचनेत परत आणण्यात आले. कर्जमाफी करताना कर्जमुक्त शेतकरी या संकल्पनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज परत करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. यासाठी शेतीतील गुंतवणूक वाढविण्यावर आमचा भर आहे.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या कर्जमाफी संदर्भातील सुकाणू समितीचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या समितीने चांगल्या पद्धतीने हे काम करून शेतकऱ्यांशी चर्चा करीत त्यांच्या अडचणी दूर करुन कर्जमाफीसाठी प्रयत्न केले. वित्त, सहकार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्यातून कर्जमाफी अंमलबजावणी करणे शक्य झाले. कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांनाच मिळाली पाहिजे, यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक कोटी शेतकऱ्यांचे केवळ दीड महिन्यात रजिस्ट्रेशन करण्यात आले.

शुभारंभाच्या पहिल्या टप्प्यात साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून ही यादी बँकांना पाठविण्यात येणार आहे. कर्जमाफीची कार्यप्रणाली कशी असेल याबाबत सविस्तर सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेसाठी एक मुख्य खाते उघडण्यात आले असून प्रत्येक बँकेत एक खाते उघडण्यात आले आहे. कर्जमाफीची रक्कम मुख्य खात्यातून बँकांच्या खात्यांमध्ये जमा होईल. त्यानंतर बँकांकडे दिलेल्या यादीनुसार त्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी. पुढील चार दिवस दीपावलीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने सोमवारपासून नियमितपणे रक्कम जमा होईल. तसा संदेश बँकांकडून शेतकऱ्यांना पाठविण्यात येईल. शेतकऱ्यांनी काळजी करु नये, असा दिलासाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

ज्या शेतकरी बांधवांनी प्रतिकूल परिस्थितीतही कर्ज परतफेड करीत रक्कम जमा केली त्यांना प्रोत्साहनपर रक्कम आणि प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीत 4 लाख 62 हजार खातेदार शेतकरी कर्जमाफीचे असून तीन लाख 78 हजार खातेदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम जमा केली आहे.

15 नोव्हेंबरपर्यंत 85 टक्के काम पूर्ण करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत त्या दूर करण्यासाठी शेतकरी बांधवांना सांगण्यात येईल. त्यानंतर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही योजना सुरूच राहील, अशी ग्वाही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

कर्जमाफी योजनेचा निर्णय घेण्यापूर्वी राजकीय पक्ष, संघटना, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा करण्यात आली. आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा दिवस असून तो त्यांना समर्पित करतो, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज आपले सरकार पोर्टलवर अपलोड केलेली यादी ही ग्रामपंचायत निहाय आहे. शेतीला शाश्‍वत
करण्याबरोबरच शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. आजपासून राज्यभरात कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रत्येक केंद्रावर आधार क्रमांक आधारित नोंदणी करण्यात येणार असून शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीसाठी कधी आणायचा याबाबत
कळविण्यात येणार आहे.

सरसकट कर्जमाफी करणारे एकमेव राज्य - महसूल मंत्री

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करण्यासारखा आहे. शेतकरी बांधवाला सक्षम करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक गावातील दुष्काळ हटविण्यास मदत झाली आहे. अन्य राज्यांपेक्षा देशात महाराष्ट्र
हे एकमेव राज्य आहे ज्याने शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे श्री. पाटील यांनी अभिनंदन करीत त्यांचे आभारही मानले.

अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी तिपटीने वाढ करीत 62 हजार कोटींची तरतूद-वित्तमंत्री

वित्त मंत्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले, अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी तिपटीने वाढ करत 63 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृषी क्रांतीमध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या वीज पुरवठ्यासाठी 1 हजार 39 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कर्जमाफी हा कृषी क्रांतीतील महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होण्याची वाटचाल सुरू असून त्याला शक्ती मिळावी म्हणून शेतकरी बांधवांनी दीपावलीनिमित्त आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक न्याय विभागाचा एकही पैसा अन्यत्र वळवला गेला नाही, असे स्पष्ट करीत चांगल्या प्रश्नावर राजकारण न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र एकमेव-परिवहन मंत्री परिवहन मंत्री रावते यावेळी म्हणाले, नैसर्गिक संकटाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आधार वाटावा म्हणून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. हा आनंदाचा क्षण असून देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचे धैर्य राज्य शासनाने दाखवले
आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे ज्याने दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

कर्जमाफीतून शेतकरी कर्जमुक्तीचा प्रयत्न-सहकार मंत्री

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सहकार मंत्री देशमुख म्हणाले, जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजाला स्वाभिमानाने उभे करण्याचा प्रयत्न कर्जमाफीच्या निर्णयातून घेण्यात आला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो.

यावेळी कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शैला दिनेश कदम (कोल्हापूर), चंद्रकांत पाटील (वाडा), प्रमोद गमे (नागपूर) यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या इतिहासात स्वच्छ आणि प्रामाणिक कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे नागपूर येथील शेतकरी गमे यांनी आभार मानले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी साधला पालकमंत्र्यांशी संवाद

यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी कृषीमंत्री म्हणाले, दिवाळीच्या मंगलमय वातावरणात शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद पसरविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. गोंदिया येथे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालघर येथे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, जालना येथे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, लातूर येथे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, गडचिरोली येथे आदिवासी विकास राज्य मंत्री राजे अम्ब्ररीशराव आत्राम, अमरावती येथे
राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, वाशीम येथे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्याचबरोबर बीड, परभणी, अहमदनगर, धुळे, उस्मानाबाद, औरंगाबाद येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

पात्र शेतकऱ्यांना योग्य प्रमाणपत्र आणि कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या प्रातिनिधिक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. 
यावेळी अमरावती विभागातील - सुरेंद्र पांडुरंग जगताप, अकोलाबाजार, ता. जि. यवतमाळ,
हबीबखाँ हसनखाँ पठाण,अकोलाबाजार, ता. जि. यवतमाळ,
अशोक ग्यानूजी मानवर, मु. पो. जामरून जांगीर, ता. जि. वाशीम,
विठ्ठलराव गणपतराव देशमुख, चादोल, ता. जि. बुलडाणा,
दिलीप नामदेव तवर, मु. पो. सवाना, ता. चिखली, जि. बुलडाणा,
औरंगाबाद विभागातील - फकिरा केशव बंधुवंत, कवडा, ता. जिंतूर, जि. परभणी,
महादेव माणिकराव लिखे, सावरगाव,ता. जिंतूर, जि. परभणी,
रावसाहेब आसाराम सांगळे, अकोला, ता. बदनापूर, जि. जालना,
सर्जेराव नाना खरात, रोशनगाव,ता. बदनापूर, जि. जालना,
अशोक शेषराव डिडोरे, धामणगाव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद,
जमनाबाई बिसन शिसोदे,गोलटगाव, ता. जि. औरंगाबाद,
कोल्हापूर विभागातील - सुदाम रामचंद्र पाटील, मु. अंतरा, पो. अंत्री खु., ता. शिराळा, जि. सांगली, दादासाहेब रंगराव पाटील, मु. कान्दे, पो. अंत्री खु., ता. शिराळा, जि. सांगली,
रामचंद्र आनंद जाधव, अतित, ता. खंडाळा, जि. सातारा,
चंद्रकांत रामचंद्र जाधव, कर्णवडी, ता. खंडाळा, जि. सातारा,
दगडू पांडू पाटील, वाघुर्डे, ता. पन्हाळा,जि. कोल्हापूर,
संजय ज्ञानू पाटील, पनुत्रे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर,
कोकण विभागातील - लक्ष्मण पांडुरंग पाष्ठे,खानीवली, ता. वाडा, जि. पालघर,
चंद्रकांत दत्तात्रय पाटील, खानीवली, ता. वाडा, जि. पालघर,
दीपक अंकुश सावंत,घोणसरी, ता. कणकवली, जि.सिंधुदुर्ग,
गुरुनाथ धोंडू सावंत, सांगवे, ता. कणकवली, जि.सिंधुदुर्ग,
मंगेश बाळाराम पाटील व मोहिनी मंगेश पाटील, कार्ले, ता.अलिबाग, जि. रायगड,
सुनील दत्तात्रय शामा व श्रावणी सुनील शामा, गावदेवी पाखाडी,ता. मुरुड, जि. रायगड,
चंद्रमनी सोनू घाडगे, डेहेन, ता. दापोली, जि. रत्नागिरी,
राजेश गणपत महाडिक, डेहेन, ता. दापोली,जि. रत्नागिरी,
शिवराम लक्ष्मण भोये, सावरोली बु., ता. शहापूर, जि. ठाणे,
मधुकर काळूराम घोराड, देहनोली, ता. मुरबाड,जि. ठाणे,
लातूर विभागातील - शंकर विश्वनाथ सावंत, जागजी, ता. जि. उस्मानाबाद,
देविदास भानुदास इंगळे, जागजी,ता. जि. उस्मानाबाद,
जयदत्त गहिनीनाथ खोटे, वरवटी, ता. जि. बीड, वशिष्ठ मुक्ताजी माने, ताडसोन्ना, ता. जि. बीड, मोहन भीमराव पाटील, रायवाडी, ता. जि. लातूर, शंकरराव बाबुराव चाटे, हडोळी,‍ ता.चाकूर, जि. लातूर,
नागपूर विभागातील -यशवंत भोपू म्हशाखेत्री, अडपल्ली, ता. जि. गडचिरोली,
मोरबाजी राघोबाजी गमे, येरला, ता. नागपूर ग्रामीण, जि. नागपूर,
कृष्णकुमार विनायक घोरमाडे, चिंचोली, ता. नागपूर ग्रामीण, जि. नागपूर,
नाशिक विभागातील - ज्ञानेश्वर कोंडाजी हेंगडे व सौ. कमल ज्ञानेश्वर हेंगडे, मखमलबाद,‍ ता. जि.‍ नाशिक, अरुण किसन गामणे व सौ. अंजना अरुण गामणे,मखमलबाद,‍ ता. जि.‍ नाशिक,
विष्णू बापू टिके, लासलगाव, जि.‍ नाशिक,
आत्माराम सुखा पाटील, धामणगाव, ता. जि. जळगाव,
सुधीर जनार्दन पाटील, रिधूर, ता. जि. जळगाव,
सायसिंग भोवऱ्या पावरा व कोनीबाई सायसिंग पावरा, कुशाल मोचरा पावरा व रेखाबाई कुशाल
पावरा, प्रताप हुरजा पावरा व हेमना प्रताप पावरा, रोशमाळ बु., ता. धडगाव, जि. नंदूरबार,
प्रभाकर देविदास पाटील, कलमाडी, ता.सिंधखेडा,‍ जि. धुळे,
दाजीराम मुरलीधर तोडमल, जेऊर, ता. जि. अहमदनगर,
किरण गोवर्धन भगत, शेंडी, ता. जि. अहमदनगर,
पुणे विभागातील - दिनेश बाळासो कदम व शैला दिनेश कदम, वडापूर,ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर यांना प्रातिनिधिक स्वरुपात राज्यस्तरीय सोहळ्यात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपले सरकार वेब पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे
अपर मुख्य सचिव डी. के. जैन, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, सहकार आयुक्त विकास झाडे यावेळी उपस्थित होते. सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू यांनी आभार मानले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget