स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राची पावले मैलाचा दगड - राष्ट्रपती राम नाथ कोविंद

नागरी हागणदारी मुक्ती कार्यक्रमासाठी कार्य केलेल्या घटकांना पुरस्कार देऊन सत्कार

· महाराष्ट्रातील नागरी भाग हागणदारीमुक्त घोषित

· संपूर्ण महाराष्ट्र 2018 मार्च अखेरीस हागणदारीमुक्त करण्याचा
मुख्यमंत्र्यांचा निर्धार


मुंबई ( १ ऑक्टोबर ) : स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने टाकलेली पावले मैलाचा दगड ठरत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या नागरी भागाच्या हागणदारी मुक्ती बाबतच्या ‘संकल्प पुर्ती’ कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद यांनी प्रथमतः मुंबईत एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेतील मृतांप्रती शोक व्यक्त केला. मुंबईवासी नेहमीच अपल्यासमोरील आव्हानांना सामोरे जात पुढे जात असतात. या शब्दात त्यांनी मुंबईकरांचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्रातील सर्व शहरी भाग उघड्यावरील हागणदारी मुक्त झाल्याबद्दल राज्याचे अभिनंदन करुन राष्ट्रपती पुढे म्हणाले की, 2019 पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ भारत होण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान कौतुकास्पद आहे. राज्याने नागरी भाग स्वच्छ केला आहे. यासाठी सर्व नागरी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, राज्याचे अधिकारी कौतुकास पात्र आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील टीम मधील सहभागी घटकांसह या कामात काम
करणारे स्वच्छता कामगार विशेष कौतुकास पात्र आहेत. राज्याने 31 मार्च 2018 पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केल्याचे समजून आनंद वाटला. या माध्यमातून राज्याने महात्मा गांधींजींना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात महिला व युवतींनी शौचालय बांधण्यासाठी कुटुंबांची मानसिकता घडविल्याने परिवर्तन झाले आहे. महिला व मुलींनी पुढाकार घेतल्याने मोठ्या प्रमाणात शौचालयांची निर्मिती
झाली आहे. मुली देखील लग्न करुन जाणाऱ्या घरात शौचालय आहे का हे आधी पाहतात, त्यामुळे स्वच्छतेच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे स्वच्छ भारतासाठी मोफत करत
असलेल्या जाहिरातींचा उल्लेख करुन त्यांचेही कार्य मोठे आहे असे सांगून राष्ट्रपती म्हणाले की, बच्चन यांच्या जाहिरातींमुळे देशभरात लाखो, करोडोंच्या संख्येत कुटुंबांना शौचालये बांधण्याची प्रेरणा मिळाली.
देशातील स्वच्छतेचे कार्य कौतुकास्पद आहेच. मात्र, ते शाश्वत असायला हवे. स्वच्छ वैयक्तिक किंवा सार्वजनिक शौचालयांचा वापर केल्यानंतर पुन्हा ती स्वच्छ असतील यासाठी मानसिकता तयार केली पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

केवळ लक्ष गाठण्याच्या बाबीस प्राधान्य न देता स्वच्छतेचे कार्य निरंतर होत राहील याकडेही लक्ष दिले पाहिजे. उघड्यावरील शौचामुळे देशाचे होणारे आर्थिक नुकसान हे देशाच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टच्या (जीडीपी) 6.4 टक्क्यापर्यंत होते. आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेचे काम महत्त्त्वपूर्ण आहे. स्वच्छतेसाठी काम करणे ही खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा आहे. ओपन डिफेकेशन फ्री (ओडीएफ) च्या अंतर्गत राज्याकडून ओडीएफ वॉच पद्धतीने ठेवले जाणारे लक्ष लोकांना आपल्या जुन्या सवयी सोडणे आणि मानसिकता बदलण्यास भाग पाडण्यास उपयोगी ठरतील.

महाराष्ट्राची सुमारे 49 टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. ही बाब लक्षात घेता अर्धा महाराष्ट्र आज हागणदारी मुक्त झाला आहे. याबरोबरच आगामी काळात शहरांबरोबरच पूर्ण राज्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योग्य व्यवस्था होईल, असा विश्वास आहे. देशामध्ये स्मार्ट सिटीज प्रमाणेच स्मार्ट सॅनीटेशन आणि स्मार्ट वेस्‍ट मॅनेजमेंट यावरही काम होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

ओडीएफचे काम शाश्वत राहील यासाठी प्रयत्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील नागरी भाग ओडीएफ जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने तीन स्तरावर काम केले. शहरांनी ओडीएफ जाहीर केल्यानंतर विभागीय स्तरावर आणि त्यानंतर राज्य शासनाच्या पातळीवर तपासणी करण्यात आली. त्यानंतर केंद्राच्या पथकानेही त्याची तपासणी केली. ओडीएफ
जाहीर करण्यासाठी लोकांची मानसिकता तसेच सवयी बदलण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने ओडीएफ वॉच सुरु केले. गुड मॉर्निंग, गुड इव्हीनींग पथके स्थापन करुन या कामाला पुढे नेले. हे काम इतक्यावरच न थांबता आगामी 6 महिन्यात लोकांनी शौचालयांचा वापर करण्यासाठी प्रयत्न करावा म्हणून प्रोत्साहित केले जाईल, जेणेकरुन या कामात सातत्य राहील.

राज्याने गेल्या दोन वर्षात 40 लाख शौचालयांची निर्मिती केली. हा कार्यक्रम शासनाचा नाही तर लोकचळवळ ठरला असल्याने यशस्वी ठरला आहे. येत्या 31 मार्च 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करुन
प्रधानमंत्र्यांनी पाहिलेले संपूर्ण हागणदारी मुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम राज्य शासन करेल.

राज्य शासन कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रकिया करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच संपूर्ण सांडपाण्यावर प्रकिया करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन कंपोस्ट तयार करुन ‘महासिटी’ हा एक ब्रॅण्ड महाराष्ट्राने तयार केला आहे. हे कंपोस्ट खत शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्यामुळे शेतीची उत्पादकताही वाढत आहे, असेही ते म्हणाले.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज महाराष्ट्रात 88 टक्के शौचालयांचे बांधकाम झाले आहे. हागणदारी मुक्तीसाठी राज्य शासनाने विशेष प्रयत्न केले. 15 ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांनाही स्वच्छतेची शपथ दिली जाते. त्यामुळे मुलांच्या माध्यमातून घरोघरी प्रबोधन होते. स्वच्छतेमुळे आरोग्यदायी पिढी तयार
होईल. या स्वच्छतेबरोबरच राज्य शासनाच्या सर्व विभागातील झिरो पेंडन्सीचे काम म्हणजेच शासकीय कामकाजातील स्वच्छतेसाठीही शासन प्रयत्न करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल्या की,आजचा निर्धार हा संकल्प ते सिद्धीचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व नागरी संस्थांनी मेहनत घेतल्यामुळेच हे शक्य झाले. आता 17 सप्टेंबर 2019 पर्यंत शहरांतील संपूर्ण सांडपाणी प्रकिया तसेच कचरा विलगीकरण केले जाईल, असेही त्या
म्हणाल्या.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. राष्ट्रपती आणि राज्यपालांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. राज्यामार्फत ओडीएफ साठी करण्यात आलेल्या प्रयत्नांबाबतची पुस्तिकाही यावेळी प्रकाशित करण्यात आली. ओडीएफबाबत प्रधानमंत्री यांचा संदेश तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने केल्या प्रयत्नांची चित्रफीत, ग्रामीण भागातील ओडीएफ कामाची चित्रफीतही दाखवण्यात आली.

या कार्यक्रमात महाराष्ट्राचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व घटकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. राज्यातील 27 महानगरपालिका हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्व महापौर, नगरसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल राज्यातील महानगरपालिकांचे महापौर आणि नगरसेवकांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नंदा जिचकार यांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात नगरपरिषद महासंघाचे अध्यक्ष हिंगणघाट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी सत्कार स्व‍िकारला.

महाराष्ट्राचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी मुख्य सचिव, प्रधान सचिव (नगर विकास-2), सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, नगरविकास विभागातील सर्व अधिकारी, नागरी
प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्या वतीने मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी सत्कार स्वीकारला.
राज्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी संघटनेचे अध्यक्ष व नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, मुख्याधिकारी संघटनेचे सचिव व हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास
पाटील, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चे संचालक उदय टेकाळे यांचा सत्कार करण्यात आला.

राज्याचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्यातील सर्व नागरी स्वराज्य संस्थांतील सफाई कामगारांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात उमरेड नगरपरिषदेचे दिलीप चव्हाण, चोपडा नगरपरिषदेचे कैलास चोरे, अकोला महानगरपालिकेचे अशोक गोहर, नागपूर महानगरपालिकेचे अशोक मलिक, राजुरा नगरपरिषदेच्या भानुबाई कळवाले यांचा सत्कार करण्यात आला.

राज्याचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला सेंटर फॉर एन्वायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी (सीईपीटी), अहमदाबाद, रेक्किट बेनकिसर (आरबी) आणि जर्मन इंटरनॅशनल कार्पोरेशन (जीआयझेड) या संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल सीईपीटीचे प्रोफेसर इमिरेट्स दिनेश मेहता आणि श्रीमती मीरा मेहता, जीआयझेडचे प्रकल्प संकलक डर्क वॉल्टर, घन कचरा व्यवस्थापनचे तांत्रिक तज्ज्ञ जितेंद्र यादव, रेक्किट बेनकीसर साऊथ इस्ट एशियाचे एसव्हीपी रिजनल डायरेक्टर नितीश कपूर, रेक्किट बेनकीसर साऊथ
इस्ट एशियाचे एक्सटर्नल अफेअर्स अँड पार्टनरशिप हेड रवी भटनागर यांचा सत्कार करण्यात आला.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2016-17 अंतर्गत ग्रामपंचायतींचे विभागस्तरीय पुरस्कारही देण्यात आले. यामध्ये पाटण (जि. सातारा) मधील मान्याची वाडीचे रवींद्र माने (सरपंच) व प्रसाद यादव (ग्रामसेवक), रोहा (रायगड) तालुक्यातील धाटावचे विनोद पशिलकर (सरपंच) व दीपक चिपळूणकर (ग्रामसेवक), अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारचे पोपटराव पवार (सरपंच) व सचिन थोरात (ग्रामसेवक), अनंतपाळ (लातूर) मधील धामणगाव शिरुळ चे धनंजय पाटील (सरपंच) व हुदगे जी.एस. (ग्रामसेवक), मेहकर (बुलढाणा) मधील पांगारखेडच्या अंजली सुर्वे (सरपंच) व मोहन वानखेडे (ग्रामसेवक) आणि लाखणी (जि. भंडारा) येथील शिवणी (मो) च्या माया कुथे (सरपंच) व जयंत गडपायले (ग्रामसेवक) यांचा सत्कार करण्यात आला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget