२५ हजार लोकवस्तीच्या नेहरू नगर परिसरात सुयोग्य कचरा व्यवस्थापन

गांधी जयंतीच्या निमित्ताने महापालिका आयुक्तांनी भेट देऊन केले कौतुक

के पश्चिम विभागातील नेहरु नगर झोपडपट्टी शून्य कचरा मोहिमेच्या दिशेने अग्रेसर


मुंबई ( २ ऑक्टोबर ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील के पश्चिम विभागातील जुहू विलेपार्ले परिसरात असणाऱ्या नेहरूनगर या झोपडपट्टी परिसरात उभारण्यात आलेल्या व ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास आज महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भेट दिली. सुमारे २५ हजार लोकवस्तीच्या या प्रकल्पाचे कौतुक करीत महापालिका आयुक्तांनी परिसरातील नागरिकांचे आणि संबंधित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले आहे. आजच्या या भेटी प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महापालिका आयुक्तांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार महापालिका क्षेत्रातील ज्या गृहनिर्माण संकुल / व्यवसायिक आस्थापना, ज्यांचे एकूण चटई क्षेत्र
हे २० हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक आहे; किंवा ज्या संकुलांमधून दररोज १०० किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होत आहे; अशा संकुलांनी आपापल्या परिसरात निर्माण होणा-या ओल्या कच-याची विल्हेवाट संकुलातच करावयाच्या दृष्टीने प्रकल्प उभारणे व राबविणे, यासाठी २ ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती. यानुसार संबंधित ५ हजार ३०४ सोसायट्यांना यापूर्वीच नोटीस देण्यात आल्या आहेत. यापैकी ३७३ सोसायट्यांमध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प गेल्या सुमारे चार महिन्यांच्या कालावधीत; तर ९७ प्रकल्प आज गांधी जयंतीच्या निमित्ताने सोसायट्यांच्याच स्तरावर सुरु झाले आहेत.

उर्वरित सोसायट्यांपैकी ज्या सोसायट्यांनी मुदतवाढीसाठी अर्ज केलेले नाहीत, अशा सोसायट्याना पुन्हा नोटीस देण्यात येणार आहे. यानुसार सुधारित मुदत लवकरच निर्धारित करण्यात येणार असून त्याची माहिती संबंधितांना लवकरच कळविली जाईल. मात्र यानुसार देण्यात आलेली सुधारीत मुदत संपल्यावर या सोसायट्यांचा कचरा न उचलण्याच्या आपल्या भूमिकेवर पालिका प्रशासन ठाम आहे. त्याचबरोबर ज्या सोसायट्यांनी मुदतवाढीसाठी अर्ज केले आहेत, त्या सोसायट्यांना प्रकरणपरत्वे जास्तीतजास्त ३ महिन्यांची मुदतवाढ दिली जाणार आहे. तसेच अशी मुदतवाढ देतांना सोसायट्यांच्या अडचणी काय आहेत, ते समजून
घेऊन संबंधितांना यथोचित मार्गदर्शन केले जाणार आहे. यथोचित मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेतूनच पालिकेने यापूर्वी अनेक ठिकाणी कचरा विषयक प्रदर्शनांचे आयोजन केले होते. तर सर्व २४ विभागात कचरा व्यवस्थापन मदत कक्ष (Help Desk) देखील सुरु केले आहेत, अशीही माहिती महापालिका आयुक्तांनी आजच्या भेटी दरम्यात प्रसार माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.

नेहरू नगर परिसरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसराच्या जवळ बसविण्यात आलेल्या 'प्लास्टिक क्रशिंग मशीन' बसविण्यात आले असून या यंत्राची देखील महापालिका आयुक्तांनी आजच्या भेटी दरम्यान पाहणी केली.

जुहू-विलेपार्ले परिसरातील सुमारे २५ ते ३० हजार लोकवस्तीच्या नेहरु नगर झोपडपट्टी परिसराजवळ महापालिकेच्या पुढाकाराने आणि 'दत्तक वस्ती योजने'तील स्वयंसेवकांच्या मदतीने महापालिकेच्याच सुमारे ५ हजार चौरस फुटांच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या या कचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये दररोज सुमारे २०० किलो ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाणार आहे. तसेच या प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून ज्यामुळे लवकरच या ठिकाणी दररोज २ हजार किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. या सर्व बाबींमुळे तब्बल २५ ते ३० हजार लोकवस्तीच्या या झोपडपट्टीमध्ये शून्य कचरा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी लवकरच शक्य होईल, असा विश्वास के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget