उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मिनी खेतरपाल 'ऑफिसर ऑफ द मंथ'

अतिवृष्टी नंतर लेप्टो प्रतिबंधासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बहुमान

महापालिका आयुक्तांनी केले डॉ. मिनी खेतरपाल यांच्या कामाचे कौतुक !


मुंबई ( ८ ऑक्टोबर ) : २९ ऑगस्ट व १९ सप्टेंबर २०१७ च्या अतिवृष्टीनंतर लेप्टो संसर्गाची संभाव्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने अत्यंत परिणामकारकपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविली. या अंतर्गत जनजागृती करणे, तब्बल ४ लाखांपेक्षा अधिक प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, यासारख्या अनेक बाबी करण्यात आल्या. ही सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक योजना योग्य प्रकारे राबविली जाण्यासाठी अथक परिश्रम घेणा-या महापालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी आणि साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉक्टर मिनी खेतरपाल यांचा 'ऑक्टोबर २०१७' या महिन्यासाठी 'महिन्याचे मानकरी' अर्थात 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने नुकताच सन्मान करण्यात आला आहे.

महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महापालिका अधिका-यांच्या मासिक आढावा बैठकी दरम्यान 'ऑक्टोबर - २०१७' या महिन्यासाठी `महिन्याचे मानकरी' (ऑफिसर ऑफ द मंथ) या बहुमानाने डॉ. मिनी खेतरपाल यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (विशेष) निता चौधरी, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व खातेप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. खेतरपाल यांचे शालेय शिक्षण अंधेरी पूर्वेतील लेडी विसनजी गर्ल्स हायस्कूल मधून, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयातून झाले आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी नामांकित असणा-या जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एम.बी.बी.एस. शिक्षण पूर्ण केले आहे. तर केरळ मधून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

डॉक्टर मिनी खेतरपाल या वर्ष १९९० पासून महापालिकेच्या सेवेत असून त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागात विविध जबाबदा-या सांभाळल्या आहेत. डॉक्टर खेतरपाल यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेद्यकीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवून संशोधनात्मक निबंध (Research Paper) देखील सादर केले आहेत. एप्रिल २०१५ पासून त्या महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख आहेत.

अतिवृष्टी दरम्यान साचलेल्या पाण्याशी संपर्क आलेल्या नागरिकांना लेप्टोस्पायरोसिसची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यानुसार २९ ऑगस्ट व १९ सप्टेंबरच्या अतिवृष्टीनंतर लेप्टो संसर्गाची संभाव्यता लक्षात घेऊन महापालिकेद्वारे सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमस्वरुपात हाती घेण्यात आली. या अंतर्गत लेप्टो प्रतिबंधाबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी एस.एम.एस. चा प्रभावी वापर करण्यात आला. यानुसार दि. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान एकूण ९० लाख एस.एम.एस. थेटपणे नागरिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठविण्यात आले. याद्वारे नागरिकांना लेप्टो प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात येऊन सहकार्यास्तव आवाहनही करण्यात आले होते.

त्याचसोबत १७३ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली, ज्यांचा लाभ ३५ हजार ७७४ नागरिकांनी घेतला. याव्यतिरिक्त २० लाख ८६ हजार ३०७ गृहभेटी देण्यासह ९३ लाख ५६ हजार ६९४ एवढ्या लोकसंख्येचे प्रतिबंधात्मक सर्वेक्षण देखील करण्यात आले. तसेच लेप्टो प्रतिबंधात्मक औषधोपचारांचा भाग म्हणून तब्बल ४ लाख ६४ हजार ८५४ डॉक्सीसायक्लीन या गोळ्यांचे मोफत वाटप महापालिका क्षेत्रात करण्यात आले. या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये साथरोग नियंत्रण खात्याच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मिनी खेतरपाल यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने नुकतेच गौरविण्यात आले आहे.

***

छायाचित्र तळटिप: महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मिनी खेतरपाल यांचा 'महिन्याचे मानकरी' या बहुमानाने सत्कार करताना महापालिका आयुक्त अजोय मेहता. या प्रसंगी समवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (विशेष) निता चौधरी.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget