छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017

परिपूर्ण माहिती प्राप्त जिल्ह्यात तातडीने कर्जमाफीचा लाभ

- सहकार मंत्री सुभाष देशमुख

मुंबई ( ४ ऑक्टोबर ) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत दि. 22 सप्टेंबर अखेर 56.59 लाख शेतकरी कुटूंबाचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये 77.29 लाख खातेदारांचा समावेश आहे. ज्या जिल्ह्यातील सर्व बँकांची परिपूर्ण माहिती प्राप्त होईल या जिल्ह्यात तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

आज मंत्रालयात कर्जमाफी संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी देशमुख बोलत होते.

देशमुख म्हणाले, व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांची विहित नमुन्यातील माहिती (66 रकाने) ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु असून, व्यापारी बँकांची विहित
नमुन्यात माहिती संबंधित बँकांचे सक्षम अधिकारी यांचेकडून प्रमाणित करण्यात येत आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची माहिती सहकार विभागाचे लेखापरीक्षक यांचेमार्फत पडताळणी करण्यात येत आहे.दि. 3 ऑक्टोबर 2017 पर्यंत विविध 32 व्यापारी बँकांनी 20.54 लाख खातेदारांची कर्जाबाबतची माहिती तसेच 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 36.36 लाख खातेदारांपैकी 20.35 लाख खातेदारांची कर्जाबाबतची माहिती विहित नमुन्यात भरून दिली आहे. त्यापैकी 15 लाख खातेदारांची माहिती सहकार विभागाच्या
लेखापरीक्षकांनी प्रमाणित केली आहे.

बँकांनी विहित नमुन्यात माहिती ऑनलाईन अपलोड केल्यानंतर योजनेच्या पात्रतेबाबत सॉफ्टवेअरद्वारे छाननी करण्यात येत असून, छाननीमध्ये पात्र ठरलेल्या खातेदारांबाबत चावडी वाचनामध्ये आलेल्या सूचना व माहितीचा विचार करुन तालुकास्तरीय समितीद्वारे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता लागू नसलेल्या गावात कर्जमाफीच्या माहितीचे चावडी वाचन करण्यात आले आहे. अन्य गावात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर चावडी वाचन करण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी त्यांचा आधार क्रमांक बॅंकेकडे देणे बंधनकारक आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे आधार क्रमांक बँकांकडे दिले नसल्यामुळे बँकांकडून माहिती येण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक तातडीने संबंधित बँकेत द्यावा.आधार क्रमांक बँकांना दिलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी या योजनेचा लाभ देण्यास शासन प्रयत्नशील असून त्यादृष्टीने विहित नमुन्यातील माहिती तातडीने अपलोड करण्याबाबत सर्व बँकांना निर्देश देण्यात आले आहेत.तसेच कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना देय असणारी प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget