नवीन भाऊचा धक्का, मुंबई ते मांडवा लवकरच रो-रो फेरी बोटसेवा

मुंबई ( ७ ऑक्टोबर ) : महामार्गावर विशेषत: सणासुदीच्या, सुट्टीच्या मोसमात होणारी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, डिझेल/पेट्रोलवर होणारा खर्च, वाहतूक कोंडीत वाया जाणारा वेळ, ध्वनी/वायू प्रदूषण या सर्व बाबींमुळे मन:स्ताप सहन कराव्या लागणाऱ्या प्रवाशांना जलवाहतुकीच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. नवीन भाऊचा धक्का ते रायगड जिल्ह्यातील मांडवा बंदर अशी रो-रो वाहतूक सेवा चालविण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मे. मालदार ड्रेजर्स ॲण्ड साल्वेजर्स या कंपनीला दि. 5 ऑक्टोबर रोजी लेटर ऑफ अवार्ड दिले आहे. ही सेवा मार्च/एप्रिल-2018 पासून सुरु होणे अपेक्षित असून, एका फेरीमध्ये बोटीमधून सुमारे 350 प्रवासी व 40 कार एकाच वेळी प्रवास करु शकतील, अशी योजना आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टी/वादळसदृश्य परिस्थितीचे काही अपवादात्मक दिवस वगळता ही सेवा वर्षभर सुरु राहणार आहे.

आजमितीस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील लहान बंदरांच्या हद्दीत चालणाऱ्या प्रवासी जलवाहतुकीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 180 लाख प्रवासी जलमार्गाने प्रवास करतात. प्रवासी जलवाहतुकीला चालना
देण्यासाठी अधिकाधिक व दर्जेदार प्रवासी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून शासन प्रयत्नशील आहे. रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून मुंबईतील नवीन भाऊचा धक्का ते
रायगड जिल्ह्यातील मांडवा बंदर आणि नवीन भाऊचा धक्का ते नेरुळ, नवी मुंबई या जलमार्गावर जलवाहतूक सुरु करण्याच्या प्रकल्पास शासनाने मान्यता दिली आहे. रो-रो प्रवासी वाहतुकीकरिता नवीन भाऊचा धक्का येथे मुंबई तर मांडवा येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत जेट्टी व प्रवासी टर्मिनल बांधण्याचे हाती घेण्यात आले असून मार्च-2018 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

गेली अनेक वर्षे बंद असलेली कोकण बोट सेवा पुन:श्च सुरु करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, नवीन भाऊचा धक्का ते मांडवा या रो-रो प्रवासी सेवेद्वारे त्यादृष्टीने वाटचाल सुरु होणार आहे. हया सेवेमुळे कोकणातील पर्यटन क्षेत्रात आमुलाग्र बदल अपेक्षित असून त्याद्वारे पर्यटनावर आधारित उद्योगांसाठी ही सेवा विकासगंगा ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे
यांनी व्यक्त केले आहे. येत्या काही वर्षात ही सेवा कोकणातील इतर बंदरांमध्ये सुरु करण्याचे ध्येय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने ठेवले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget