'वर्ल्ड हेरिटेज' जवळील दिव्यांचे खांबही होणार आता हेरिटेज

दिवे व सिग्नलच्या ३२ खाबांऐवजी आता केवळ ९ खांब

जागतिक वारसास्थळ परिसराची आकर्षकता होणार वृद्धिंगत !

मुंबई ( ९ ऑक्टोबर ) : दक्षिण मुंबईतील छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस हे युनेस्कोने घोषित केलेले जागतिक वारसास्थळ आहे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस व बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय या 'हेरिटेज' वास्तूंच्या समोरील चौकातील पथदिवे आणि सिग्नल यांचे खांब देखील आता हेरिटेज अनुरुप होणार आहेत. सध्या या परिसरात पथदिव्यांचे २२ खांब असून वाहतूक सिग्नलचे १० खांब, याप्रमाणे एकूण ३२ सामान्य प्रकारचे खांब आहेत. मात्र आता या परिसराची आकर्षकता वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे हेरिटेज अनुरुप खांब बसविले जाणार असून, खांबांची संख्या देखील ३२ वरुन ९ एवढी होणार आहे, अशी माहिती 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

दक्षिण मुंबईतील दादाभाई नौरोजी मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पश्चिम द्वारासमोरच्या मुख्य चौकात सध्या पथदिव्यांचे २२ खांब आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक सिग्नलचे १० खांब आहेत. यानुसार सध्या या परिसरात एकूण ३२ सामान्य प्रकारचे खांब अस्तित्वात आहेत. हे सर्व खांब आता हटविण्यात येणार असून त्यांच्या जागी हेरिटेज अनुरुप असे ९ खांब बसविण्यात येणार आहेत. या ९ खांबांपैकी ५ खांब हे पथदिव्यांचे असणार असून त्यांची उंची ही प्रत्येकी ३९.३७ फूट एवढी असणार आहे. तर उर्वरित ४ खांब
हे वाहतूक सिग्नलसाठी उपयोगात येणार आहेत.

सध्या अस्तित्वात असलेल्या पथदिव्यांच्या २२ खांबांवर सोडिअम व्हेपर प्रकारचे ३६ दिवे आहेत. पिवळसर प्रकाश देणारे हे सर्व दिवे १५० वॅटचे असून या दिव्यांपासून सरासरी ३० 'लक्स' इतकी प्रकाश - तीव्रता प्राप्त
होत आहे. प्रस्तावित करण्यात आलेल्या हेरिटेज अनुरुप ५ खांबांवर प्रत्येकी ४ दिवे, याप्रमाणे एकूण २० दिवे बसविले जाणार आहेत. यापैकी प्रत्येक दिवा हा १३६ वॅटचा व एलईडी पद्धतीचा दिवा असणार आहे. या
अत्याधुनिक पद्धतीच्या दिव्यांपासून सरासरी ३४ 'लक्स' एवढी प्रकाश – तीव्रता प्राप्त होणे अपेक्षित आहे. याचाच अर्थ, खांबांची व दिव्यांची संख्या जरी कमी होणार असली तरी प्रकाश तीव्रतेमध्ये सुमारे १०
टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होणार आहे. तर विद्युत खर्चात देखील बचत शक्य होणार आहे. याच चौकामध्ये प्रदूषण व वाहतूक विषयक माहिती देणारा एलईडी फलक आहे. हा फलक दुस-या ठिकाणी हलविण्यात येणार आहे. ज्यामुळे देखील परिसराच्या सौदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे.

प्रस्तावित करण्यात आलेले सर्व हेरिटेज खांब हे 'माया डिजाईन' (Maia Design) या प्रकारातले असणार आहेत. या सर्व खांबांना बाहेरुन व आतून गॅल्व्हनायजेशन केलेले असल्यामुळे तसेच वैशिष्ट्यपूर्ण रंग दिलेला असल्याने ते गंज रोधक असणार आहेत. निविदा तपशिलानुसार या खांबांचे अपेक्षित आयुर्मान हे सुमारे २५ वर्षे असणार आहे. या खांबांचा रंग करडा असणार असून ते इटली येथून आयात केले जाणार आहेत. विशेष म्हणजे पथदिव्यांच्या खांबांवर खालच्या बाजूला वाहतूक सिग्नल बसविण्याची देखील सुविधा असणार आहे, ज्यामुळे भविष्यात गरज भासल्यास वाहतूक सिग्नलसाठी नवीन खांब न बसविता देखील सिग्नलची संख्या वाढविणे शक्य असणार आहे.

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस व महापालिका मुख्यालयाजवळील चौकात बसविण्यात येणा-या हेरिटेज अनुरुप खांबांसाठी ९६ लाख रुपये खर्च अंदाजित आहे. याबाबत ऑनलाईन पद्धतीने निविदा भरण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर २०१७ आहे. साधारणपणे मार्च - २०१८ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशीही माहिती श्री. दिघावकर यांनी दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget