मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री फडणवीस

मराठवाडा लोकविकास मंचच्या विविध पुरस्कारांचे वितरण

मुंबई ( ७ ऑक्टोबर ) : मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा- डीएमआयसीच्या कामाचा महाराष्ट्रातील प्रारंभ मराठवाड्यातूनच करण्यात येणार, तर समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्यालाच सर्वाधिक लाभ होणार, असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मराठवाडा लोकविकास मंच यांच्यावतीने मराठवाडा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

रवींद्र नाट्य मंदिर येथे झालेल्या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, मराठवाडा लोकविकास मंचचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, दै. पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सोहळ्यात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना मराठवाडा भूषण, नाम फाउंडेशनच्या कार्यासाठी अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांना मराठवाडा मित्र, उद्योजक राम भोगले, अभिनेते गिरीश कुलकर्णी, आमदार डॉ. भारती लव्हेकर, नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे, पत्रकार एस. एम. देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अजय मुनोत, उदयोन्मुख प्रशासकीय अधिकारी अन्सार शेख यांना मराठवाडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेते पाटेकर व अनासपुरे यांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाडा या संतांच्या भूमीतून राजकारण, उद्योजक, कलाकार अशा विविध क्षेत्रातील व्यक्तीमत्त्वांची महाराष्ट्राला देणगी मिळाली आहे. प्रतिभावंतांना पुढे येण्यासाठी मराठवाड्याने नेहमीच साथ दिली आहे. वैद्यकीय, उद्योग अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांनी मराठवाड्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. स्वतःच्या क्षेत्रातील भरीव कामगिरीसह, इतर अनेकांचे जीवन समृद्ध केले आहे. यावेळी त्यांनी डॉ. लहाने, उद्योजक भोगले यांच्यासह पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख केला.

मराठवाड्याच्या विकासाच्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गतवर्षी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या विकासाबाबत विविध निर्णय घेण्यात आले होते. या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात येईल. त्यासाठी येत्या तीन ते चार महिन्यात पुन्हा औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे नियोजन आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक विकास पट्टा- डीएमआयसीच्या कामाचा प्रारंभ मराठवाड्यातूनच करणार आहोत. पहिली औद्योगिक स्मार्ट-सिटीही मराठवाड्यातच नियोजित आहे. या माध्यमातून 2021 पर्यंत साडेतीन लाख रोजगार निर्मिती होईल. वॉटर-ग्रीडच्या माध्यमातून सिंचन व पिण्याचे पाणी समन्यायी पद्धतीने उपलब्ध होईल, असे प्रयत्न आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे मराठवाड्यात पाच लाख हेक्टरचे संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी टुरीझम
क्लस्टर संकल्पना राबविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी मराठवाड्यातील गुणवत्तेचा उल्लेख करून, होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात दोनशे विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह संकल्पना राबविण्यात
यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, आपत्तीतून इष्टापत्ती
निर्माण करण्याची संघर्षशील वृत्ती मराठवाड्याच्या भूमीत आहे. यातूनच मराठवाड्याने अनेक रत्न राज्य आणि देशाला दिली आहेत. मेक-इन-इंडियाच्या माध्यमातून मराठवाड्यातील पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न सोडवावा लागेल. यामुळे अनेक उद्योग येथे येऊन, विकासाचा मार्ग सुकर होईल. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमुळे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेता येतील. त्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक राहिल्याचा उल्लेखही मुंडे यांनी केला.

मंचचे अध्यक्ष आमदार मेटे, डॉ. लहाने, पत्रकार देशमुख आदींचीही भाषणे झाली. सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget