स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पालघर व जालना जिल्हा हागणदारी मुक्त

स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई ( ३ ऑक्टोबर ) : स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) अंतर्गत राज्यातील पालघर आणि मराठवाड्यातील जालना हा पहिला जिल्हा असे दोन जिल्हे हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

याच अनुषंगाने तसेच ‘स्वच्छता ही सेवा’ या 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत महाराष्ट्राला देशातील सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून मिळालेल्या पुरस्कारासंबंधी माहिती देण्यासाठी लोणीकर यांनी त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अपर मुख्य सचिव शाम लाल गोयल, पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते. मंत्री लोणीकर म्हणाले, यापूर्वी राज्यातील 34 जिल्ह्यांपैकी सिंधुदूर्ग,रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा हे 11 जिल्हे 2016-2017 मध्ये हागणदारी मुक्त झाले आहेत. 351तालुक्यांपैकी 173 तालुके तर 27 हजार 667 ग्रामपंचायतीपैकी 19 हजार 306 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. हे प्रमाण देशातील ग्रामपंचायतीच्या17% आहे. राज्यातील 40 हजार 520 महसुली गावांपैकी 28 हजार 195 गावे हागणदारीमुक्त घोषीत करण्यात आलेली आहेत.

प्रधानमंत्री यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजीच्या स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात देशाला स्वच्छतेची हाक दिली होती. त्यानुसार भारतात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014 पासून झाली तेव्हापासून महाराष्ट्रात ग्रामीण भागात आजपर्यंत सुमारे 43 लाख शौचालयांचे बांधकाम झाले असून केवळ 12 लाख शौचालयांचे बांधकाम होणे शिल्लक आहे. ग्रामीण भागात 88 टक्के कामाची पूर्ती आतापर्यंत झाली आहे.

जालना जिल्ह्यात पायाभूत सर्वेक्षण 2012 नुसार केवळ 33 टक्के कुटुंबांकडे शौचालये होती. 2017 मध्ये 100 टक्के कुटुंबांनी शौचालय बांधून त्याचा वापर सुरु केला आहे. पालघर जिल्हा हा 82 टक्के आदिवासी जिल्हा आहे. विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे पूर्णत: आदिवासी तालुके आहेत. पायाभूत सर्वेक्षणावेळी जिल्हयात 52 टक्के कुटुंबाकडे शौचालय होती. ती आता 100 टक्के पर्यंत पोहचली असल्याची माहिती मंत्री लोणीकर यांनी दिली. तसेच संपूर्ण देशात हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींच्या संख्येत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला मिळाले 4 पुरस्कार

दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा' हे देशव्यापी अभियान राबविले गेले. त्यात केंद्र सरकारने सर्व राज्यांचे मुल्यांकन केल्यानंतर महाराष्ट्र हे सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आले. पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री रमेश चंदाप्पा जिगाजिगानी आणि एस.एस.अहुवालिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्वच्छता दर्पण या नावाने जिल्ह्यांसाठी दिला जाणारा पुरस्कार वर्धा, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना मिळाला. स्वच्छतेच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञान शोधलेल्या संस्था व्यक्तींसाठी घेतलेल्या स्पर्धेत राज्यातील सचिन जोशी, मिलींद व्यवहारे, गणेश सावंत यांना स्वच्छथॉन पुरस्कार देण्‍यात आला. लघुपट आणि निबंध लिखान स्पर्धेत प्रशांत पांडेकर यांना देशस्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला तर विनेय किरपाल यांना विशेष पुरस्कार मिळाला, अशीही माहिती मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget