२००५ तुलनेत २०१७ च्या पावसाळ्यात लेप्टो रुग्णसंख्येत लक्षणीय घट

नागरिकांच्या सहकार्यामुळेच प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिम ठरली प्रभावी

लेप्टो प्रतिबंधासाठी त्वरीत वैद्यकीय सल्ला व औषधोपचार अत्यंत महत्त्वाचे

मुंबई ( ३ ऑक्टोबर ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात २९ ऑगस्ट २०१७ रोजी झालेल्या अतिवृष्टीचीअनेकांनी २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीशी तुलना केली. २६ जुलै २००५ च्या पावसानंतर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात लेप्टोचे (Leptospirosis) एकूण १ हजार ४४६ रुग्ण आढळून आले होते, तर ११९ रुग्णांचे दुर्दैवी मृत्यु झाले होते. ही बाब लक्षात घेऊन यावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाने २९ ऑगस्ट २०१७ च्या अतिवृष्टीनंतर जनजागृतीसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिम राबविली. या मोहिमेदरम्यान ९० लाख लघुसंदेशांसह (SMS) विविध माध्यमांचा वापर करुन जनजागृती केली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे, गृहभेटी देखील आयोजित करण्यात येऊन प्रतिबंधात्मक गोळ्यांचेही वाटप करण्यात आले. या सर्व मोहिमेला नागरिकांनी अत्यंत सजगपणे सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही मोहिम प्रभावी ठरुन लेप्टो प्रसारास प्रतिबंध करणे ब-याच अंशी शक्य झाले, असे नमूद करत महापालिकेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीमती पद्मजा केसकर यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. यावर्षी ३० सप्टेंबर पर्यंत लेप्टोचे २१२ रुग्ण आढळून आले आहेत, तर त्यापैकी ७ रुग्णांचे दुर्दैवी मृत्यु झाले आहेत.

२९ ऑगस्ट व १९ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान अनेक नागरिकांना पावसाच्या पाण्यामधून चालावे लागले. अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या पाण्याशी संबंध आलेल्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिस होण्याची
शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपचारांबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली होती.

लेप्टो प्रतिबंधाबाबतची माहिती थेटपणे नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने लघुसंदेशांचा (SMS) वापर करण्यात आला. यानुसार दि. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी ५० लाख लघुसंदेश, तर २ सप्टेंबर रोजी ४० लाख लघुसंदेश; याप्रमाणे एकूण ९० लाख लघुसंदेश थेटपणे नागरिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठविण्यात आले. या लघुसंदेंशांद्वारे नागरिकांना लेप्टो प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात येऊन सहकार्यास्तव आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर विविध प्रसारमाध्यमांनी देखील महापालिकेच्या या मोहिमेला अतिशय चांगले सहकार्य केले, ज्यामुळे सदर माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यास मोलाची मदत झाली, असेही डॉ. केसकर यांनी सांगितले.

सदर मोहिमेदरम्यान विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे १७३ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांचा लाभ ३५ हजार ७७४ नागरिकांनी घेतला. याव्यतिरिक्त २० लाख ८६ हजार ३०७ गृहभेटी देण्यासह ९३ लाख ५६ हजार ६९४ एवढ्या लोकसंख्येचे
प्रतिबंधात्मक सर्वेक्षण देखील करण्यात आले. त्याचबरोबर या मोहिमेदरम्यान लेप्टो प्रतिबंधात्मक औषधोपचारांचा भाग म्हणून ४ लाख ६४ हजार ८५४ डॉक्सीसायक्लीन या गोळ्यांचे मोफत वाटप महापालिका क्षेत्रात करण्यात आले.

वर्ष २०१५ मध्ये महापालिका क्षेत्रात लेप्टोचे १७६ रुग्ण आढळून आले होते. यापैकी १९ रुग्णांचे दुर्दैवी मृत्यु झाले होते. वर्ष २०१६ मध्ये २६७ रुग्णांपैकी ९ रुग्णांचे दुर्दैवी मृत्यु झाले होते. तर यावर्षी सप्टेंबर २०१७ पर्यंत लेप्टोचे २१२ रुग्ण आढळून आले; तर ७ रुग्णांचे दुर्दैवी मृत्यु झाले, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

'लेप्टोस्पायरोसिस' बाबत महत्त्वाची माहिती

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या आहेत, त्या व्यक्ती 'कमी जोखीम' या गटात मोडतात.
एकदाच पुराच्या पाण्यातून चाललेल्या पण अंगावर किंवा पायावर जखम असलेल्या किंवा चुकून पुराचे पाणी तोंडात गेलेल्या व्यक्ती या 'मध्यम जोखीम' या सदरात येतात.

एकापेक्षा अधिकवेळा पुराच्या पाण्याशी संपर्क आल्यास अशा व्यक्ती 'अतिजोखीम' या गटात मोडतात. यामध्ये ८ वर्षापेक्षा कमी वयाची मुले आणि गरोदर महिला यांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेणे गरजेचे असते.

लेप्टोस्पायरोसिस हा रोग लेप्टोस्पायरा (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतुमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसेच इतर काही प्राणी या रोगाचे स्रोत आहेतः बाधित प्राण्यांच्या लघवीद्वारे संसर्गित झालेल्या पाण्याशी
संबंध येताच मनुष्याला लेप्टोस्पायरोसिस या रोगाची बाधा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारची जनावरे सदर सूक्ष्मजंतुचे वाहक असतात. पण त्यांच्यात सदर रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत.

मनुष्यापासून मनुष्याला या संसर्गाची बाधा होत नाही. शहरी विभागात लेप्टोस्पायरा हे सूक्ष्मजंतु उंदीर, कुत्रे इत्यादी प्राण्यांमध्ये आढळतात. संसर्गित जनावरांच्या मुत्राद्वारे दूषित झालेले पाणी वा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो. हा संसर्ग जखम झालेली त्वचा, डोळे, नाक याद्वारे होतो. पावसाळ्यात व पूर आल्यानंतर किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांना दूषित पाण्यातून चालावे लागले तर शरीरावरील जखमांमधून या रोगाचे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.

लक्षणे

या रोगाचे ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव इत्यादी लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होऊन त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास मृत्यु होण्याचा धोका संभवतो.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी 

पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यु, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.
साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे.
साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.
ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा.
उंदीर- घुशींचा नायनाट करावा.
उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळवून न देणे, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग वापरात आणावे.
घरात व आजुबाजूला कचरा साठणार नाही याची दक्षता घ्यावी व कच-याची विल्हेवाट लावावी.
ट्रेकींग, एडवेंचर स्पोर्टस खेळाचे प्रकार टाळावे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget