आगीनंतर अकरा मिनिटात महापालिका मुख्यालयातील कर्मचारी सुरक्षित स्थळी

'जागतिक आपत्ती घट' दिनी आयोजिलेले 'मॉक ड्रिल' यशस्वी

मुंबई ( १३ ऑक्टोबर ) : बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या तिस-या मजल्यावर नूतनीकरणाचे काम सुरु आहे. या ठिकाणी आज दि. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीच्या घटनेदरम्यान पालिकेच्या इमारतीमधील सहा मजल्यावरील सुमारे ३००० कर्मचा-यांना व ३०० अभ्यागतांना अवघ्या अकरा मिनिटात इमारतीच्या खाली उतरविण्यात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले. तर सदर 'क्रमांक २ ची आग' अग्निशमन दलाने साधारणपणे १८ मिनीटात विझविली. या आगीदरम्यान एक पुरुष व एक महिला अशा दोन कर्मचा-यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना पालिकेच्याच नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही आपत्तीच्या सुव्यवस्थापनासाठी आपत्तीची संभाव्यता लक्षात घेऊन सराव करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आजच्या जागतिक आपत्ती घट दिनानिमित्त महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे 'आपत्ती व्यवस्थापन सराव' अर्थात 'मॉक ड्रिल' आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी
४ च्या सुमारास महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या तिस-या मजल्यावर 'स्मोक बॉम्ब'चा वापर करण्यात आला. यानंतर लगेचच महापालिकेच्या केंद्रीय उद्घोषणा कक्षातून सर्व कर्मचा-यांना तातडीने इमारतीच्या बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार विस्तारित इमारतीत काम करत असलेले सर्व कर्मचारी इमारतीच्या बाहेर पडून सुरक्षित स्थळी जमा झाले. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन विभागाने आयोजिलेले 'मॉक ड्रिल' बाबत समाधान व्यक्त केले.

बृहन्मुंबई क्षेत्रात अनेक प्रसंगी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीजन्य परिस्थिती मुंबईकर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अनुभवत असतात. तसेच या परिस्थितीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, मुंबई अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच विभागनिहाय यंत्रणा अहोरात्र तत्पर आणि दक्ष असतात. या तत्परतेची व दक्षतेची सतर्कता आजमावण्यासाठी आज दि. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे महापालिका मुख्यालयात 'मॉक ड्रिल'चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या मुख्यालयातील
बहुतांश कर्मचा-यांना वा अधिका-यांना या संदर्भातील कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नव्हती.

सायंकाळी ४ वाजून ०२ मिनिटांनी तिस-या मजल्यावर 'फ्लोअर मार्शल'ला आग लागल्याचे लक्षात येताच, त्याने त्वरित बृहन्मुंबई महापालिकेच्या 'आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून आग लागल्याची माहिती कळविली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुनियोजित कार्यपद्धतीनुसार अक्षरश: संबंधित यंत्रणा सतर्क व सुसज्ज केली. साधारणपणे ४ वाजून ५ मिनिटांनी अग्निशमन दलाचे एक फायर इंजिन व आणीबाणी वैद्यकीय सेवेच्या २ रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या.

यानुसार महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांची दोन्ही इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर रवानगी करण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी वॉकी-टॉकीच्या माध्यमातून एकमेकांशी समन्वय साधला. तसेच प्रत्येक मजल्यावरील
कर्मचारी-अधिकारी यांना लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करण्यास सांगून इमारतीच्या खालील मोकळ्या जागेवर जाण्याबाबत सूचना केल्या. यासोबतच पालिकेमध्ये उपलब्ध असलेल्या नागरी उद्घोषणा पद्धतीचा ताबा घेत याबाबतची माहिती महापालिकेतील सर्व कर्मचा-यांना उद्घोषणेद्वारे दिली. या उद्घोषणेत कर्मचा-यांना आग लागली असल्याचे सांगत त्यांच्याजवळ असलेल्या मौल्यवान सामानासह शांततेत व लिफ्टचा वापर न करता इमारतीखालील मोकळ्या जागेस जाण्यास सांगितले.

याच कालावधीत 'फ्लोअर मार्शल'ने महापालिकेच्या इमारतीत उपलब्ध असलेले पाण्याचे पंप वापरुन आग विझविणे सुरु केले. मुंबई अग्निशमन दल, फ्लोअर मार्शल व सुरक्षा अधिकारी हे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करित होते. महापालिका मुख्यालयात सुमारे ३ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचा-यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी फ्लोअर मार्शल, सुरक्षा रक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या दुस-या मजल्यावर महापालिकेच्या चारही अतिरिक्त आयुक्तांना देखील सुरक्षित स्थळी नेण्यात आले. फ्लोअर मार्शलने इमारतीतील सर्व मजले, कार्यालये व प्रसाधनगृहे येथे पाहणी करुन तेथे कोणताही कर्मचारी नसल्याची खातरजमा केली. दरम्यान मुंबई अग्निशमन दलाच्या
अधिका-याने ४ वाजून १८ मिनिटांनी आग विझल्याचे मेगा फोनद्वारेघोषित केले.

तथापि, इमारतीच्या दुस-या मजल्यावरील दोन महिला कर्मचा-यांना धुरामुळे घुसमटल्याचे निर्दशनास येताच तेथील फ्लोअर मार्शलने स्ट्रेचरचा वापर करित त्यांना प्रथोमचार कक्षात त्वरित आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात ४ वाजून १२ मिनिटांनी दाखल करण्यात आले.

बृहन्मुंबई क्षेत्रात अनेक प्रसंगी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्याचे मुंबईकर नियिमित ऐकत व अनुभवत असतात. तथापि, महापालिका कर्मचा-यानेही अशा आपत्तीप्रसंगी कोणत्या स्वरुपाची दक्षता व सजगता घ्यावी, याचे धडे आज झालेल्या 'जागतिक आपत्ती घट दिनी' 'याची देह याची डोळा' अनुभवला.

महत्त्वाची तळ टीप: ही 'मॉक ड्रिल' यशस्वीपणे पार पडली. तसेच वर उल्लेख केल्यानुसार या 'मॉक ड्रिल' दरम्यान कोणतीही आग लागलेली नव्हती अथवा त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या 'मॉक ड्रिल' दरम्यान जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णवाहिकेद्वारे महापालिकेच्या नायर रुग्णालयात नेणे, हा
देखील सरावाचाच भाग होता, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget