संगीत व कला अकादमीतर्फे आयोजित ‘संगीत सप्‍ताह’ चा समारोप

मुंबई ( ६ ऑक्टोबर ) : बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या शाळांमध्‍ये विद्यार्थ्‍यांना शिक्षणासोबत संगीत, नाटय, कलाकौशल्‍य, सांघिक खेळ आदीचे प्रशिक्षण देण्‍यात येत असून विद्यार्थ्‍यांचा एकप्रकारे सर्वांगीण विकास व्‍हावा, यासाठी महापालिकेच्‍या शिक्षकांची महत्‍वपूर्ण भूमिका असल्‍याचे प्रतिपादन उप महापौर हेमांगी वरळीकर यांनी केले.

‘जागतिक संगीत दिन’ निमित्ताने आयोजित या संगीत सप्‍ताहाचा समारोप आज शुक्रवार, (दिनांक ०६ ऑक्टोबर, २०१७) विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात झाला, त्‍यावेळी त्‍या विशेष पाहुण्‍या म्‍हणून बोलत होत्‍या. बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्‍या संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे मंगळवार, दिनांक ३ ऑक्टोबर, २०१७ ते शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोबर, २०१७ या कालावधीत संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या संगीत सप्‍ताहाचे २९ वे वर्ष आहे.

याप्रसंगी सन्‍माननीय पाहुणे म्‍हणून उप आयुक्‍त (शिक्षण) मिलिन सावंत, सन्‍माननीय अतिथी म्‍हणून ज्‍येष्‍ठ रंगकर्मी व सुप्रसिध्‍द अभिनेते जयंत सावरकर, ज्‍येष्‍ठ संगीततज्ञ पंडित मुरली मनोहर शुक्‍ल तसेच सुप्रसिध्‍द अभिनेते अजिंक्‍य देव, शिक्षणाधिकारी महेश पालकर हे मान्‍यवर उपस्थित होते.

उप महापौर हेमांगी वरळीकर मार्गदर्शन करताना पुढे म्‍हणाल्‍या की, आज याठिकाणी संगीत शिक्षकांनी जे उत्‍कृष्‍ट सादरीकरण केले ते खुपच अप्रतिम असून सं‍गीत विभागाची संपूर्ण टीमच अभिनंदनास पात्र
असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या विभागाच्‍या प्रगतीसाठी तसेच शिक्षकांच्‍या चांगल्‍या कार्यासाठी सुयश चिंतून शिक्षकांच्‍या हातून भविष्‍यकाळात चांगले विद्यार्थी घडो, अशी सदिच्‍छाही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.त्‍याचप्रमाणे शिक्षण विभागाच्‍या नूतनीकरणाच्‍या कामामध्‍ये संगीत कला अकादमीला हिंदू कॉलनीमधून इतरत्र स्‍थलांतर करु नये, अशी सूचना त्‍यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला शेवटी केली. 

सुप्रसिध्‍द रंगकर्मी जयंत सावरकर मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, १९५५ पासून रंगभूमीवर काम करीत असून अनेक दिग्‍गज कलावंतासोबत नाटक व संगीत नाटक करण्‍याची संधी मिळाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे संगीत व सध्‍द्भवना कशी हातात हात घालून चालतात, ते अनुभवण्‍याची संधी मिळाल्‍याचे त्‍यांनी विविध दाखले देऊन यावेळी सांगितले. कलावंत हा कितीही मोठा असो की छोटो असो त्‍याला प्रेक्षकांनी दिलेली दादच खरी कामाची पोचपावती असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले.

ज्‍येष्‍ठ संगीततज्ञ पंडित मुरली मनोहर शुक्‍ल यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, आम्‍ही त्यावेळी लावलेल्‍या रोपटयाचा आज मोठा वृक्ष झाला असून आज हा कार्यक्रम बघितल्‍यानंतर खुप आनंद झाला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. संगीत व कला अकादमीची भविष्‍यकाळात आणखी प्रगती व्‍हावी, अशी सदिच्‍छा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

उप आयुक्‍त (शिक्षण) मिलिन सावंत यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, व्‍यावसायिक कार्यक्रमालाही तोड देईल अश्‍याप्रकारचा दर्जेदार कार्यक्रम आपल्‍या संगीत शिक्षकांनी सादर केला असून शिक्षक खरोखरच अभिनंदनास पात्र असल्‍याचे ते म्हणाले. त्‍याचप्रमाणे निवेदिका मोडक यांनी विविध दृष्‍ठांतातून ज्‍याप्रकारे निवेदन केले ते खरोखरच श्रवणीय व आत्‍मचिंतन करणारे होते असे सांगून त्‍यांनी निवेदिका मोडक यांचा पुष्‍पगुच्‍छ देऊन यावेळी सत्‍कार केला. यापुढील काळात याप्रकारचे कार्यक्रम शिक्षण विभागाने विविध ठिकाणी आयोजित करुन जास्‍तीत जास्‍त पालकांपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न करावा अशी सूचनाही त्‍यांनी शिक्षण विभागास केली.

सुप्रसिध्‍द अभिनेते अजिंक्‍य देव यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, आजचा हा कार्यक्रम एकदम भारदस्‍त असा होता. यापूर्वी याप्रकारचा असा कार्यक्रम बघि‍तला नसून याठिकाणी बोलाविल्‍याबद्दल त्‍यांनी शिक्षण विभागाचे आभार मानले. जास्‍तीत जास्‍त पालकांपर्यंत याप्रकारचे असे चांगले कार्यक्रम पोहचणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगून निवेदिका मोडक यांचे तोंडभरुन कौतुक केले.

शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकातून संगीत कला विभागाच्‍या कामाचा आढावा घेतला. चांगल्‍या निवेदकालाही फि‍के पाडेल अश्‍याप्रकारचे निवेदन निवेदिका मोडक यांनी केले असून मुलांनी अतिशय सुंदररित्‍या विविध प्रकारची वाद्ये वाजविण्‍याचा प्रयत्‍न ‘हम पंची हे एक डाल के’ या कार्यक्रमातून केला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मुलांच्‍या संगीत क्षेत्रातील प्रगतीचा आढावा त्‍यांनी घेऊन भविष्‍यकाळात यापुढे असे चांगले दर्जेदार कार्यक्रम घेण्‍यात यावे अशी सूचना संगीत विभागाला केली.

या महोत्सवात मंगळवार, दिनांक ३ ऑक्टोबर, २०१७ रोजी ‘हम पंछी एक डाल के’ हा महापालिका शालेय विद्यार्थ्यांचा शतरंगी कार्यक्रम सादर करण्‍यात आला. बुधवार, दिनांक ४ ऑक्टोबर, २०१७ रोजी ‘संगीत पंडितराज जगन्‍नाथ’ हे विद्याधर गोखले लिखित संगीत नाटक संगीत व कला अकादमी सादर करण्‍यात आले. गुरुवार, दिनांक ५ ऑक्टोबर, २०१७ रोजी ‘ओडिसी नृत्‍याविष्‍कार’ ही नृत्यनाटिका सादर करण्यात आली. आज शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोबर, २०१७ रोजी संगीत सप्‍ताहाच्‍या समारोपप्रसंगी ‘मन वढाय वढाय’ विविध गीतांमधून घेतलेला मनावा ठाव असा हा कार्यक्रम सादर करण्‍यात आला. संगीत विभागाच्या प्राचार्या सुवर्णा कागल – घैसास यांनी या सर्व कार्यक्रमांचे दिग्दर्शन केले.

कार्यक्रमाला विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget