दिलीप वळसे पाटील हे सदगुणी राजकारणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( २७ ऑक्टोबर ) : माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे उत्तम प्रशासक व सद्गुणी राजकारणी असलेले नेते आहेत, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टी निमित्त रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, एखाद्या राजकीय नेत्याच्या नवीन पर्वाची सुरवात वयाच्या एकसष्टी नंतर सुरु होते. अशी नवी इनिंग पाटील यांची सुरु झाली आहे. विधीमंडळात त्यांच्यासोबत १७ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. संसदीय कार्यपद्धतीचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करणारा हा नेता आहे. उर्जामंत्री असताना त्यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. विजेची बिकट स्थिती असताना त्यांनी केलेल्या कामांची दखल सर्वांनीच घेतलेली आहे. त्यांनी महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन स्थापन केले तर खाजगी विद्यापीठाची मूळ कल्पना त्यांनी मांडली. विधानसभेचे अध्यक्ष असताना विधानमंडळाला एक दिशा दिली. शिक्षण, उर्जा, सहकार, दुग्धविकास या क्षेत्रात त्यांनी केलेले काम उत्तम दर्जाचे आहे. त्यांनी आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर गोरगरिबांच्या कल्याणासाठी केला.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, दिलीप पाटील हे अत्यंत हुशार राजकारणी आहेत. त्यांच्या जीवनात त्यांना अनेक पदे मिळाली, त्यांनी कधी उन्माद केला नाही. विधीमंडळ कामकाजाचा त्यांचा गाढा अनुभव आहे. शिक्षण, सहकार क्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी केली. सहकार क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवण्याची त्यांची एक हातोटी आहे. अलीकडच्या काळात एका नेत्यासोबत
शेवटपर्यंत काम करणे कठीण आहे. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहून एक निष्ठतेने काम केले. यापुढे त्यांनी आपल्यातील संवेदनशीलता आयुष्यभर जपावी. गरीब,शेतकरी,शेतमजूर यांच्यासाठी काम करत राहावं.

माजी केंद्रिय मंत्री तथा खासदार शरद पवार म्हणाले, दिलीप पाटील हा अत्यंत हुशार, मेहनती कार्यकर्ता आहे. पाणी, शेती, सहकार, शिक्षण, दुग्धव्यवसाय याचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे. अशा विविध क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांनी साखर कारखाना चांगल्याप्रकारे चालवून दाखवला. विधीमंडळातील त्यांचे काम नव्या राजकीय नेत्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे. आपल्या मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या सोयी, कशा चांगल्या उपलब्ध होतील यादृष्टीने त्यांनी काम करून आपल्या भागात विकास केला. ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या संदर्भात त्यांचा दृष्टीकोन नेहमीच सकारात्मक राहिला आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, ज्या-ज्या मंत्रीपदावर पाटील यांनी काम केले तेथील त्यांची कामगिरी उत्ततच राहीली. उर्जा मंत्री म्हणून काम करताना अत्यंत वाईट परिस्थितीत त्यांनी विजेचे आव्हान पेलले. व या उर्जेच्या क्षेत्रात मोलाचे काम केले. वैद्यकीय शिक्षणासाठी गरिबांच्या मुलांना बँकेमार्फत आर्थिक मदत मिळवून दिली. विधीमंडळातील त्यांच्या कामाचे कौतुक सर्वांनीच केलेले आहे.

सत्कारमूर्ती

सत्कारमूर्ती दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, मी आज जो काही आहे तो माझ्या तळागाळातील कार्यकर्त्यामुळे आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आहे. असे सांगून त्यांनी आतापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीबाबत अनुभव कथन केले.

खा.सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री, आ. सुनील तटकरे, आ. जयंत पाटील यांनी पाटील यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला. याच कार्यक्रमात वळसे पाटील यांच्यावरील दोन गौरव ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. दिलीप वळसे पाटील आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी किरण
पाटील यांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधीमंडळातील आणि संसदेतील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी पूर्वा वळसे पाटील यांनी आभार मानले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget