आता ऑनलाईन पध्दतीने आणि नॉमिनेशनदवारे खेळाडूंना पुरस्कार

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आणि अन्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावली जाहीर

मुंबई ( १७ ऑक्टोबर ) : महाराष्ट्रातील नामवंत, सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. आता यावर्षापासून क्रीडा पुरस्कार आणि अन्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारित नियमावली शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जाहीर केली. अधिक पारदर्शक करुन ऑनलाईन पध्दतीने आणि नॉमिनेशनदवारे खेळाडूंना पुरस्कार मिळणार असल्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

पुरस्कार नियमावलीमध्ये कालानुरुप आणखी काही बदल करणे आवश्यक असल्याने क्रीडा क्षेत्रातील एकविध संघटना तसेच खेळाडू यांच्याशी विचार विनिमय करुन सुधारणा करण्यासाठी क्रीडा आणि युवक सेवा आयुक्त्‍ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडा महर्षी, क्रीडापटू, क्रीडा कार्यकर्ते आणि संघटक, मार्गदर्शक, साहसी क्रीडापटू आणि दिव्यांग खेळाडू यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी
यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन 16 ऑक्टोबर 2017 रोजी सुधारीत नियमावली विहित करण्यात आली आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू),एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, उत्कृष्ट संघटक/कार्यकर्ते, जिजामाता पुरस्कार,
शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार या सर्व पुरस्कारांसाठी सर्वसाधारण नियमावली करण्यात आली आहे.

जीवनगौरव पुरस्कार पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, तीन लाख रुपये असे आहेृ तर इतर सर्व पुरस्कारासाठी एक लाख रुपये असे स्वरुप आहे.

पुरस्कारासाठी नियमावली :

अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर करावा. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही तसेच अर्ज केलेल्या व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड होईलच असे नाही. अर्जासोबत सादर केलेल्या झेरॉक्स प्रतीवर
स्वसाक्षांकित करुन प्रामाणित करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघास संलग्न असलेल्या राज्य पातळीवरील क्रीडा संघटनांनी इच्छूक व्यक्तींच्या कामगिरीच्या तपशीलाची पडताळणी करुन त्यांच्या कार्यकारिणी मंडळाने केलेल्या ठरावाच्या प्रतीसह प्रस्ताव, कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. पुरस्कार विभागून दिला जाणार नाही. एखादया वर्षी पुरस्कारासाठी पात्र अशी व्यक्ती आढळून न आल्यास पुरस्कार घोषित केला जाणार नाही. एखाद्या वर्षी हा पुरस्कार देण्यात न आल्यास पुढील वर्षासाठी जादाचा पुरस्कार म्हणून तो गणण्यात येणार नाही. सदर पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आल्यास सदर व्यक्ती अपात्र समजण्यात येईल. पुरस्कार रद्द करण्याचे अधिकार राज्य शासनास राहतील आणि तसे घडल्यास पुरस्कार मिळालेली व्यक्ती सदर पुरस्कार
आयुक्तांना परत करेल. पुरस्कार अर्जामध्ये सादर केलेली माहिती खोटी असल्याचे सिध्द झाल्यास, अशा व्यक्तींना देण्यात आलेला पुरस्कार परत घेण्यात येईल आणि त्यांचे विरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल.

पुरस्कार निवड करण्यासाठी समिती

एकविध खेळाच्या राज्य संघटनेकडून आलेले अर्ज अणि वैयक्तिक अर्ज हे संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जाची छाननी क्रीडा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली समिती करेल आणि शासनाकडे करावयाच्या शिफारशीसाठी पुरस्कार निवड समिती समोर ठेवतील. क्रीडा आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील. क्रीडा सहसंचालक, विभागीय उपसंचालक, राज्यस्तरीय एकविध खेळ संघटनेचे प्रतिनिधी, संबंधित खेळामध्ये प्राविण्य मिळविलेले खेळाडू, संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी हे
सदस्य असतील. तर क्रीडा उपसंचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

क्रीडा आयुक्त सर्व अर्जांची पुन:श्च छाननी केलेले अर्ज प्रमाणपत्राच्या पात्र आणि अपात्रेसह संकेतस्थळावर प्रसिध्द करुन सूचना आणि हरकती 15 दिवसात मागवतील. यावेळी एकविध संघटनेने अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी एखादा खेळाडू अथवा एकही खेळाडू पात्र नाही असे त्याचे मत असेल तर तसे संकेतस्थळावर नोंदविण्यात येईल. तदनंतर अंतिम शिफारशीसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार निवड समितीसमोर ठेवण्यात येईल. प्रस्तावित असलेल्या पुरस्कारार्थींची अंतिम यादी घोषित करण्यापूर्वी संकेतस्थळावर
प्रसिध्द केली जाईल. त्याबाबत कोणाचे आक्षेप किंवा हरकती असल्यास 15 दिवसात लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक असून अन्यथा पुरस्कारार्थींची अंतिम यादी घोषित करण्यात येईल.घोषित यादीनंतर कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.

पुरस्कार निवडीचे वेळापत्रक

दरवर्षी 25 ऑक्टोबर पूर्वी वृत्तपत्रात प्रसिध्दी देऊन क्रीडा आयुक्त यांनी क्रीडा संघटक, मार्गदर्शक आणि खेळाडू यांच्याकडून 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागवावेत. दरम्यानच्या कालावधीत सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी
यांनी जिल्हयातील सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांची सभा घेऊन पुरस्काराबाबत सर्व स्थानिक वृत्तपत्रात बातमी दयावी. अर्जदाराने www.mumbaidivsports.com वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज
करावा. ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे 5 डिसेंबरपूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. जसे प्रस्ताव येतील त्या प्रस्तावांसोबतची प्रमाणपत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि उपसंचालक यांनी तपासावीत. यानंतर क्रीडा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती सर्व अर्जांची पडताळणी करेल. क्रीडा आयुक्त यांनी अर्जांची छाननी झाल्यावर पात्र आणि अपात्र उमेदवारांची नावे एकूण गुणांसह
संकेतस्थळावर प्रसिध्द करुन हरकती आणि आक्षेप नोंदविणे अपेक्षित आहे.

नमूद करण्यात आलेल्या दिनांकानंतर प्राप्त हरकती, आक्षेप आणि सूचनांचा विचार केला जाणार नाही. राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत छाननी पूर्ण झालेल्या आणि शिफारस करावयाच्या नावांची अंतिम यादी तयार करण्यात येईल.

दरवर्षी 18 फेब्रुवारी रोजी पुरस्कार जाहीर करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने पूर्वनियोजित ठिकाणी आणि वेळी पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जाईल. पुरस्कार प्रक्रियेच्या
वेळापत्रकामध्ये परिस्थितीनुरुप बदल करण्याचे अधिकार राज्य शासनास असतील. राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती क्रीडा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. यामध्ये राज्यमंत्री हे या समितीचे उपाध्यक्ष असतील. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव हे या समितीमध्ये सदस्य असतील तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील पदमविभूषण, पदमभूषण, पदमश्री तसेच राजीव गांधी खेलरत्न आणि द्रोणाचार्य पुरस्काराची यामधील तज्ज्ञ हे आशासकीय सदस्य म्हणून घेतले जातील. महाराष्ट्र ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक असोसिएशनचा प्रतिनिधी हा अशासकीय सदस्य असेल तर क्रीडा आयुक्त हे सदस्य सचिव असतील. या समितीत अशासकीय सदस्यांची नियुक्ती पुढील तीन वर्षांकरिता राहील.

ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/कार्यकर्ते आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा आणि खेळासाठी आपले सर्वस्व अर्पण करुन महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनात अतुलनीय असे स्थान
संपादन केले आहे अशा क्रीडा महर्षिंचा गौरव करणे हे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराचे उदि्दष्ट असून वयाची 60 वर्षे पूर्ण करणाऱ्या क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक अशा एका व्यक्तीला हा पुरस्कार
दरवर्षी देण्यात येईल. जीवनगौरव पुरस्कारासाठी संबंधितांकडून अर्ज न मागविता, त्यांचे नाव राज्य शासनाच्या पुरस्कार निवड समितीस क्रीडा आयुक्त किंवा क्रीडा संचालक स्वत:हून माहिती घेऊन सुचवतील. तसेच राष्ट्रीय क्रीडा महासंघाला संलग्न राज्य संघटना, इतर क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्ती हे शासन, आयुक्त/संचालक यांच्याकडे पूर्ण माहितीसह मुदतीपूर्वी पाठवू शकतील. सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी आणि विभागीय
उपसंचालक हे त्यांच्या अधिकार क्षेत्रातील अशा प्रकारच्या नामवंत व्यक्तींची माहिती एका स्वतंत्र नोंदवहीमध्ये ठेवतील.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचा दर्जा वाढवून राज्याचा लौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना उत्तेजन देण्यासाठी, क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शनपर अतुलनीय कामगिरी बजावून
खेळाडूंना घडवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यास उदयुक्त करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकाचा सन्मान उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार देऊन करण्यात येतो. एका वर्षात जास्तीत
जास्त तीन पुरस्कार देण्यात येतील. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकामधून निवड झालेल्या महिला क्रीडा मार्गदर्शकास देण्यात येणारा पुरस्कार हा जिजामाता पुरस्कार म्हणून गणण्यात येईल. या पुरस्कारासाठी विविध खेळप्रकार निश्चित करण्यात आले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंचा गौरव शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने करण्यात येतो. दरवर्षी एका खेळात एक महिला आणि एक पुरुष खेळाडू यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. जिम्नॅस्टीक्समध्ये 2 गटांपैकी आणि जलतरणमध्ये 3 गटांपैकी एका गटातील एक महिला आणि एक पुरुष खेळाडूची या पुरस्कारासाठी प्रतिवर्षी चक्राकार पध्दतीने निवड करण्यात येईल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने तसेच भारतीय शालेय खेल महासंघाने ज्या खेळांना मान्यता दिली आहे अथवा आगामी काळात ज्या ज्या खेळांना मान्यता प्रदान करेल असे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात खेळले जाणारे खेळ शासनाच्या मान्यतेने पुरस्काराकरिता पात्र राहतील. या पुरस्कारासाठी खेळाडूंना राज्य
संघटनेदवारे अथवा वैयक्तिरित्या अर्ज करता येईल. अर्ज करताना सोबत खेळाडूंना सलग पाच वर्षातील राजय/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळविलेल्या क्रीडा नैपुण्याबाबतची कामगिरीबाबतच्या प्रमाणपत्राच्या
झेरॉक्स प्रती सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेल्या असाव्यात.

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते),जिल्हा क्रीडा पुरस्कार या सर्व पुरस्कारासाठीचे नियम ठरविण्यात आले आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget