व्यवसाय विषयक परवानग्यांसाठी ऑनलाईन 'एक खिडकी पद्धती' कार्यान्वित

व्यवसाय सुरु करण्यासाठी परवाना मिळविणे झाले अधिक सुलभ


मुंबई ( १८ ऑक्टोबर ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 'इज ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत विविध व्यवसायिक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी महापालिका सातत्याने विविध उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे. या श्रृंखले अंतर्गत आता महापालिका क्षेत्रात व्यवसाय सुरु करण्यासाठी महापालिकेद्वारे देण्यात येणारे विविध परवाने मिळविण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. या ऑनलाईन एक खिडकी पद्धती अंतर्गत महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध सुविधेनुसार व्यवसाय परवान्यासाठी अर्ज करणे, शुल्क भरणे ते परवाना मिळण्यापर्यंतची सर्व कार्यवाही घरबसल्या करणे अर्जदाराला शक्य झाले आहे. यापैकी दुकाने व आस्थापना खात्याशी संबंधित परवानग्या; तर सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात येणा-या उपहारगृह विषयक परवानग्यांची प्रक्रिया यापूर्वीच ऑनलाईन करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात व्यवसाय सुरु करताना महापालिकेच्या संबंधित खात्याद्वारे परवाना घ्यावा लागतो. यामध्ये अनुज्ञापन खात्याद्वारे दिला जाणारा व्यापार परवाना (Trade License), दुकाने व आस्थापना खात्याद्वारे दिल्या जाणा-या परवानग्या, सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे दिल्या जाणा-या आरोग्यविषयक परवानग्या आणि इमारत व कारखाने खात्याद्वारे दिल्या जाणा-या कारखाना (Factories) विषयक परवानग्यांचा समावेश आहे. तसेच आपल्या दुकानाचा किंवा व्यवसायाचा फलक निऑन साईन पद्धतीचा करावयाचा झाल्यास त्याची परवानगीदेखील महापालिकेकडून घ्यावी लागते. व्यवसायाच्या प्रकारानुसार यापैकी एक किंवा अधिक परवानग्या महापालिकेकडून घ्याव्या लागतात व यासाठी संबंधित अर्जदाराला महापालिकेच्या त्या-त्या खात्याकडे अर्ज करावा लागतो.

व्यवसाय विषयक परवानग्या देणारी महापालिकेची ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने अर्जदारास त्या-त्या ठिकाणी जाऊन अर्ज करणे यात अधिक प्रमाणात कालावधी खर्च होण्यासोबतच शारीरिक मेहनत देखील होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिकेने आता या परवानग्यांसाठी ऑनलाईन एक खिडकी
पद्धती कार्यान्वित केली आहे. यामुळे महापालिका क्षेत्रात कोणताही व्यवसाय सुरु करावयाचा झाल्यास आता ऑनलाईन एक खिडकी पद्धतीचा वापर करुन घरबसल्या महापालिकेच्या परवानग्या मिळविणे शक्य झाले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील 'ऑनलाईन सर्व्हिसेस' (Online Services) या लिंक अंतर्गत 'न्यू बिझनेस ऍप्लीकेशन' (New Business Application) या लिंक अंतर्गत नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे 'स्कॅन' करुन 'अपलोड' करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्यामुळे अर्जदाराचा छायाप्रति काढण्याचा वेळ व खर्च वाचणार आहे.

ऑनलाईन एक खिडकी पद्धती अंतर्गत अर्ज केल्यानंतर सदर अर्जावर संबंधित खात्याद्वारे केली जाणारी प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. यामुळे 'फाईल मूव्हमेंट' कालावधी देखील मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. यासोबतच महापालिकेकडे भरणा करावयाचे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महापालिकेच्या स्तरावरील आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित परवाना देखील ऑनलाईन पद्धतीनेच मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रक्रियेच्या टप्प्यानुसारची
माहिती अर्जदारास इमेल व लघुसंदेशाद्वारे (SMS) देखील पाठविली जाणार आहे.

तथापि, या सर्व प्रक्रियेच्या अनुषंगाने व इतर आवश्यक त्या तांत्रिक सुधारणांसाठी महापालिकेचे संकेतस्थळ दि. १७ ते ३० ऑक्टोबर २०१७ दरम्यान मर्यादित पद्धतीने सुरु असल्याने या कालावधी नंतर म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०१७ पासून 'ऑनलाईन एक खिडकी पद्धती' सुरु होईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget