अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील भांडवली खर्चाच्या विनियोगात लक्षणीय वाढ

गेल्यावर्षी सप्टेंबर पर्यंत १०.१२ टक्के झाले होते खर्च; तर यावर्षी २३.७९ टक्के खर्च

रस्ते खात्याचा भांडवली खर्च १.२० टक्क्यांवरून ४१.५४ टक्क्यांवर

मुंबई ( ३० ऑक्टोबर ) : महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार भांडवली खर्चाच्या तरतुदींसाठी असलेल्या ८,१२१.५८ कोटी रुपयांच्या रकमेपैकी ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत सुमारे २३.७९ टक्के म्हणजेच १,९३१.९९ कोटी रुपये एवढी रक्कम खर्च झाली आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात भांडवली खर्चासाठी १२,९५७.८३ कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली होती. ज्यापैकी १,३१०.७५ कोटी रुपये म्हणजेच १०.१२ टक्के भांडवली खर्च ३० सप्टेंबर २०१६ पर्यंतच्या पहिल्या सहामाहीत झाला होता. यातही विशेष नोंद घ्यावी अशी बाब म्हणजे पालिकेच्या महत्त्वाच्या खात्यांशी संबंधित विकास कामे जोमाने सुरु असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भांडवली खर्चाच्या विनियोगात लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पर्जन्यजल वाहिन्या खाते ६३.९९ टक्के, विकास नियोजन खाते ६३.९४ टक्के, प्रमुख रुग्णालये ५६.६६ टक्के, रस्ते व वाहतूक खाते ४१.५४ टक्के, पूल खाते २८.२० टक्के, प्राथमिक शिक्षण २२.२५ टक्के, सार्वजनिक आरोग्य खाते १३.५८ टक्के, घनकचरा व्यवस्थापन खाते ९.५५ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग पहिल्या सहामाही दरम्यान करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या वित्त खात्याद्वारे देण्यात आली आहे.

महापालिकेच्या यावर्षीच्या वास्तवदर्शी अर्थसंकल्पाचे महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांच्या स्तरावर सातत्याने संनियंत्रण करण्यात येत असून त्यासाठी नियमितपणे आढावा बैठका देखील घेतल्या जात आहेत. या बैठकांना अतिरिक्त आयुक्त व संबंधित उपायुक्त् यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख देखील उपस्थित असतात. तसेच प्रत्येक बैठकीत निर्धारित कृती आराखड्यानुसार झालेली कामे व करावयाची कामे यांचाही आढावा घेतला जात असतो.

चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये रस्ते व वाहतूक खात्याच्या (Roads and Traffic Department) १०७८.६१ कोटी रुपयांची तरतूद भांडवली खर्चासाठी करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ४४८.०५ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ४१.५४ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात रस्ते व वाहतूक खात्याच्या भांडवली खर्चासाठी २८८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ३४.६० कोटी, अर्थात १.२० टक्के
एवढी रक्कम खर्च झाली होती. विशेष म्हणजे गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात रस्ते व वाहतूक खात्याच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या २८८६ कोटी रुपयांच्या तरतूदीपैकी सुमारे ४७६ कोटी रुपये म्हणजेच १६.४९ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.


त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये केवळ विकास नियोजन खात्याशी (Development Plan Department) संबंधित भांडवली खर्चासाठी ५५१.५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ३५२.६४ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ६३.९४ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात विकास नियोजन खात्याच्या भांडवली खर्चासाठी ७२२.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत १५८.९३ कोटी, अर्थात २२ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती. विशेष म्हणजे गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात विकास नियोजन खात्यासाठीच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या ७२२.३७ कोटी रुपयांच्या तरतूदीपैकी २६१.४६ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ३६.१९ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता. या आकडेवारीत केवळ विकास नियोजन खात्याशी थेटपणे संबंधित असणा-या बाबींचा समावेश आहे.

तसेच चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये प्रमुख रुग्णालयांशी (Major Hospitals) संबधित भांडवली खर्चासाठी १९०.४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत १०७.९३ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ५६.६६ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्रमुख रुग्णालयांच्या भांडवली खर्चासाठी २३७.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ५४.६९ कोटी, अर्थात १९.९६ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती. विशेष म्हणजे गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात प्रमुख रुग्णालयांच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या २३७.९७ कोटी रुपयांच्या तरतूदीपैकी २०२.८३ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ७४ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.

त्याचबरोबर चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये पूल खात्याच्या (Bridges Department) भांडवली खर्चासाठी २२०.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ६२.२७ कोटी रुपये म्हणजेच सुमारे २८.२० टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात पूल खात्याच्या भांडवली खर्चासाठी ४३७.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ३७.४७ कोटी, अर्थात ८.५७ टक्के एवढी रक्कम खर्च
झाली होती. विशेष म्हणजे गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात पूल खात्याच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या ४३७.१९ कोटी रुपयांच्या तरतूदीपैकी सुमारे ९१.०६ कोटी रुपये म्हणजेच २०.८३ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.

तसेच चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये प्राथमिक शिक्षण विषयक (Primary Education) भांडवली खर्चासाठी ३५८.०९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ७९.६६ कोटी रुपये म्हणजेच सुमारे २२.२५ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ३२४.५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ३०.२२ कोटी, अर्थात ९.३१ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती. विशेष म्हणजे गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षण विषयक भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या ३२४.५७ कोटी रुपयांच्या तरतूदीपैकी सुमारे १७४.२१ कोटी रुपये म्हणजेच ५३.६७ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.

चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सार्वजनिक आरोग्य खात्याशी संबंधित (Public Health Department) भांडवली खर्चासाठी ११८.६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत १६.११ कोटी रुपये म्हणजेच सुमारे १३.५८ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात २१९.५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ६.६० कोटी, अर्थात ३.०१ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती. विशेष
म्हणजे गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात सार्वजनिक आरोग्य खात्याच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या २१९.५९ कोटी रुपयांच्या तरतूदीपैकी सुमारे ३९.५३ कोटी रुपये म्हणजेच १८ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.

चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या (Solid Waste Management Department) भांडवली खर्चासाठी १९१.७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत १८.३० कोटी रुपये म्हणजेच सुमारे ९.५५ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.
तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात याच खात्यासाठी २३७.३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत १८.७९ कोटी, अर्थात ७.९२ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती. विशेष म्हणजे गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात घनकचरा व्यवस्थापन विषयक भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या २३७.३८ कोटी रुपयांच्या तरतूदीपैकी सुमारे ७६.६७ कोटी रुपये म्हणजेच ३२.३० टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.

त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये पर्जन्यजल वाहिन्या खात्याशी (Storm Water Drainage) संबंधित भांडवली खर्चासाठी ४४६.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत २८५.६५ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ६३.९९ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात
आला आहे.

महापालिकेचे सर्व विभाग व खाती यांच्याशी संबंधित भांडवली खर्चासाठी मागील संपूर्ण आर्थिक वर्षात १२,९५७.८३ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. यापैकी सुमारे ३२.०२ टक्के म्हणजेच ४,१४९.३९ एवढी रक्कमेचा विनियोग १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या आर्थिक वर्षात करण्यात आला होता, अशीही माहिती महापालिकेच्या वित्त खात्याद्वारे देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget