मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेही मतमोजणी - राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई ( ४ ऑक्टोबर ) : नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी होणाऱ्या मतदानाकरिता एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर
करण्यात येणार आहे; तसेच या प्रभागात नेहमीच्या मतदान यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेदेखील मतमोजणी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते. सहारिया यांनी सांगितले की, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एकूण 20 पैकी चार सदस्य संख्या असलेल्या 19 प्रभागांतून सोडतीद्वारे प्रभाग क्र. 2 ची व्हीव्हीपॅट वापरण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रभागाच्या सर्व 37 मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जाईल. हा वापर प्रायोगिक व प्रथमच असल्यामुळे या प्रभागातील मतमोजणी नेहमीच्या मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटमधून प्राप्त होणाऱ्या चिठ्ठ्यांद्वारेदेखील केली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2013 मध्ये दिले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या यंत्राचा वापर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 400 व्हीव्हीपॅट खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या
कंपनीला कळविले होते; त्यानुसार कंपनीने 400 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे खरेदी तत्वावर व्हीव्हीपॅट पुरविण्यास कंपनीने नंतर असमर्थता दर्शविली. मात्र या
निवडणुकीत प्रायोगिक तत्वांवर काही व्हीव्हीपॅटच्या वापरास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, अशी विनंती कंपनीने केली होती, अशी माहिती सहारिया यांनी दिली.

कंपनीच्या विनंतीचा सखोल विचार करुन नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एका प्रभागात हे व्हीव्हीपॅट प्रायोगिक तत्वावर वापरण्यास कंपनीला परवानगी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्यानुसार कंपनीने 70 व्हीव्हीपॅट 20 सप्टेंबर 2017 रोजी नांदेड महानगरपालिकेकडे पाठविले. व्हीव्हीपॅटच्या वापरासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची व इतर मान्यवरांची बैठक घेतली होती. या बैठकीतच सर्वांच्या उपस्थितीत सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 2 ची निवड करण्यात आली. या
व्हीव्हीपॅटच्या वापराबाबतचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण व त्यांची देखरेख कंपनीचे अधिकारी महानगरपालिका आयुक्तांशी सल्लामसलत करुन करणार आहेत. मतमोजणीसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीची मतमोजणी प्रक्रियेवर बारकाईने नजर असेल. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर हे सर्व व्हीव्हीपॅट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया परत घेऊन जाणार आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेत एकूण 20 प्रभाग आणि 81 जागा आहेत. 19 प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग 5 सदस्यांचा आहे. एकूण 3 लाख 96 हजार 872 मतदार असून त्यांच्यासाठी 550 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.2 वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी 734 मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये मतदारांची एकूण संख्या 20 हजार 307 इतकी आहे. त्यांच्यासाठी 37 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी 550 मतदार असतील, असे ते म्हणाले.

81 जागांसाठी 578 उमेदवार

एकूण 81 जागांसाठी 891 उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यातील 313 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता 578 उमेदवार आहेत. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 26 उमेदवार आहेत. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सहारिया यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget