अनधिकृत फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात येणा-या दंड रकमेत दुपटीने वाढ

विमोचन आकारात देखील करण्यात आली १०० टक्क्यांची वाढ

अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक प्रभावी होण्यास होणार मदत

मुंबई ( २० ऑक्टोबर ) : अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई दरम्यान फेरीवाल्यांकडून मालाच्या प्रकारानुसार व वजनानुसार विमोचन आकार व दंड महापालिकेद्वारे वसूल केला जातो. अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी पालिकेला येणा-या खर्चापोटी विमोचन आकार (Redemption Charges) वसूल केला जातो. तर सार्वजनिक जागेत अनधिकृतपणे व्यवसाय केल्यापोटी दंड वसूल केला जातो. दंडाची रक्कम ही विमोचन आकाराच्या रकमेनुसार ठरते. विमोचन आकाराची रक्कम व दंडाची रक्कम या दोन्हींमध्ये आता दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी असणारे दर हे १४ मार्च २०१२ च्या परिपत्रकानुसार लागू करण्यात आले होते. ज्यात आता सुमारे साडेपाच वर्षांनी प्रथमच सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार सुधारित रकमेबाबत अनुज्ञापन खात्याद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रशासकीय प्रस्तावास महापालिका आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिली असून दि. १८ ऑक्टोबर २०१७ पासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक भागात उद्भवणा-या अनधिकृत फेरीवाल्यांना प्रतिबंध व्हावा, यादृष्टीने महापालिकेद्वारे सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. याअंतर्गत अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई अचानकपणे करणे, त्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यासारख्या अनेक बाबी महापालिकेच्या स्तरावर केल्या जात आहेत. याच श्रृंखले अंतर्गत आता अनधिकृत फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात येणारा दंड व विमोचन आकार यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळे फेरीवाल्यांच्या उपद्रवास प्रतिबंध होण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याचे उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी १० किलोपर्यंतच्या मालासाठी अनधिकृत फेरीवाल्यांकडून २४० रुपये विमोचन आकार वसूल केला जात असे, त्याबाबतीत आता त्यांच्याकडून ४८० रुपये वसूल केले जाणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त २ हजार रुपये दंड देखील वसूल केला जाणार आहे. तसेच अनधिकृत उसाचे चरक, कुल्फी वा आइसक्रीम हातगाडी इत्यादीकडून यापूर्वीच्या २० हजार रुपये आकाराऐवजी आता ४० हजार रुपये वसूल केले जाणार असून याव्यतिरिक्त १० हजार रुपये दंड देखील वसूल केला जाणार आहे.

अनधिकृतपणे शहाळी विकणा-यांकडून यापूर्वी प्रती शहाळे रु. १० एवढा विमोचन आकार वसूल केला जात असे. हा विमोचन आकार आता रुपये २० एवढा करण्यात आला आहे. दुचाकी सायकल वरुन विकण्यात येणा-या वस्तू वा खाद्यपदार्थांसाठी असणारा विमोचन आकार आता बाराशे रुपयांवरुन चोवीसशे रुपये एवढा करण्यात आला आहे.

अनधिकृत लोखंडी स्टॉल साठी असणारा यापूर्वीचा रुपये १० हजारांचा विमोचन आकार आता दुप्पट म्हणजेच २० हजार रुपये करण्यात आला आहे. तर अनधिकृत चक्रीसाठी (मेरी गो राऊंड) असणारा विमोचन आकार देखील १,२०० रुपयांवरुन २,४०० रुपये एवढा करण्यात आला आहे.

विमोचन आकाराच्या रकमेव्यतिरिक्त महापालिकेद्वारे दंड रक्कम देखील वसूल करण्यात येते. ही दंड रक्कम विमोचन आकारावर आधारित असते. या दंड रकमेत देखील आता दुपटीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ज्यानुसार यापूर्वी रुपये ३०० रुपये विमोचन आकार असल्यास त्यावर एक हजार रुपये दंड आकारला जात होता. आता ही रक्कम रुपये २ हजार रुपये एवढी करण्यात आली आहे. तर ज्याप्रकरणी दंड रुपये २ हजार असायचा, ती रक्कम आता ४ हजार करण्यात आली आहे. तर यापूर्वीच्या ४ हजारांच्या दंड रकमेत देखील वाढ करण्यात येऊन ती आता ८ हजार रुपये एवढी करण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget