लष्करामार्फत एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन, करी रोड रेल्वे स्टेशन आणि अंबिवली रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलाचे होणार बांधकाम

मुंबई ( ३१ ऑक्टोबर ) : एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन पादचारी पुलाच्या (फूट ओव्हर ब्रीज) जागेची पाहणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली आणि पुलाच्या आराखड्याची माहिती घेतली. या पुलासह करी रोड रेल्वे स्टेशन आणि अंबिवली रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलांची बांधणी लष्करामार्फत 31 जानेवारी 2018 पर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी सीतारामन यांनी केली.

संरक्षणमंत्री सीतारामन म्हणाल्या, सैन्यदलाकडून लष्करी कारणासाठी तसेच आपत्‍ती काळामध्ये अशी बांधकामे होत असतात. मात्र एलफिन्स्टन येथे झालेली दुर्घटना अत्यंत मोठी होती. मुंबई येथे देशातील
अनेक भागातील नागरिक कामानिमित्त राहतात. या दुर्घटनेत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. हे लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे केलेली विनंती लक्षात घेऊन लष्कराने हे काम करावे असे
ठरविण्यात आले. नागरी कारणासाठी लष्कराकडून बांधकाम होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही सीतारामन म्हणाल्या.

एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन येथे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी होती, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून राज्य शासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. नेहमीच्या कार्यपद्धतीने येथे नवीन पुल बांधावयाचे काम हाती घेतले असते तर त्यास खूप कालावधी जातो. मात्र भारतीय सेनेकडे अशा प्रकारचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचे कौशल्य असल्याने संरक्षण मंत्रालयाकडे हे काम करण्याची विनंती करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने ही विनंती मान्य केली. याअंतर्गत एलफिन्स्टन रोड येथील पुलासोबतच करी रोड रेल्वे स्टेशन आणि अंबिवली रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलांचे कामही लष्कराकडून केले जाणार आहे.

यावेळी पियुष गोयल म्हणाले, एलफिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर रेल्वेकडून उपनगरीय रेल्वे स्थानकांची पाहणी करुन सुरक्षाविषयक पाहणी केली. त्यानुसार कोणत्या उपाययोजना करता येतील तसेच आवश्यक सुधारणांबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाकडे तीन रेल्वे स्टेशन वरील पादचारी पुलांचे काम हाती घेण्याची विनंती केली. लष्कर देशाच्या संरक्षणासाठी सतत तत्पर असतेच मात्र हे पुलांच्या कामानिमित्ताने राष्ट्रबांधणीचे काम हाती घेऊन एक नवीन आदर्श घालून दिला आहे, असेही ते म्हणाले. शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, राज पुरोहित, लष्कराचे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातचे जनरल ऑफ कमांड जनरल विश्वम्बर, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, मध्य रेल्वेचे
महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget