ऑनलाईन इमारत बांधकाम परवानग्यांबाबत पोर्टब्लेअरची मुंबईला सहकार्यास्तव विनंती

केंद्र सरकारच्या गृह व नगर विकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार विनंती

महापालिका आयुक्तांनी केली अभियंता संजय निर्मळ यांची नेमणूक

मुंबई ( ३१ ऑक्टोबर ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात इमारत बांधकाम परवानग्यांचे सुलभीकरण १ जानेवारी २०१६ पासून प्रत्यक्षात आले आहे. तसेच ही प्रक्रिया यापूर्वीच ऑनलाईन करण्यात आली आहे. देशातील या प्रकारच्या या पहिल्या प्रयोगाची दखल आता राष्ट्रीय स्तरावर देखील घेतली जात आहे. याबाबत केंद्र सरकारच्या गृह व शहरी कार्य विभागाच्या (Housing & Urban Affairs) सूचनेनुसार पोर्टब्लेअर पालिकेने नुकतीच बृहन्मुंबई महापालिकेला सहकार्यास्तव विनंती केली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेच्या विकास व नियोजन खात्यातील संबंधित सहाय्यक अभियंता संजय निर्मळ यांची पोर्टब्लेअर पालिकेला यथायोग्य सहकार्य करण्यास्तव नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

पोर्टब्लेअर पालिकेचे सचिव यशपाल गर्ग यांचे विनंती पत्र इ-मेल द्वारे नुकतेच महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे. सदर पत्रात नमूद केल्यानुसार पोर्टब्लेअर शहरातील बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया ऑनलाईन करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. याबाबत बृहन्मुंबई महापालिकेचे सहकार्य घेण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या गृह व शहरी कार्य विभागाच्या सचिवांनी पोर्टब्लेअर पालिकेला दिल्या होत्या.

त्यानुसार बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवरच पोर्टब्लेअर पालिकेने इमारत बांधकाम परवानग्या आनलाईन करण्याच्या कार्यवाहीस सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पोर्टब्लेअर पालिकेने हे काम करु इच्छिणा-यांकडून देकार मागविताना (RFP) बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर काम करावयाचे असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यानुसार पोर्टब्लेअर पालिकेची निविदा पूर्व बैठक १० नोव्हेंबर २०१७ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला बृहन्मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिका-यांना पाठवावे, अशी विनंती पोर्टब्लेअर
पालिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी विकास व नियोजन खात्यातील सहाय्यक अभियंता श्री. संजय निर्मळ यांची सदर कामासाठी नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील इमारत बांधकाम परवानग्यांचे सुलभीकरण व ऑनलाईन पद्धती प्रत्यक्षात आल्यानंतर सदर परवानग्यांची संख्या ११९ वरून ५८ इतकी यापूर्वीच कमी झाली आहे. परिणामी वर्ष २०१६ पासून एकूणच परवानगी प्रक्रिया देखील वेगवान झाल्याने प्रक्रिया कालावधी देखील एका वर्षावरुन ६० दिवसांवर आला आहे. तसेच इमारत बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असल्यामुळे बांधकाम व्यवसायिकांना तसेच घर खरेदी करणा-या नागरिकांना देखील संबंधित माहिती सहजपणे उपलब्ध होत असल्याने पारदर्शकता जपण्यास देखील मदत होत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget