ऑरेंज सिटी नागपूर आता ऐरोसिटी म्हणून ओळखली जाणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत-फ्रान्स संबंधाचा नवा अध्याय 

हा ऐतिहासिक दिवस नागपूर, विदर्भ, महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित

नागपूर ( २७ ऑक्टोबर ) : भारत आणि फ्रान्सच्या संबंधाचा एक नवा अध्याय आजपासून प्रारंभ झाला असून ऑरेंजसिटी म्हणून असलेली नागपूरची ओळख आता जगभरात ऐरोसिटी म्हणून होईल. आजचा हा ऐतिहासिक दिवस नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या जनतेला आपण समर्पित करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मिहान परिसरात डसॉल्ट रिलायन्स ऐरोस्पेस लिमिटेड या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, फ्रान्सच्या
संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली, फ्रान्सचे राजदूत ॲलेक्झांडर झिगलर, प्रख्यात उद्योगपती अनिल अंबानी, डसॉल्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आज जगाला अधिक समृद्ध करण्यासाठी लोकशाही राष्ट्रांनी परस्परांना अधिक सहकार्य करण्याची गरज आहे. या प्रकल्पासाठी अनिल अंबानी यांनी नागपूरची निवड केली, यासाठी मी
त्यांचा अतिशय आभारी आहे. हा निर्णय सुद्धा त्यांनी अवघ्या पाच मिनिटात घेतला होता.

मुख्यमंत्री म्हणाले, आज या कार्यक्रमासाठी मुंबईहून येत असताना आमच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे विमान पुन्हा मुंबईला परतले. त्यावेळी या कंपनीचे विमान तेथे होते. त्यामुळे फाल्कनच्या विमानातूनच आम्हांला नागपूरला येण्याचा योग आला. आता हेच विमान नागपूर येथे तयार होईल. हा दिवस येत्या पाच वर्षात पाहायला मिळेल, याची मला खात्री आहे. आज भारत आणि फ्रान्स दरम्यान, रिलायन्स आणि डसॉल्ट दरम्यान सहकार्याचे नवे पर्व सुरु आहे. त्यांना सर्व ते सहकार्य करण्याची राज्य सरकारची तयारी
आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. आणि हा दिवस संपूर्ण राज्याच्या जनतेला मी समर्पित करतो.

वर्षभरात पडली 59 हजार कोटीच्या कराराच्या दिशेने पाऊले भारत आणि फ्रान्स सरकार दरम्यान, 36 रॉफेल लढावू विमानांच्या निर्मितीसाठी 23 सप्टेंबर 2016 मध्ये करार करण्यात आला होता. सुमारे 59 हजार कोटीचा हा करार आहे. या लढाऊ विमानांचा निर्मितीसाठी हा प्रकल्प अतिशय महत्वपूर्ण आहे. यामुळे सुमारे 400 सहयोगी कंपन्यांना भारतात विविध प्रकारची कामे उपलब्ध होणार आहेत. या एकट्या प्रकल्पातून नागपूर आणि विदर्भात 5 हजारावर रोजगार निर्मिती होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून 5 वर्षांनी दरवर्षी किमान 22 फाल्कन 2000 विमानांची निर्मिती होणार आहे.

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाच्याअंतर्गत संरक्षण क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला मंजुरी दिल्यानंतर आकाराला येणारा भारतातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी संरक्षण क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्यानंतर सुरु होणाऱ्या ऐव्हिएशन क्षेत्रातील या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातील विकासाला मोठी चालना
मिळणार आहे. नागपूर येथील विमानतळ हे जागतिक दर्जाचे करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून मिहानमधील या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प नागपूरसह विदर्भातील सामाजिक व आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असून जानेवारी 2018 पर्यंत हा प्रकल्प सुरु होणार आहे. विमानासह सुट्याभागाच्या निर्मितीमुळे सहयोगी उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु होतील. त्यामुळे मिहान येथे 50 हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रिलायन्स समूहाने केवळ उद्योग सुरु केला नसून हजारो भारतीयांना रोजगारासह उद्योगाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे देशात उद्योग विकासाचे नवे दालन सुरु झाल्याचे सांगतांना धीरुभाई अंबानी यांच्या दूरदृष्टीमुळे उद्योग जगतामध्ये नावलौकिक मिळवला असून मुंबईतील उड्डाणपुलासह, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच्या बांधकामामुळे त्यांच्यासोबत स्नेहाचे नाते निर्माण झाले होते, असेही नितीन गडकरी
यांनी आपल्या भाषणात सांगितले.

फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी भारत आणि फ्रान्स या लोकशाही असलेल्या देशांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रात सहकार्याचे नवे दालन सुरु केले आहेत. ऐरोस्पेस क्षेत्रातील सहकार्यास नागपूर पासून सुरुवात होत असून या क्षेत्रातील अतिउच्च तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाला या उद्योगामुळे प्रारंभ होत आहे. लढाऊ विमानांच्या निर्मितीमुळे नागपूर येथील प्रकल्प महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगतांना त्या पुढे म्हणाल्या की, फाल्कन-2000 तसेच इतर विमानांच्या सुट्या भागाच्या निर्मितीसोबतच भारत आणि फ्रान्स संयुक्तपणे नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे, असे सांगितले.

डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष एरिक ट्रॅपियर म्हणाले की, भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमाने उपलब्ध करुन देण्यासाठी भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान झालेल्या महत्वपूर्ण करारामुळे या क्षेत्राच्या विकासामध्ये डसॉल्टचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. एव्हिएशन क्षेत्रात अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचा वापर होत असून विमानांसाठी आवश्यक असणारे सुट्या भागाची निर्मितीसुद्धा मिहान येथील प्रकल्पात करण्यात येणार असल्याने येथील तज्ज्ञ मनुष्यबळाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. नागपूर मिहान येथे ऐरोस्पेस उद्योगामुळे मिहानची ओळख जागतिक स्तरावर होणार असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्याबद्दल यावेळी विशेष अभिनंदन केले.

प्रारंभी धीरुभाई अंबानी ऐरोस्पेस पार्क येथे डसॉल्ट रिलायन्स ऐरोस्पेस उद्योगाच्या उभारणी संदर्भात रिलायन्स ग्रूपचे अध्यक्ष अनिल अंबानी म्हणाले की प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया अंतर्गत
मिहान येथे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील खाजगी उद्योगांच्या सहभागाअंतर्गत एव्हिएशन क्षेत्रातील पहिला प्रकल्प सुरु होत आहे. रफेल फायटर विमानासह विमानाचे सुटे भागांची निर्मिती डसॉल्ट ऐरोस्पेसच्या संयुक्त भागिदारीतून सुरु होत आहे. हा प्रकल्प नागपूर मिहान येथे सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आग्रह तसेच उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

या प्रकल्पाअंतर्गत 30 हजार कोटी रुपयाचा करारानुसार ऐरोस्पेस क्षेत्रातील निर्मितीला सुरुवात होत आहे. फायटर जेट निर्मितीचा बेस येथे राहाणार असून सुमारे 300 एकर जागेत धीरुभाई अंबानी ऐरोस्पेस पार्क
उभारण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कोकीलाबेन धीरुभाई अंबानी, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली, राजदूत ॲलेक्झांडर झगलर, निता अंबानी, डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष एरिक टॅपियर यांनी दीप प्रज्ज्वलित करुन ऐरोस्पेस पार्कचा शिलान्यास सोहळ्याचा शुभारंभ केला. तसेच यावेळी प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी वृक्षारोपण करुन भारत आणि फ्रान्सच्या सहकार्याच्या नव्या पर्वाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, समीर मेघे, मल्लिकार्जून रेड्डी आदी लोकप्रतिनिधी तसेच प्रधान सचिव वलसा नायर सिंह, मिहानचे सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त अनूप कुमार तसेच रिलायन्स ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी, डसॉल्ट ऐरोस्पेसचे प्रमुख अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget