विशेष लेख : समृद्धी महामार्ग : परिवहन व्यवस्थेचे अनोखे प्रतिक

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचा टप्पा सुरू झाला. बऱ्याच महिन्यापासून भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध होता. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. परंतु शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने त्यांचा विरोध निवळला. याचाच एक भाग म्हणून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून भूसंपादनाला सुरूवात केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्पातील समाविष्ट जमिनीच्या मोजणीकरिता निधी उपलब्ध करुन दिला आहे.

आतापर्यंत नागपूर, वाशिम, बुलढाणा, जालना, अहमदनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये संयुक्त मोजणीची कार्यवाही 100% पूर्ण झाली आहे. उर्वरित जिल्ह्यामध्ये वर्धा (97%), अमरावती (85%), औरंगाबाद (97%) व नाशिक (87 %) या प्रमाणे संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत 10 जिल्ह्यांमधून 392 गावागावातून हा महामार्ग जाणार आहे. त्यात नागपूर (21), वर्धा (34), अमरावती (46), वाशिम (54), बुलढाणा (49), जालना (25), औरंगाबाद (62), अहमदनगर (10), नाशिक (49) व ठाणे (42) अशी गावांची संख्या आहे.

25 लाख लोकांना रोजगार

हा प्रगतीचा समृद्धी महामार्ग 2019 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली असून सुमारे 25 लाख लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी जगातील अनेक देश पुढे आले असून चीन, मलेशिया, कोरिया या राष्ट्रांनी प्रत्यक्षपणे संपर्क साधून तयारी दर्शविली आहे.

या महामार्गावर दोन्ही बाजूने देश विदेशातील मोठे मोठे कारखाने उभारले जाणार असल्याने मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन प्रचंड आर्थिक उलाढाल होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास साधला जाणार आहे. हा प्रकल्प झाल्यानंतर महाराष्ट्र हे देशातील एक नंबरचे सर्वात प्रगतीशील राज्य बनणार आहे. विकासाचा दर अन्य राज्यापेक्षा कित्येक पटीने वाढणार आहे. नागपूरहून मुंबई, पुण्याला तसेच अन्य जिल्ह्यातून मुंबईला येणारा शेतमाल व अन्य उत्पादने वाहून नेणे अधिक सोईचे आणि सुरक्षित होणार आहे. म्हणूनच हा प्रकल्प महाराष्ट्राला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारा विकासाचा, प्रगतीचा मार्ग समृद्ध करणारा असा महामार्ग असणार आहे.

या महामार्गालगत उभारण्यात येणारी नवनगरेही कृषीपूरक उद्योगांना चालना देणारी व ग्रामीण भागात सुविधा देणारी कृषी समृद्धी केंद्रे असणार आहेत. या प्रकल्पामुळे मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील 24 जिल्हे देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडले जाणार आहेत. हा महामार्ग एकूण 6 लेनचा करणार असून सुरक्षिततेचे सर्व उपाय या मार्गावर असतील. या रस्त्याच्या मध्ये येणारी खेडी, नदी, नाले यावर उड्डाणपूल, छोटे-मोठे पूल आणि सब-वे असणार तर काही ठिकाणी मोठ्या डोंगरांमधून बोगदा काढून हा मार्ग तयार केला जाणार आहे. विशेष म्हणजे महामार्गाच्या आजुबाजूला असलेली तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे आणि मुख्यालये ही द्रूतगती मार्गाशी जोडली जाणार आहेत. राज्यातील 30 तालुके आणि 355 गावांतून जाणारा हा महामार्ग देशातील राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांचे अर्थकारण बदलणारा हा महाराष्ट्र राज्याला सक्षम करणारा असा नागपूर-मुंबई सुपर एक्सप्रेस कम्युनिकेशन-वे असणार आहे.

- डॉ.संभाजी खराट
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget