जो कायदा मोडतो त्याला आम्ही कायदा दाखवतो - आमदार बच्चू कडू

बच्चू कडू यांनी 1999 साली पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला. पुढे 2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत. 

बच्चू कडू यांनी आतापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे. बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला. अपंगांकरिता २५,००० लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार व त्याची फलश्रुती एका दिवसात ११ शासन निर्णय केंद्राने पारित केले. रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार म्हणजे बच्चू कडू असून त्याच्या प्रहार संघटने मार्फत आजपर्यत लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहेत. 

बच्चू कडू म्हणजे ''आक्रमकपणा'', जिथे अन्याय होईल तिथे धावत जायाचे. शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे, कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडणे अशी आंदोलने करायची. वेळप्रसंगी मागचा पुढचा कोणताही विचार न करता सरकारी अधिकाऱ्यांवरही हात उगारायचा, अशी त्यांच्या कामाची स्टाईल आहे. पण हा आक्रमकपणा योग्य आहे का ? की हाच त्यांचातला डॅशिंगपणा तरुणांना आवडत असल्याने ते त्यांच्याकडे आकर्षित होत आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्यासोबत बातचीतद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न ''मराठी १ नंबर बातम्या'' ने केला आहे. 

बच्चू कडू म्हणजे ''आक्रमकपणा'' अशी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली आहे. यावर आपले मत काय आहे ?
आमदार बच्चू कडू : यात वाईट काय आहे, चांगलेच आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर आक्रमक होते, महात्मा फुले ही आक्रमकच होते. छत्रपति शिवाजी महाराज ही आक्रमकच होते. पण शेतातून घोडे स्वारीने जाताना पीकांचे नुकसान होणार नाही ना, याची काळजी घेत शेतातून कडेकडेने जाणाऱ्या छत्रपति शिवाजी महाराज यांचा असा आक्रमकपणा आम्हाला अभिप्रेत आहे. अखेर जो कायदा मोडतोतेव्हा आम्ही कायदा हातात घेतो. कारण त्याने मोडलेला कायदा कसा चुकीचा आहे, हे दाखविण्याचे काम आमच्या कृतीद्वारे करतो. त्यात 
वाईट असे काहीच नाही. 

आपण योजना आखून काम करता ?
आमदार बच्चू कडू : कुठलाच प्लॅन कामाचा करत नाही. जे माझ्याकडे दुःख घेऊन येतात, तिथेच धाव घेयाची, हीच माझ्या कामाची पद्धत आहे. दिल्लीला असताना पाण्याच्या बाटलीची किंमत १ रूपये असूनही ३ रूपये घेतल्याच्या विरोधात त्याच ठिकाणी आंदोलन पुकारले होते. त्यामुळे आजपर्यंत प्लॅन करून काम केलेले नाही. मंत्रालयात फिरत असताना एका व्यक्तिने माझ्यासमोर त्याचे गाऱ्हाणे मांडल्याने त्यातून अधिकाऱ्याला मारहाणीची घटना घडली. 

तुमच्याकडे तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर असण्यामागील कारण कोणते ?
आमदार बच्चू कडू :
 मी आजपर्यंत कोणाच्या घरी दार ठोठावले नाही की, कोणाला बोलवायला गेलोलो नाही. ज्याना माझ्या कामाची पद्धत आवडली ते माझ्या सोबत आले. काहींना माझ्यातला डॅशिंगपणा आवडला ते ही तरुण माझ्यासोबत जोडले आणि जोडले जात आहे. तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा राजकारणात येऊन प्रामाणिकपणे सेवा करणे गरजेचे आहे. सेवेला महत्व दिले पाहिजे आणि असेच कार्यकर्ते तयार करण्याचे काम सुरु आहे. 

मंत्री पदावर काम करण्यास आवडेल का ?
आमदार बच्चू कडू : तीनवेळा अपक्ष म्हणून निवडून आल्याने मंत्रीपद घेतले असते. पण केवळ सेवेला महत्व दिल्याने मंत्रिपदाच्या चौकटीत सुखसोयीत स्वतः ला बसवून घेयाचे नाही. स्वतः पेक्षा सेवेला माझे जास्त महत्व आहे. 

तुम्हाला कोणत्या गोष्टीची खंत वाटते ?
आमदार बच्चू कडू : दिवाळी, ईद सोबत अन्य धार्मिक सण मोठ्या थाटामाटात साजरे होताना दिसतात. विजेची रोषनाई सोबत फटाके फोडून आंनद व्यक्त केला जातो. पण हाच उत्साह प्रत्येक धर्मियांचा स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी दिसून येत नाही. हे दोन्ही दिवस केवळ शाळा आणि महाविद्यालयातच साजरे होताना दिसतात, यागोष्टीची फार खंत वाटते. लोकांनी धर्म जात विसरुन प्रथम आणि अखेर पर्यंत आपण भारतीय आहोत, हे मानले पाहिजे. तेव्हाच बदल घडू शकतो. 

राजकारणाविषयी तुमचे मत काय आहे ? 
आमदार बच्चू कडू : माझे काय, लोकांचीच मते राजकीय नेत्यांमंडळी विषयी वाईट झालेली आहेत. लोकांचा राजकारणी मंडळींवरचा विश्वासच उडालेला आहे. ''मी महाराष्ट्राचा'' आणि ''माझा महाराष्ट्र'' अशी डरकाळी फ़ोडणे सहज सोपे आहे. पण प्रत्यक्षात  एखाद्या रुग्णाला खांद्यावर घेऊन दवाखान्यात घेऊन जाणे, अंध - अपंगासाठी काम करणे फार कठीण आहे.

तुमच्या यशाची व्याख्या ? 
आमदार बच्चू कडू : प्रामाणिकता आणि सेवा, या दोन गोष्टीमुळेच आज पर्यंतचा माझा प्रवास सुरु आहे.

( आमदार बच्चू कडू यांची आमदार निवास मध्ये भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत करण्यात आलेली आहे. )

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget