(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कोपर्डी अत्याचार प्रकरणी निकाल फाशीच्या शिक्षेमुळे समाजातील अपप्रवृत्तींना जरब बसेल- मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या
" />

कोपर्डी अत्याचार प्रकरणी निकाल फाशीच्या शिक्षेमुळे समाजातील अपप्रवृत्तींना जरब बसेल- मुख्यमंत्री

मुंबई ( २९ नोव्हेंबर ) : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे समाजातील अपप्रवृत्तींना जरब बसण्याबरोबरच न्यायपालिकेवरील विश्वास वाढला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, कोपर्डीची घटना अत्यंत निंदनीय होती. संपूर्ण महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया उमटली होती. तपास यंत्रणेकडून या प्रकरणाचा तत्काळ तपास करण्यात आला. त्यासोबतच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती केली. न्यायालयातही हा खटला अत्यंत कमी वेळात पूर्ण करण्यात आला. आरोपींच्या वकिलांनी अनेकवेळा विलंब करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न सरकारी वकिलांनी हाणून पाडले. विलंब करण्याच्या प्रयत्नाबाबत आरोपीच्या वकिलांना न्यायालयाने दोन वेळा दंडही ठोठावला.

आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी राज्यातील माता-भगिनींची भावना होती. न्यायालयाने लवकर आणि चांगला निकाल दिल्यामुळे या महिलांना दिलासा मिळाला आहे. या जलद प्रक्रियेमुळे न्यायालयावरचा विश्वास वाढला आहे. या शिक्षेमुळे अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींना जरब बसून महिलांवरील अत्याचारास पायबंद बसेल, अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणा आणि सरकारी वकिलांचे अभिनंदन केले.

कोपर्डी निकालामुळे पीडितांच्या कुटुंबियाला न्याय - चंद्रकांत पाटील
कोपर्डी येथील प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला निकाल पीडित मुलीस व तिच्या कुटुंबियास न्याय देणारा आहे. या प्रकरणात पीडित मुलीचा गेलेला बळी व कुटुंबियांचे झालेले नुकसान हे कुठल्याही मार्गाने भरुन येणारे नाही. तरी, न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबियांना दिलासा मिळेल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

कोपर्डी निकालावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, गुन्हेगाराच्या कुकर्मानुसार त्यांना कठोर अशी फाशीची शिक्षा सुनावली गेली, ही बाब निश्चितच अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींना आळा बसविणारी आहे.

या खटल्यामध्ये सरकारतर्फे ॲड. उज्वल निकम व तपास यंत्रणेने केलेली कामगिरी पुरोगामी राज्याला साजेशीच आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोपर्डी खटला निकाल न्यायव्यवस्थेचे आभार – शिक्षणमंत्री विनोद तावडे
कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. हे दुष्कृत्य करणा-या नराधमांना फाशी झाली पाहिजे, अशी भावना महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेकडून व्यक्त होत होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कायदेशीरपणे न्यायालयात बाजू मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशा दुर्दैवी घटनांची गय केली जाणार नाही असा संदेश दिला. फास्ट ट्रॅक न्यायालयात या खटल्याची सुनावणी होऊन दोषींना फाशीची शिक्षा झाली. त्या निकालामुळे अशा प्रवृत्तीकडून लोक परावृत्त होतील असा संदेश आता समाजात पोहोचू शकेल, अशी दुष्कृत्य करणा-या नराधमांची भीड चेपली जाईल. या खटल्याचा निकाल जलदगतीने दिल्याबद्दल महाराष्ट्राची कोट्यवधी जनता न्यायव्यवस्थेचे आभार मानत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget