कार्यक्रम परवानग्यांसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित

शुल्क आकारणी व परवानगी प्रक्रियेचे सुलभीकरण प्रत्यक्षात

अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यापासून ७२ तासात मिळणार परवानगी

मुंबई ( २ नोव्हेंबर ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खुल्या जागेत काही कार्यक्रम घ्यावयाचा असल्यास त्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांकडे स्वतंत्रपणे अर्ज करण्याची यापूर्वीची पद्धत होती. या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात कालापव्यय होण्याची शक्यता असायची. मात्र आता 'इज ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत कार्यक्रम परवानगी (Event Permission) मिळविण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच परवानगी प्रक्रियेचे व शुल्क आकारणी (Charges / fees Calculation) प्रक्रियेचे देखील सुलभीकरण करण्यात आले आहे. यामुळे कार्यक्रम परवानगी प्रक्रिया अधिक वेगवान झाल्याने अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यापासून ७२ तासात अर्जदाराला कार्यक्रम परवानगी मिळणे शक्य होणार आहे, अशी माहिती व्यवसाय विकास कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

'इझ ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत विविध व्यवसायिक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी महापालिका सातत्याने विविध उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे. या अंतर्गत आतापर्यंत दुकाने व आस्थापना खात्याशी संबंधित परवानग्या, सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात येणा-या उपहारगृह विषयक व आरोग्य विषयक परवानग्या, अनुज्ञापन खात्याद्वारे दिला जाणारा व्यापार परवाना (Trade License) आणि इमारत व कारखाने खात्याद्वारे दिल्या जाणा-या परवानग्यांचे सुलभीकरण यापूर्वीच करण्यात आले आहे. याच श्रृखंलेअंतर्गत आता महापालिकेद्वारे दिल्या जाणा-या कार्यक्रम विषयक परवानग्यांचे सुलभीकरण देखील प्रत्यक्षात आले आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कार्यक्रम आयोजित करण्याची अनुमती मिळू शकणा-या खुल्या जागेवर कार्यक्रम आयोजित करावयाचा झाल्यास, त्यासाठी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते, इमारत व कारखाने खाते, परिरक्षण आणि अनुज्ञापन अशा चार खात्यांकडून स्वतंत्रपणे पूर्व परवानगी प्राप्त करुन घ्यावी लागत असे. तसेच ही परवानगी मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे आकारण्यात येणारे शुल्क हे यापूर्वी प्रती चौरस मीटर पद्धतीने आकारण्यात येत होते. ज्यामुळे शुल्क आकारणी प्रक्रिया क्लिष्ट होण्यासोबतच त्यात कालापव्यय देखील होत होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन आता कार्यक्रम परवानगी विषयक प्रक्रियेचे व त्यासाठीच्या शुल्क आकारणी प्रक्रियेचे देखील सुलभीकरण करण्यात आले आहे.

वरीलनुसार महापालिका क्षेत्रात कार्यक्रम परवानगीच्या सुलभीकरणांतर्गत 'एक खिडकी योजना' सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता कार्यक्रम परवानगीसाठी अर्जदाराला चार खात्यांऐवजी केवळ महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी अग्निशमन विषयक परवानगी आवश्यक असल्यास त्याबाबतचा उल्लेख देखील याच अर्जात करता येऊन त्याबाबतची प्रक्रिया देखील या एकाच अर्जाच्या माध्यमातून करणे शक्य होणार आहे.

कार्यक्रम परवानगी बाबत यापूर्वी प्रति चौरस मीटर आधारावर शुल्क आकारणी केली जात असे. मात्र यापद्धतीमध्ये अनेकदा कार्यक्रमाच्या प्रस्तावित स्थळाचे प्रत्यक्ष मोजमाप घेऊन शुल्क निश्चिती करणे आवश्यक असायचे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कालापव्यय होण्याची शक्यता होती. मात्र, आता शुल्क आकारणी प्रक्रियेचे देखील सुलभीकरण करण्यात आले असून ती तीन स्तरीय करण्यात आली आहे. यामध्ये कार्यक्रम स्थळाचा आकार ५०० चौरस मीटर असल्यास, ५०० चौरस मीटर ते १००० चौरस मीटरपर्यंत आणि १००० चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराचे कार्यक्रमस्थळ असे तीन स्तर निश्चित करण्यात आले आहेत. ज्यामुळे शुल्क गणना सुलभपणे व जलदपणे करणे शक्य होणार आहे. तथापि; सामाजिक, धार्मिक, पारंपारिक कला, सर्कस, जत्रा यासारख्या बाबींकरिता पूर्वीच्याच दराने शुल्क आकारणी केली जाणार आहे.

वरील तपशीलानुसार अर्जदाराने कार्यक्रम परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर किती शुल्क भरावे लागेल, याबाबतची माहिती विभाग कार्यालयाद्वारे अर्जदारास दिली जाणार आहे. त्यानुसार अर्जदाराने महापालिकेकडे शुल्क रक्कम भरल्यानंतर ७२ तासांच्या कालवधीत अर्जदारास 'कार्यक्रम परवानगी' मिळू शकणार आहे, अशी माहिती व्यवसाय विकास कक्षाद्वारे देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget