(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सोमय्या महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहाचे उद्घाटन | मराठी १ नंबर बातम्या
" />

सोमय्या महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहाचे उद्घाटन

विकसित भारताचे स्वप्न कल्पक युवा पिढीमुळे साध्य होईल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुंबई ( २९ नोव्हेंबर ) : मोठी लोकसंख्या असलेली युवा पिढी ही आपली महत्वाची शक्ती असून भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न हे नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या युवा पिढीमुळे शक्य होणार आहे. या युवा पिढीला उपरोक्त कार्यात गुंतविण्यासाठी शिक्षण संस्थांनी नवीन तंत्रज्ञान शोधावे. संशोधनाला चालना द्यावी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.

के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या 'मैत्रेयी' या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, खासदार सदाशिव लोखंडे, संस्थेचे अध्यक्ष समीर सोमय्या, विश्वस्त
लिलाबेन कोटक आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्याकडील ज्ञान पुढील पिढीला प्रदान करण्याचे जेव्हा जेव्हा थांबविले गेले तेव्हा तेव्हा आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. इतकेच काय पण जेव्हा आपण ज्ञानापासून दूर गेलो तेव्हा आपले स्वातंत्र्यही गमावून बसलो होतो. आपले प्राचीन ज्ञान हे विज्ञानावर आधारित होते. ज्ञानाचा वास्तविक जीवनामध्ये वापर होणे गरजेचे आहे.

विद्यापीठे ही संशोधनाची केंद्रे असून ती नवीन ज्ञानाला चालना देतात. नवीन ज्ञान अभ्यासक्रमात समाविष्ट करतात. नावीन्याचा ध्यास असणाऱ्या, संशोधनाला चालना देणाऱ्या शिक्षण संस्था यापुढील काळात टिकून राहतील. नव्या संशोधनाची साखळी शिक्षण संस्थांनी, विद्यापीठांनी जपली पाहिजे अन्यथा अशा संस्था काळाच्या ओघात नष्ट होतील. सध्या विद्यापीठ पद्धती काही अंशी ताठर झाली आहे. आजच्या शिक्षण पद्धती मध्ये लवचिकता असणे गरजेचे आहे. विद्यापीठ कायद्यात बदलांची गरज असून शिक्षण संस्थांनी त्याबाबत सूचना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच संशोधन आणि आधुनिक शिक्षण हे शिक्षण संस्थांना स्वायत्तता दिल्यानंतर शक्य होते. उत्कृष्ट मानव संसाधनाची निर्मिती करणाऱ्या, उत्कृष्ट शैक्षणिक इतिहास असणाऱ्या संस्थांना विद्यापीठांमध्ये कसे
रुपांतरीत करता येईल याबाबत विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

के. जे. सोमय्या यांच्या दूरदृष्टीमुळे स्थापन झालेल्या विद्याविहार सारख्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून संशोधनाला चालना दिली गेली. येथे नाविन्यपूर्णतेची संस्कृती आहे. या महाविद्यालयाला शासनाच्या वतीने
आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रास्ताविक आणि स्वागत करताना महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. सोमय्या यांनी महाविद्यालयाचे वैशिष्टे विषद केली. सध्या या महाविद्यालयात 8 हजार विद्यार्थी शिकत असून 'मैत्रेयी' हे 350 क्षमतेचे वसतिगृह उभारण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात सर्व आठ हजार विद्यार्थ्यांना सामावून घेऊ शकेल अशी वसतिगृहे उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेने कला, आधुनिक विज्ञान, संस्कृती, वाणिज्य, संशोधन, तंत्रज्ञान यामध्ये उत्कृष्ट काम केले आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांनी अनेक नवोद्योग (स्टार्ट-अप) सुरू केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी संस्थेच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनींनी मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली. शेवटी संस्थेच्या व्‍यवस्‍थापन महाविद्यालयाच्या संचालिका मोनिका खन्ना यांनी आभार मानले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget