(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात “स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र” ला पुरस्कार | मराठी १ नंबर बातम्या
" />

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात “स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र” ला पुरस्कार

नवी दिल्ली ( २७ नोव्हेंबर ) : प्रगती मैदान येथील 37 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राचे “स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र” या दालनास सजावट व सादरीकरणासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांच्या हस्ते विशेष प्रशंसनीय प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्याचे उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड आणि सहव्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रगती मैदान येथे आयोजित एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेचे(आयटीपीओ) मुख्य व्यवस्थापकीय संचालक सी.एल.गोयल, कार्यकारी संचालक दीपक कुमार यावेळी उपस्थित होते.

प्रगती मैदान येथे दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ पासून भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आज मेळाव्याचा समारोप होत आहे. 'स्टार्टअप इंडिया' ही या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने“स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र” हे राज्यात उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले. राज्यातील प्रतिभावान तरूण उद्योजकांचे ६० प्रकल्प याठिकाणी दर्शविण्यात आले.

दालनाच्या मुख्यद्वाराचे खास आकर्षण ठरले ते अमोल यादव या तरूण उद्योजकाने निर्माण केलेली विमानाची प्रतिकृती. मुंबई-अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन, मुंबई- नागपूर समृद्धी मार्ग आणि त्याचे
फायदे याठिकाणी विविध आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातून दर्शविण्यात आले. स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी आकर्षकपणे मांडण्यात आली. याची दखल व्यापार मेळाव्याच्या परीक्षक मंडळाने घेतली व महाराष्ट्राची निवड विशेष प्रशंसनीय प्रमाणपत्र पुरस्कारासाठी झाली.

पुरस्कार मिळाल्याचा आनंद- हर्षदीप कांबळे

पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे म्हणाले,भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राला प्रथमच असा पुरस्कार मिळत आहे. त्यामुळे हा पुरस्कार
मिळाल्याचा खूप आनंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र’ या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केले.
देशातील पहिले विमान निर्माण करणारे राज्याचे सुपूत्र अमोल यादव यांना आवश्यक प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री कार्यालयाशी सतत संपर्क करून हे प्रमाणपत्र मिळवून दिले. या प्रातिनिधिक उदाहरणावरूनच राज्यात स्टार्टअप इंडिया या कार्यक्रमाच्या यशाची माहिती मिळते. येथील महाराष्ट्र दालनात राज्यात स्टार्टअप व स्टँड महाराष्ट्र योजनेच्या माध्यमातून सुरु असलेले उद्योग प्रभावीपणे दर्शविण्यात आले. त्याची दखल घेतल्यानेच आज हा पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कार म्हणजे शासनाच्या प्रयत्नांची पावती-‍ शिवाजीराव दौंड

स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्रच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी राज्य शासनाने निर्माण केलेली उत्तम व्यवस्था आणि त्या माध्यमातून तरूण उद्योजकांना झालेला फायदा महाराष्ट्र दालनात प्रभावीपणे दर्शविण्यात आला.

राज्य शासनाच्या प्रयत्नांची माहिती आम्ही भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात येणाऱ्या देश-विदेशातील उद्योजक व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवू शकलो याची पावती म्हणजेच महाराष्ट्र दालनास मिळालेला हा पुरस्कार असल्याचे दौंड म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची महाराष्ट्र दालनास सदिच्छा भेट

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र दालनास सदिच्छा भेट दिली. राज्याचे उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड आणि सहव्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी आठवले यांचे स्वागत केले. यावेळी आठवले यांनी महाराष्ट्र दालनात प्रदर्शित करण्यात आलेल्या राज्यातील स्टार्टअप व स्टँडअप प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र दालनास मिळालेल्या पुरस्काराबद्दल आठवले यांनी शुभेच्छा दिल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget