(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 15 ते 30 नोव्हेंबरदरम्यान मतदार नोंदणीची विशेष मोहीम | मराठी १ नंबर बातम्या
" />

15 ते 30 नोव्हेंबरदरम्यान मतदार नोंदणीची विशेष मोहीम

मतदार याद्यांचा विशेष पुन:रिक्षण कार्यक्रम

दावे व हरकती 30 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार

मुंबई ( १५ नोव्हेंबर ) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघांच्या छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्यास दि. 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत मतदार नोंदणीची विशेष मोहीम आखण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

1 जानेवारी 2018 रोजी 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या म्हणजेच जन्मतारीख 1 जानेवारी 2000 किंवा त्यापूर्वीची आहे आणि सामान्य रहिवाशी आहे अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र आहे.
विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी दि. 3 ऑक्टोबर 2017 रोजी करण्यात आली आहे. दावे व हरकती स्वीकारण्याची मुदत आता 3 नोव्हेंबर ऐवजी दि. 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या पात्र मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यात 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी (इआरओ) यांच्या कार्यालयात तसेच अतिरिक्त मदत केंद्र म्हणून निर्देशित केलेल्या सर्व मतदान केंद्रांवर (डेसिग्नेटेड पोलींग स्टेशन्स) अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

वाढीव मुदतीच्या दरम्यान दि. 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी जाऊन आयोगाने निर्देशित केलेल्या नमुन्यांमध्ये मतदारांची माहिती गोळा करणार आहेत. या कालावधीमध्ये बीएलओ पूर्वीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात नाव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना नमुना क्र. 6 वितरण करुन तो भरुन जमा करणार आहेत. 1 जानेवारी 2018 च्या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणीठी पात्र नागरिकांचे नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना क्र. 6 भरुन घेणार आहेत. 1 जानेवारी 2019 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणीसाठी पात्र होणाऱ्या नागरिकांची माहिती जमा करण्यात येणार आहे.

स्थलांतरीत व मयत मतदारांच्या वगळणीसाठी नमुना क्र. 7 चे वाटप करणे आणि जमा करण्याचे काम केले जाणार आहे.

या कालावधीमध्ये प्रारुप मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी नमुना क्र. 8 भरुन घेणे, मतदारांचे मोबाईल क्रमांक आणि दूरध्वनी क्रमांक जमा करण्यात येणार आहेत. मोबाईल आज्ञावलीचा वापर करुन मतदारांच्या घरांचे अक्षांश गोळा करणे अथवा अक्षांश व रेखांशाचे एसएमएस करणे, अनिवासी भारतीय नागरिकांची माहिती संबंधित कुटुंबाकडून प्राप्त करुन घेणे ही कामे केली जाणार आहेत.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 नुसार विहित केलेल्या कार्यपद्धतीचे पालन करुन पूर्वीच्या मतदार यादीतील मात्र मयत झालेल्या, इतरत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी डेसिग्नेटेड पोलींग स्टेशन्सवर तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. मयत, इतरत्र स्थलांतरीत किंवा दुबार नोंदणीमुळे वगळण्यात आलेल्या नावांच्या अनुषंगाने दावे व हरकती दाखल झाल्यास राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते (बीएलए) व शासनाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीनुसार दावे व हरकती दिनांक 30 नोव्हेंबर या पुन:रिक्षण कार्यक्रमाच्या कालावधीदरम्यान निकाली काढण्यात येणार आहेत.

सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट) (बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर-(बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in/ या वेबपोर्टलवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget