शालेय स्तरावरुन होणार मासिक पाळीबाबत प्रबोधन

शाळांमध्ये राबविला जाणार मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम

मुंबई ( २ नोव्हेंबर ) : शालेय विद्यार्थिनींची मासिक पाळी दरम्यानची शाळेतील अनुपस्थिती कमी करण्यासाठी तसेच शालेय स्तरावर विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळी संदर्भातील गैरसमज दूर करुन शालेय स्तरावरच याबाबत विद्यार्थिंनीचे प्रबोधन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने आता शाळांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येईल.

युनिसेफने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात केलेल्या सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रातील ११ ते १९ वयोगटातील फक्त १३ टक्के मुलींना पहिली पाळी येण्याअगोदर यासंदर्भात माहिती होती. तसेच मासिक पाळीदरम्यान शाळेकडे पाठ फिरविणाऱ्या किशोरवयीन मुलींची संख्या देखील ६० ते ७० टक्के असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले होते. या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलींना जर योग्य वेळी मासिक पाळीविषयी योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रामुख्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या शाळेत किशोरवयीन मुली शिकत आहेत त्या शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा, पुरेशा प्रमाणात सॅनिटरी पॅडची उपलब्धता, त्यांची विल्हेवाट लावण्याची सुविधा आदी गोष्टींचा या कार्यक्रमात समावेश आहे.

राज्यातील सर्व उच्च प्राथमिक व त्यावरील शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यातील काही जिल्ह्यात युनिसेफच्या तांत्रिक सहाय्याने प्रायोगिक तत्वावर हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. या उपक्रमाचा फायदा केवळ शाळकरी मुलीच नाही तर अन्य मुली आणि महिलांनाही होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र’ टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रासाठी आयुक्त, जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे या टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून काम पाहतील. याबरोबरच या टास्क फोर्समध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, सर्व शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता, लिंग समभाव समन्वयक, क्रियाशील शिक्षक (पुरुष आणि महिला) हे सदस्य असतील तर प्राथमिक शिक्षणाधिकारी या टास्कफोर्सचे सदस्य सचिव राहणार असून कार्यक्रमाची संपूर्ण अंमलबजावणी व त्याचे संनियंत्रण यांची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

कार्यक्रमांतर्गत युनिसेफ आणि विद्या प्राधिकरण, पुणे यांच्याकडून टास्क फोर्सने सुचवलेल्या महिला प्रतिनिधी/ महिला अधिकारी/ टास्क फोर्स सदस्य यांना राज्यस्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळांतील महिला शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण सहा सत्रांच्या माध्यमातून देण्यात येईल. यामध्ये मासिक पाळीविषयी माहिती देणे, मासिक पाळीदरम्यान उद्भवलेल्या आव्हानांना हाताळणे, मासिक पाळीच्या दिवसांत पाळावयाची स्वच्छता व आरोग्य, शोषके (सॅनिटरी पॅड) योग्य पद्धतीने हाताळणे, मासिक पाळीविषयीच्या अंधश्रद्धा व गैरसमजुती दूर करणे आदी गोष्टींचा समावेश असेल.

प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन देत असताना प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय असणे आवश्यक आहे. मुलींच्या घरातूनही मासिक पाळी या विषयावर मुलींना योग्य ती माहिती देणे आवश्यक आहे. याबरोबरच शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक सभांच्या माध्यमातून मुलींच्या पालकांनाही उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. शाळेतील मीना राजू मंच, किशोरी मंच यांना मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget