(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यातील 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 6500 कोटी भरले - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या
" />

राज्यातील 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 6500 कोटी भरले - मुख्यमंत्री

कोल्हापूर ( २४ नोव्हेंबर ) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी आधारच्या माध्यमातून करुन पारदर्शी कर्जमाफी करण्यावर भर दिला. महाराष्ट्रातील 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 6 हजार 500 कोटी रुपये आजच भरले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापुढे 10 लाख शेतकऱ्यांची यादी पुन्हा 10 लाख शेतकऱ्यांची यादी अशा पध्दतीने कर्जमाफीचे काम येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पटांगणावर वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या दिलखुलास...मुक्त संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. समारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास...मुक्त संवाद कार्यक्रमाद्वारे शेतकरी,ऊस उत्पादक, दूध उत्पादक, लोक प्रतिनिधी,सहकारी संस्थाचे पदाधिकारी, महिला बचत गट, कामगार, शिक्षक तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

राज्यातील अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवून वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या खात्यावर या योजनेंतर्गत त्यांना 25 हजार रुपयापर्यंतची मदत जाहिर केली असून राज्याच्या अर्थ व्यवस्थेची साथ मिळाल्यास नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अजूनही जास्तीची मदत करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा हीच शासनाची भूमिका असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दूध व्यवसायात चढउतार असल्याने दुधाच्या पावडरचा पूरक पोषण आहार व शालेय पोषण आहारामध्ये वापर करण्यासंदर्भात शासनाने समिती गठित केली असून या समितीच्या सल्ल्यानुसार याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसे समितीच्या निर्णयानंतर वेगवेगळ्या शासन योजनांमध्ये दुधाची पावडर वापरण्याबाबत प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची मोठी व्यवस्था राज्यात शासनाने उभी केली आहे. यापुढील काळात कॉलेजमध्ये कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण केली जाईल. हे करत असताना दहावीनंतर 2 वर्षे कौशल्य
प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 वी समकक्ष मानून पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली.

गावठाण विस्ताराचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची घोषणा करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गावठाणाच्या आजूबाजूला विस्तार झाल्याने नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होतात. त्यासाठी शासनाने कुठलाही अधिभार लागू केला नाही. केवळ गावकऱ्यांनी गावठाण विस्तारासाठी शासकीय जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यास तशी शासकीय जमिन गावठाण विस्तारासाठी उपलब्ध करुन दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. गावठाण विस्ताराचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून ही कामे कालमर्यादेत करण्याचे निर्देशही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यात महिला बचत गटाची मोठी चळवळ उभी राहिली असून या बचत गटांना विविध व्यवसायासाठी सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत व्याजावरील अनुदान देऊन या गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी यावेळी जाहिर केले. राज्यातील 2 लाख 12 हजार बचत यशस्वी बचत गट असून त्यांची कुटुंब संख्या 27 लाखापर्यंत आहे. या बचत गटांना 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर 50 हजाराचे भाग भांडवल उपलब्ध करुन दिले जात आहे.

उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी मॉल उभारण्यावर भर दिला असून विविध ठिकाणच्या प्रदर्शनामधूनही बचत गटाच्या उत्पादनासाठी विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून शाळातील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याची योजना राबविली जाईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील 15 हजार बचत गटांना तीन वर्षात 102 कोटीचे कर्ज उपलब्ध करुन दिले असून बचत गटाच्या माध्यमातून 100 टक्के कर्ज परत फेड होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी शासनाने सुधारित धोरण जाहिर केले असून शिक्षकांच्या बदल्या मे मध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. सुगम, दुर्गम याबाबतही सुगम भागातील शिक्षक दुर्गम भागात, दुर्गम भागातील शिक्षक सुगम भागात ही संकल्पना योग्य असून शिक्षक संघटनांना निश्चितपणे विश्वासात घेतले जाईल. शिक्षकांसाठी राबविण्यात आलेली नवीन पेंशन योजना मार्केटशी लिंक असून केवळ पेंशनची पध्दत बदलली आहे. शिक्षकांना एमएससीआयटीसंदर्भात शिक्षणमंत्र्यांशी बोलून निर्णय
घेतला जाईल.

मुंबईतील माथाडी कामगारांच्या घरकुलाचा प्रश्न शासनाने सोडविला असून त्याच धर्तीवर कोल्हापूरच्या माथाडी कामगारांसाठी घरकुलांचा प्रकल्प हाती घ्यावा. या प्रकल्पास केंद्राकडून मंजुरी मिळवून घेऊन तो पूर्ण केला जाईल. सोलापूर येथे बीडी कामगारांसाठी 30 हजार घरांचा प्रकल्प हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई येथे राजर्षी शाहू महाराजांचे नावाने कोल्हापूर भवन उभे करण्यासाठी जागा देऊन या कामास प्राधान्य दिले जाईल अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जलयुक्त शिवार अभियानांबाबत बोलताना ते म्हणाले, जलसंधारणांतर्गत संपूर्ण वॉटर शेडचे पुनर्भरण करण्याची संकल्पना अमलात आणली जाईल मात्र यासाठी दोन महिन्यात निश्चित निकष तयार करुन योजना राबविली जाईल. यावेळी यांनी स्वाधार
योजनेबाबतही माहिती सांगितली.

नाभिक समाजाबाबतच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाभिक समाजाबद्दल मला प्रचंड आदर आहे. एकाद्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर यापूर्वीच मी जाहिर माफी मागितली आहे. यानंतर वाद होऊ नये अशी अपेक्षा आहे. यावेळी पाणीपुरवठा सहकारी संस्थांच्या अनुदानाबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. कोल्हापूरच्या पर्यटनावर शासनाने अधिक भर दिला असून पन्हाळा, जोतिबा, अंबाबाई पर्यटन विकासाचे आराखडे तयार असून याबाबत प्राधान्याने कार्यवाही केली जाईल. आसुर्ले-पोर्ले येथील साखर कारखाना शेतकऱ्यांकडे अर्थात सहकारात राहिला पाहिजे यासाठी तात्काळ अंमलबजावणी केली जाईल. यापूर्वी आदेश देऊनही अंमलबजावणी थांबविणाऱ्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांसह विविध घटकातील प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. वारणा परिसरात दिवंगत तात्यासाहेब कोरे यांनी उभे केलेल्या सहकारी उद्योग आणि शिक्षणामुळे याभागाच्या परिवर्तनास
मोलाची मदत झाले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

प्रारंभी वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी स्वागत करुन मुक्त संवाद.. ‍ दिलखुलास या कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. यामध्ये सर्व घटकांना समाविष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget