शशी कपूर यांचे रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीसाठीचे योगदान लक्षणीय - राज्यपाल

मुंबई ( ४ डिसेंबर ) : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शशी कपूर यांचे भारतीय चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमीसाठी लक्षणीय असे योगदान राहिले आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी तीन दशकांपेक्षा अधिक काळ गाजविला. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीप्रती आपली निष्ठा आणि बांधिलकी जपली. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका महत्वपूर्ण कालखंडाचा साक्षीदार पडद्याआड गेला असल्याचे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री

आपल्या सशक्त अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ रूपेरी पडदा गाजविणाऱ्या शशी कपूर यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, घरातूनच अभिनयाचा वारसा मिळालेल्या शशी कपूर यांनी आपली वेगळी शैली निर्माण केली होती. पृथ्वी थिएटर्सच्या माध्यमातून अभिनयाचा सुरू झालेला त्यांचा प्रवास हिंदी चित्रपटसृष्टीत चौफेर विस्तारला. भावनांचे प्रभावी सादरीकरण करणाऱ्या शशी कपूर यांनी हिंदी सोबतच इंग्रजी चित्रपटांमध्येही आपले योगदान दिले. नाविन्य आणि उत्कटता हा त्यांच्या अभिनयाचा केवळ भाग नव्हता तर त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा गूण होता. 

दर्जेदार अभिनयातून आगळावेगळा ठसा उमटविणाऱ्या शशी कपूर यांच्या निधनाने मोठी हानी - सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे
आपल्या सकस, दर्जेदार आणि जिवंत अभिनयातून आगळावेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते, पद्मभूषण शशि कपूर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शशीकपूर यांनी वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. साधारणपणे १६० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या शशी कपूर यांना भारत सरकारने पद्मभूषणने सन्मानित केले तर तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावत दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला.

६०, ७० च्या दशकांत ‘जब-जब फूल खिले’, ‘कन्यादान’, ‘शर्मिली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दीवार’, ‘कभी-कभी’ आणि ‘फकीरा’, 'त्रिशूल', 'सत्यम शिवम सुंदरम' आदी सुपरहिट सिनेमांमध्ये अजरामर भूमिका साकारणाऱ्या शशी कपूर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने दमदार अभिनेता गमावला, असल्याचेही तावडे यांनी म्हटले आहे. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget