प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस कलवरीचे राष्ट्रार्पण

मुंबई, दि. 14: भारतीय नौदलाच्या सेवेत आजपासून दाखल झालेली आयएनएस कलवरी ही पाणबुडी ‘मेक इन इंडिया’चे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद‌गार काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयएनएस कलवरी पाणबुडीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम झाल्याचे सांगितले.

प्रधानमंत्री यांनी आज ‘आयएनएस कलवरी’चे मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा आणि नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, आजचा दिवस सव्वाशे कोटी भारतीयांसाठी गौरवाचा दिवस असून या ऐतिहासिक क्षणांसाठी सर्व देशबांधवांचे अभिनंदन करतो. आयएनएस कलवरी म्हणजे “मेक इन इंडिया”चे
उत्तम उदाहरण आहे. आयएनएस कलवरी पाणबुडी म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यातल्या वेगाने वाढणाऱ्या धोरणात्मक भागिदारीचे उत्तम उदाहरण आहे. आयएनएस कलवरीमुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी भर पडली आहे.

21 वे शतक हे आशियाई देशांचे शतक मानले जाते. या शतकात, विकासाचा मार्ग हिंदी महासागराद्वारेच होणार हे निश्चित असून त्यामुळेच राष्ट्रीय धोरणांमध्ये हिंदी महासागराला विशेष स्थान आहे. हिंदी महासागरात जागतिक धोरणात्मक आणि आर्थिक हिताबाबत भारत पूर्णत: सजग असून त्यामुळेच आधुनिक आणि बहुआयामी भारतीय नौदल, या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री पुढे म्हणाले की, सागराच्या अंगभूत क्षमतेमुळे आपल्या राष्ट्राच्या विकासाला आर्थिक ताकदीची जोड मिळाली आहे. समुद्रामार्गे होणारा दहशतवाद,तस्करी, अंमली पदार्थांची वाहतूक या देशाला तसेच इतर
राष्ट्रांनाही भेडसावणाऱ्या समस्यांविषयी भारताला जाणीव आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत आहे.

“वसुधैव कुटुंबकम्‌” अर्थात संपूर्ण जग हे एक कुटुंबच आहे ही भारताची धारणा असून त्याला अनुसरुनच भारत आपल्या जागतिक जबाबदाऱ्या निभावत आहे. आपल्या सहकारी राष्ट्रांना, संकटाच्या काळात पहिल्यांदा मदतीचा हात देण्यात भारत तत्पर आहे. भारतीय राजनैतिक आणि सुरक्षा आस्थापनातला मानवी चेहरा हे आपले वैशिष्ट्य आहे. सामर्थ्यवान भारत मानवतेसाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. शांतता आणि स्थैर्याच्या मार्गावर भारताच्या बरोबरीने वाटचाल करण्याची जगातल्या इतर अनेक देशांची इच्छा असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.

गेल्या तीन वर्षात संरक्षणविषयक संपूर्ण परिसंस्थेत बदल होण्यास सुरुवात झाली आहे. वन रँक वन पेन्शन या दीर्घकाळ प्रलंबित मुद्दयाचे निराकरण करुन केंद्र सरकारने या क्षेत्राप्रतीची कटिबध्दता दर्शवली आहे. सरकारची धोरणे आणि सैन्यदलांचे शौर्य यामुळे जम्मु-काश्मिरमध्ये छुपे युध्द म्हणून दहशतवादाचा वापर करण्याची चाल अयशस्वी ठरत असल्याचेही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितले तसेच देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणांऱ्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

जागतीक शांततेच्या दृष्टीने कलवटीचे महत्व अधिक -निर्मला सीतारामण

आधुनिक काळात युध्द नीतीमध्ये, शक्तीशाली आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पाणबुडया आपल्या राष्ट्राच्या शांततेसाठी आणि जरब ठेवण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. जागतिक शांततेच्या दृष्टिकोनातून आयएनएस कलवरीचे महत्व असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी बोलताना सांगितले.
भारतीय नौदल आणि फ्रान्सच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट 75 अंतर्गंत आयएनएस कलवरी मुंबईतल्या माझगाव बंदरात बांधण्यात आली आहे. फ्रान्सचे नौदल संरक्षण आणि ऊर्जा कंपनी डीसीएनएस यांनी या पाणबुडीचे आरेखन केले आहे. स्कॉर्पेन वर्गातल्या भारतीय नौदलात समाविष्ट होणाऱ्या सहा पाणबुडयांपैकी ही पहिली पाणबुडी आहे. हिंदी महासागरात आढळणाऱ्या विक्राळ शार्कच्या नावावरुन कलवरी हे नाव देण्यात आले आहे.

नौदलात समाविष्ट करण्याच्या या कार्यक्रमात कमिशनिंग वॉरंटचे वाचन आणि राष्ट्रगीतही झाले.

00000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अहमदाबादला प्रयाण

एकादिवसाच्या मुंबई भेटीनंतर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अहमदाबादकडे प्रयाण केले.

प्रधानमंत्री महोदय यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget