संयुक्त महाराष्ट्र संघर्ष मैदानात १,१५० मीटर लांबीचा सायकल ट्रक सुरु

सायकल ट्रॅकच्या सुशोभिकरणासह 'जॉगिंग ट्रॅक'ही कार्यान्वित

आरोग्याच्या दृष्टीकोनातून 'एफ दक्षिण' विभागाचा स्तुत्य उपक्रम

मुंबई, दि. 26 : महापालिकेच्या 'एफ दक्षिण' विभागाच्या परळ भोईवाडा परिसरात ''बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र संघर्ष मनोरंजन मैदान'' आहे. या मैदानात १ हजार १५० मीटर्सच्या सायकल ट्रॅकचे सुशोभीकरणासह नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. तसेच या मैदानात असणा-या 'जॉगिंग ट्रॅक'चे नूतनीकरण देखील करण्यात आले आहे. या निमित्ताने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या अनौपचारिक कार्यक्रमाला स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर व स्थानिक नगरसेविका सुप्रिया सुनिल मोरे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच परिसरातील नागरिक देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती सहाय्यक आयुक्त किशोर देसाई यांनी दिली आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकल चालविणे व पायी चालणे याचे आरोग्यदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांना सायकल चालविण्यासाठी आणि पायी चालण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी; यादृष्टीने महापालिकेच्या 'एफ दक्षिण' विभागाद्वारे बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र संघर्ष मैदानामध्ये असलेल्या १ किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या (१ हजार १५० मीटर) व १.२ मीटर रुंदीच्या सायकल ट्रॅकचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच या मैदानातील मातीच्या 'जॉगिंग ट्रॅक'चे (Earthen Jogging Track) देखील नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर या मैदानामध्ये मोफत सायकल स्टँडदेखील सुरु करण्यात आले असून याठिकाणी १४ सायकली ठेवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महापालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या सुविधांचा अधिकधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या कार्यक्रमप्रसंगी केले आहे. याच कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. तसेच स्वच्छता ऍप डाऊनलोड करण्याचे प्रात्यक्षिक देखील याप्रसंगी करण्यात आले.

महापालिकेच्या या मनोरंजन मैदानात सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सायकल स्टँड यासह खुली व्यायाम शाळा, योगा सरावस्थळ यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या मनोरंजन मैदानामध्ये बटुवृक्षासह (बोन्साय) सुगंधी झाडे देखील लावण्यात आली आहेत, अशीही माहिती किशोर देसाई यांनी दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget