नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद प्रश्नोत्तरे )

नागपूर मुंबई जलदगती समृद्धी महामार्गावरील चर्चा

शासकीय अधिकाऱ्यांनी जमीन घेतल्याचे पुरावे दिल्यास चौकशी करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 19 : नागपूर मुंबई जलदगती समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासकीय अधिकाऱ्यांनी विकत घेतल्या नसून त्या जमिनी शासकीय अधिकाऱ्यांनी घेतल्याचे ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते
दिल्यास चौकशी करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

प्रश्नोत्तराच्या तासात सदस्या हुस्नबानु खलिफे यांनी समृद्धी महामार्गाच्या जमिनी विक्रीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तर देताना फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या समृद्धी महामार्गासाठी संपादीत करण्यात येणाऱ्या जमिनीच्या वाटाघाटीत कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होत नसून पोलिसी बळाचा वापर करुन कोणाच्याही जमिनी ताब्यात घेतल्या जात नाहीत. ज्या शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध आहे, अशा शेतकऱ्यांशी चर्चा सुरु आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव अथवा बळजबरी केली जात नाही.

यावेळी झालेल्या चर्चेत सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे म्हणाले की, जुलै 2017 पासून या महामार्गासाठी भूसंपादन सुरु केले आहे. आतापर्यंत जवळपास पाच हजार हेक्टर जमीन संपादन करण्यात आली असून 58 टक्के लोकांनी जमीन देण्यास संमती दिली आहे. आतापर्यंत 45 टक्के जमीन ताब्यात आली असून 380 गावातील जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. नागपूर ते मुंबई पर्यंतच्या महामार्गाच्या रस्त्यावर जमीन देण्यास फक्त 12 गावांचा विरोध आहे. त्यांच्या सोबत चर्चा सुरु आहे.
भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना निर्धारीत भावापेक्षा पाच पट अधिक मोबदला दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी स्वत:हून जमीन देण्यास पुढे येत आहेत. या समृद्धी महामार्गासाठी 5500 कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे 2600 कोटी रुपये जमा आहेत. राज्यातील 14 बँकांनी पैसे उपलब्ध करुन देण्यास होकार दिला आहे. त्यामुळे या महामार्गासाठी कोणतीही आर्थिक अडचण नाही.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री संजय दत्त, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

औरंगाबाद जिल्ह्यातील नियमबाह्य जमीन विक्री प्रकरणी चौकशी -चंद्रकांत पाटील

औरंगाबाद जिल्ह्यातील तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांनी जमिनीची नियमबाह्य विक्री केल्याप्रकरणी प्रधान सचिवांमार्फत चौकशी करु, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सतीश चव्हाण यांनी नियमबाह्य जमिनविक्री संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. पाटील पुढे म्हणाले, वर्ग दोन म्हणून धारण केलेल्या जमिनीचे विक्री परवानगी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असताना तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी एन.आर. शेळके यांनी नियमबाह्य जमीन विक्री केली. या नियमबाह्य जमीन विक्रीबाबत चौकशी केली. या चौकशीत एकूण 104 प्रकरणात दिलेल्या जमीन विक्री परवानग्या ह्या नियमबाह्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्व परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. शेळके यांना निलंबीत करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पुन्हा नव्याने प्रधान सचिवांमार्फत करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अमरसिंह पंडीत, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
००००

भिवंडी-कल्याण-शिळ बायपास रस्त्याचे काम दोन वर्षात पूर्ण करणार -एकनाथ शिंदे
भिवंडी-कल्याण-शिळ या गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम लवकरच सुरु करणार असून ते येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी
सदस्य जगन्नाथ शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले.
शिंदे म्हणाले, या बायपास रस्त्याच्या संदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. या रस्त्याचे काम करीत असतांना वाहतूक कोंडी होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच शिळफाटा ते भिवंडी या रस्त्याच्या लांबीतील नवीन सहा पदरीकरणाच्या कामासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून महामंडळामार्फत निविदा प्रक्रिया सुरु आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य
सर्वश्री संजय दत्त, ॲड. निरंजन डावखरे यांनी भाग घेतला.
००००

पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या बँकेत, पीक विमा पोर्टलवर उपलब्ध - पांडूरंग फुंडकर
पीक विमा योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या बँकेत आणि पीक विमा पोर्टलवर उपलब्ध आहेत, असे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी सदस्य अमरसिंह पंडीत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले.
फुंडकर म्हणाले, खरीप हंगाम 2017 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सर्व माहिती, शेतकऱ्यांचा संपूर्ण तपशील केंद्र शासनाने सुरु केलेल्या पीक विमा पोर्टलवर विमा कंपनी व बँकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच पीक विमा मंजूर झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी विमा कंपनीकडून सॉफ्ट कॉपी स्वरुपात तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात गुगल ड्राईव्ह लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील पीक विमा मंजूर झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या शासकीय कार्यालयात व विमा कंपनीच्या वेब साईटवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असे फुंडकर यांनी शेवटी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
००००

विश्रांतवाडी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून वाहन पासिंगची कामे सुरळीत - दिवाकर रावते
पुणे जिल्ह्यातील विश्रांतवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन पासिंगच्या कामात अधिकाऱ्यांकडून दिरंगाई व कामचुकारपणा होत नसून सर्व कामे सुरळीत पार पाडली जात असल्याचे
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकाऱ्यांकडून पासिंगच्या कामात विलंब होऊन वाहन चालकांना त्रास होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य
अनिल भोसले यांनी विचारला होता. रावते म्हणाले, मोटार वाहन कायदा व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार मोटार वाहन निरीक्षक यांनी शोरुमला भेट देऊन वाहनांची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतरच नोंदणी केली जाते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहन पासिंगसाठी दिलेल्या मुदतीत योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याची कार्यवाही केली जात असल्याचे रावते यांनी शेवटी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget