नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा इतर कामकाज )

आतापर्यंत ४३ लाख १६ हजार ७६८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर

नागपूर, दि. १४ : राज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देत बोगस खातेधारकांना योजनेच्या लाभापासून रोखता यावे आणि त्याची पारदर्शक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या योजनेतून आतापर्यंत ४३ लाख १६ हजार ७६८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे. त्यासाठीचे २० हजार ७३४ कोटी रुपये बँकांना पाठविण्यात आले आहेत. अर्ज केलेल्या उर्वरीत शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करुन त्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल. राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य सर्वश्री डॉ. अनिल बोंडे, सुनिल प्रभू, राजेंद्र पाटणी, हर्षवर्धन जाधव आदींनी नियम २९३ अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, २००८ मध्ये राबविण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या योजनेत ‘कॅग’ने ३९.४३ टक्के प्रकरणांमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आणून दिले. ही अनियमित प्रकरणे सुमारे ४ हजार कोटी
रुपयांची होती. त्यावेळी एकाच कुटुंबांतील अनेक सदस्यांनी लाखो रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ घेतल्याचे दिसले. बँका आणि सहकारी सोसायट्यांनीही त्यावेळी अनियमितता केल्याचे पुढे आले, असे सांगत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, हे सर्व रोखण्यासाठी सध्या राबविल्या जात असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त पूर्णत: पारदर्शक अशा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी जमिनीची मर्यादा ठेवण्यात आली नाही.

या योजनेसाठी सुमारे ७७ लाख ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. दुबार अर्ज केलेले, योजनेसाठी पात्र नसलेले, आयकर भरणारे यातून कमी झाले. उरलेल्या ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यापैकी ४३ लाख १६ हजार ७६८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली असून त्यासाठीचे २० हजार ७३४ कोटी रुपये बँकांना पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा झाले आहेत. यामध्ये विदर्भातील ११ लाख खातेदार शेतकऱ्यांना ५ हजार ७५४ कोटी रुपये, मराठवाड्यातील ११ लाख शेतकऱ्यांना ६ हजार कोटी, उत्तर महाराष्ट्रातील ७ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ७०४ कोटी रुपये आतापर्यंत जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची
कार्यवाही वेगात सुरु असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही कार्यवाही सुरु राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले नाहीत परंतु ते पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांचाही अर्ज भरुन घेऊन कर्जमाफीचा लाभ त्यांना देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

२००८ मधील कर्जमाफी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी २८ महिन्यांचा कालावधी लागला होता. पण त्या तुलनेत चालू कर्जमाफी योजनेची गतीने आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांतील त्रुटी टाळून प्रत्येक पात्र शेतकऱ्यास कर्जमाफीचा लाभ मिळावा. तसेच शासनाच्या प्रत्येक पैशाचा सुयोग्य वापर व्हावा यादृष्टीनेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही पूर्णत: पारदर्शक अशा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget