नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद लक्षवेधी )

मिहान प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करणार - राज्यमंत्री मदन येरावार

नागपूर, दि. 14: मिहान प्रकल्पासंदर्भातील पुनर्वसनाचे सर्व प्रश्न डिसेंबर 2018 पर्यंत सोडविण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

यासंदर्भात आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना येरावार बोलत होते. ते म्हणाले की, मिहान प्रकल्पाला 1 हजार 500 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मिहानअंतर्गत सेझ मध्ये 71 कंपन्यांना जागा देण्यात आली असून त्यापैकी 30 टक्के कंपन्या कार्यरत आहेत. 5 कंपन्यांमध्ये बांधकाम सुरू आहे. उरलेल्या 45 कंपन्यांमध्ये काम सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

उद्योग सुरू करण्यासाठी मुदतवाढ मागितलेल्या कंपन्यांना काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या अटीवर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाने एप्रिल 2016 पासून पुढे 4 वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

ग्रामीण भागातील तेल्हारा, दहेगाव, कलकुही व खापरी (रेल्वे) येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खापरी (रेल्वे) गावाजवळ करण्यात आले असून पुनर्वसन अभिन्यासातील कामे पूर्ण झाली आहेत. शहरी भागातील शिवणगाव, जयताळा, भागरी व चिंचभुवन येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन चिंचभुवन येथील नवीन पुनर्वसित गावठाणाजवळ करण्यात येत असून 1 हजार 99 पात्र प्रकल्पग्रस्तांपैकी 1 हजार 23 प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करण्यात आले आहेत. चिंचभुवन येथील नवीन पुनर्वसित गावठाणातील रस्ते, भूमिगत गटारे, पाणीपुरवठा योजना आदी कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. मिहानमुळे बाधित झालेल्या प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला घर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मिहानमध्ये आतापर्यंत प्रत्यक्ष 10 हजार 500 तर अप्रत्यक्षपणे सुमारे 20 हजार रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला असून
1 हजार 252 कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीला रोजगार, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मिहानच्या सेझमध्ये औषध निर्मिती कंपन्या याव्यात म्हणून प्रयत्न सुरू आहेत. येथील सेवा क्षेत्रातील कार्यालयांना भाडेतत्वावर (लीज) जागा दिली आहे. सेवा क्षेत्रात 2 हजार 500 लोक काम करत आहेत, अशीही माहिती येरावार यांनी सभागृहात दिली.

लक्षवेधीच्या चर्चेत आमदार डॉ. निलम गोऱ्हे, हेमंत टकले, प्रकाश गजभिये यांनी भाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget