नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा प्रश्नोत्तरे )

हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी नवीन दरसूची तयार करणार - प्रा. राम शिंदे
नागपूर, दि. 14 : जलयुक्त शिवार योजनेसाठीच्या कामांकरिता हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नवीन दर सूची जाहीर करण्यात येईल, असे मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात
सांगितले.

राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या प्रस्तावित कामांना तीन वर्षापूर्वीची दरसूची लागू केल्याबाबत सदस्य वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना प्रा. शिंदे म्हणाले की, या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 238 कामे प्रस्तावित असून त्यापैकी 206 कामे पूर्ण झाली आहेत, तर 32 कामे अपूर्ण आहेत. यासाठी आवश्यक तो निधी विशेष निधीच्या माध्यमातून उपलब्ध करुन वेळेत काम पूर्ण करण्याचे
संबधितांना निर्देश देण्यात येतील.

या योजनेंतर्गत सन 2015-16 व 2016-17 या वर्षात 56 हजार 600 टिसीएम पाणीसाठा झाला असून 22 हजार 237 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. कोकण विभागासाठी सन 2016-17 मध्ये 18.93 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. राज्यभरातील कामांसाठी 6 हजार 144 कोटी कर्न्व्हजन निधीतून देण्यात आले असून 3 हजार 139 कोटी रुपये विशेष निधीतून उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये 57.99 कोटी रुपये कोकणसाठी विशेष निधीतून देण्यात आले आहे.

मृद व जलसंधारण विभाग निर्माण केल्यानंतर 2013 ची दरसूची तात्पूरत्या स्वरुपात लागू केली होती. हे अधिवेशन संपण्यापूर्वी नवीन दरसूची जाहीर करण्यात येईल, असेही प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, सुरेश गोरे, हर्षवर्धन सपकाळ, शंभुराज देसाई यांनी भाग घेतला.

000

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर व शाहू महाराज संग्रहालयाच्या पर्यटन विकास आराखड्यास मान्यता - चंद्रकांत पाटील यांची माहिती 


कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीराचा 78 कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा मान्य झाला असून शाहू महाराज संग्रहालयासाठी 13 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून या दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास केला जाईल, असे कोल्हापूरचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. 

सदस्य शशिकांत शिंदे यांनी पुणे, कोल्हापूर व यवतमाळ येथील 10 पर्यटन स्थळांचा विकास करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी एका उपप्रश्नाला उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते. त्यांनी सांगितले
की, महालक्ष्मी मंदीर परिसराच्या 78 कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी उपप्रश्नाला उत्तर देताना पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले की, राज्याच्या पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येक जिल्ह्याला पर्यटन विकास आराखडा करण्यास सांगितले
आहे. त्यापैकी 23 जिल्ह्यांनी आराखडे सादर केले असून अंतिम छाननी नंतर ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. सध्या 12 जिल्ह्यांच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये यवतमाळ येथील 18 पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 65 कोटी, पुणे जिल्ह्यातील 101 पर्यटन
स्थळांच्या विकासासाठी 237 कोटी तर कोल्हापूर जिल्ह्यातील 148 पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 246 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे. राज्यातील आठ मोठ्या पर्यटन विकास आराखड्यास मान्यता देखील देण्यात आली आहे.

000

कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय- आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत 

राज्यात कुष्ठरोग शोध मोहीम 2 वर्षापासून सुरु असून त्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात 252 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर औषधोपचार करुन त्यांना रोगमुक्त करण्यात आले आहे. कुष्ठरुग्णांची सेवा
करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

राज्यात राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग शोधमोहिमेबाबत सदस्य प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते.

राज्यातील 22 जिल्ह्यात 6 ते 21 सप्टेंबर 2017 दरम्यान कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 659 संशयित रुग्णांची नोंदणी झाली. त्यांची तपासणी केली
असता 66 जणांना कुष्ठरोग झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

राज्यात ग्रामीण व उप जिल्हा रुग्णालय स्तरावर 219 कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र आहे. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात 15, रायगड 15, पालघर 12 अशी संदर्भ सेवा केंद्र आहेत.

राज्यात कुष्ठरुग्णांच्या सेवा करणाऱ्या 29 स्वयंसेवी संस्था काम करत असून त्यांच्या अनुदानात वाढ करण्याबात सकारात्मक निर्णय घेऊ. वर्धा जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेबरोबरच हत्ती पाय रोग शोध मोहिम हाती घेऊ, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनिल केदार, समीर कुणावार, संजय केळकर, मिलिंद माने यांनी भाग घेतला.
000

रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेत 81 बोगस डॉक्टर आढळले 20 डॉक्टरांवर गुन्हे दाखल -आरोग्यमंत्र्यांची माहिती


राज्यभरातील सर्व रुग्णालयांच्या तपासणीची धडक मोहीम 15 मार्च ते 31 मे 2017 या कालावधीत राबविण्यात आली. त्यामध्ये 37 हजार 68 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. पैकी 6742 रुग्णालयांमध्ये कायद्यातील
तरतूदीनुसार त्रुटी आढळून आल्या आहेत. या तपासणीमध्ये 81 बोगस डॉक्टर आढळून आले असून त्यापैकी 20 डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

विधानसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी राज्यातील रुग्णालयांच्या तपासणी मोहिमेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे की, 37 हजार 68 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 6742 रुग्णालयांमध्ये कायदेशीर त्रुटी आढळून आल्या. 2084 वैद्यकीय संस्थांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण कायद्याचे पालन न केल्याचे आढळून आले आहे. या मोहिमेत पथकाने केलेल्या तपासणीत 81 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यापैकी 20 डॉक्टरांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पथकाने तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीसमोर मांडल्या आहेत.

या मोहिमेंतर्गत 169 वैद्यकीय संस्थांना दंड करण्यात आला आहे. 27 दवाखाने बंद करण्यात आले आहेत. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 चे उल्लंघन झाल्याचे आढळून आले असून त्यामुळे चार केंद्र बंद करण्यात आले आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पाच सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget