नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद प्रश्नोत्तरे )

मराठा आरक्षणासाठी शासनाची भूमिका सकारात्मक- चंद्रकांत पाटील

नागपूर, दि. 15 : मराठा समाजाला आरक्षण आणि अन्य सुविधा देण्याच्या संदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक असून त्यासाठी अनेक योजना शासनाने सुरु केल्या आहेत. असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मराठा आरक्षण संदर्भात सदस्य शरद रणपीसे यांनी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देतांना पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा न्यायप्रविष्ठ असून मागासवर्गीय आयोग वेगाने काम करीत आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 36 जिल्ह्यात वसतिगृह सुरु करण्यासाठी शासन स्तरावर वेगाने कार्यवाही सुरु असून अनेक संस्थांना जागा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठा
समाजातील युवकांना उद्योग सुरु करण्यासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज देण्याची सोय केलेली आहे. तसेच कर्ज प्रकरणे सुलभरित्या मार्गी लागण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी
कार्यालयात एका शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. तर सारथी या संस्थेमार्फत डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या परंपरा आणि चालीरितीचा अभ्यास सुरु आहे. दर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि विविध निर्णयावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक नियमित होत आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, भाई जगताप, संजय दत्त, नरेंद्र पाटील आदिंनी भाग घेतला.
००००
वीज वाहिन्या भुमिगत करण्यासाठी कार्यवाही सुरु - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. 15 : वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आणि सुरक्षेचे अत्याधुनिक उपाय करण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य डॉ.अपूर्व हिरे यांनी वीज मंडळाच्या अत्याधुनिकीकरण आणि वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. बावनकुळे म्हणाले, नाशिक येथे इंदिरानगर भागात विजेच्या खांबावर काम करत
असताना अचानक विद्युत पुरवठा सुरु झाल्याने समीर वाघ या कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यु झाला. या मृत्युनंतर धोकादायक वीज वाहिन्या ज्या ठिकाणी आहेत त्या भूमिगत करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच समीर वाघ यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही देण्यात आली असून कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार आहे. शेतामध्ये अथवा गावात विद्युत तारेला स्पर्श होऊन जर एखाद्याचा मृत्यु झाला तर त्या व्यक्तिच्या कुटुंबियास तातडीने चार लाख रुपये देण्यात येतात. जर एखादा व्यक्ती जखमी झाला तर त्याचा वैद्यकीय
खर्च वीज मंडळामार्फत केला जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने टप्प्या टप्प्याने अत्याधुनिकीकरण करीत असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अमरसिंह पंडीत यांनी भाग घेतला.
००००

जिल्हा सहकारी बँकांमधून ठेवीदारांचे पैसे देण्यास सुरुवात- सुभाष देशमुख 

नागपूर, दि. 15 : शासनाने कर्जमाफीचे पैसे जिल्हा सहकारी बँकेत जमा केल्याने या बँका आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून खातेदारांच्या ठेवीची रक्कम परत करण्यास सुरुवात झाली आहे, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

सदस्य प्रा.अनिल सोले यांनी नागपूर, वर्धा व बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी बँकेतील खातेदारांना ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याबाबतचा प्रश्न विचारला होता.

देशमुख म्हणाले, नागपूर, वर्धा व बुलढाणा सहकारी बँकेला या पूर्वीच शासनाने आर्थिक मदत केली आहे. या बँकात ज्या शेतकरी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी ठेवी ठेवल्या आहेत त्या त्यांना परत करण्याची
कार्यवाही बँकांनी सुरु केली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य नागो गाणार यांनी सहभाग घेतला.
००००

जेट ऐअरवेज को.ऑप.क्रेडीट सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी सुरु- सुभाष देशमुख

नागपूर, दि. 15 : मुंबई जेट एअरवेज को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.मधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सनदी लेखा परिक्षकाची नियुक्ती केली असून येत्या सहा महिन्यात अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधितांवर कार्यवाही
करण्यात येईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य किरण पावसकर यांनी जेट ऐअरवेज को.ऑ. क्रेडीट सोसायटी मधील गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. देशमुख म्हणाले महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सनदी लेखापरीक्षक शिवाजी शिंदे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget