नागपूर हिवाळी अधिवेशन (विधानसभा प्रश्नोत्तरे )

परतवाड्याच्या वसतिगृहासाठी जागेचे हस्तांतरण वास्तूमांडणी आराखडा प्राप्तीनंतर करण्यात येईल - दिलीप कांबळे

नागपूर ( 13 डिसेंबर ) : परतवाडा जिल्हा अमरावती येथे आदिवासी वसतिगृह बांधण्यासाठी जागेचे हस्तांतरण करण्यासंदर्भात आदिवासी विकास विभागाला एकत्रित वास्तूमांडणी आराखडा सादर करण्याबाबत आदिवासी विभागाला कळविण्यात आले आहे. आराखडा प्राप्त झाल्यानंतर तातडीने मंजूरी दिली जाईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य बच्चू कडू यांनी परतवाडा ता. अचलपूर येथे आदिवासी वसतिगृह बांधण्यासाठी जागेचे हस्तांतरण करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केले होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, आदिवासी
विभागाकडून वसतिगृह मागणीचा प्रस्ताव सादर करणे तसेच सामाजिक न्याय व आदिवासी विभाग या दोन्ही वसतिगृहांच्या एकत्रित वास्तूमांडणी आराखडा सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तो प्राप्त होताच त्याचे अवलोकन करुन जागा हस्तांतरीत करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

000

कर्जत तालुक्यात आदिवासी विकास महामंडळातर्फे दोन ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरु - आदिवासी विकास मंत्री
रायगड जिह्यातील कर्जत तालुक्यात कशीळे व पाथरज येथे आदिवासी महामंडळातर्फे भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

या संदर्भात सदस्य सर्वश्री प्रशांत ठाकूर, समीर कुणावार, ॲङ आशिष शेलार, अतुल भातखळकर, श्रीमती मनिषा चौधरी, अमित साटम यांनी रायगड जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातर्फे भात खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत प्रश्न विचारला होता त्याला लेखी उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री यांनी म्हटले आहे की, कर्जत तालुका आदिवासी उपयोजना क्षेत्रात येतो, या तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आदिवासी विविध कार्यकारी संस्था कशेळे व खांडस यांच्यामार्फत खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. 28 नोव्हेंबर, 2017 पासून कर्जत तालुक्यात ही केंद्र सुरु करण्यात आली आहे.

000

अमरावती जिल्ह्यातील 38 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोयाबीन अनुदानाची रक्कम जमा - पणन मंत्री सुभाष देशमुख


अमरावती जिल्ह्यातील 38,791 लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानापोटी 12 कोटी 16 लाख 97 हजार 520 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

सदस्य सर्वश्री विरेंद्र जगताप व ॲड श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन अनुदानाची रक्कम थकीत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना पणन मंत्र्यांनी म्हटले आहे की, हंगाम 2016-17 मध्ये अनुकुल हवामान व समाधानकारक पावसामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ झाली होती. बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढल्याने बाजारभाव कमी झाले होते. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी 200 रु. प्र.क्विंटल व कमाल 25 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अमरावतीतील जिल्ह्यातील 38,791 पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

000

राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानातील 64 प्रस्तावांना पूर्ण अनुदान - कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर

राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान योजनेतील 111 प्रस्तावांना पूर्व संमती देण्यात आली असून त्यापैकी 64 प्रस्तावांना पूर्ण अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित 47 प्रस्तावांचे अंशत अनुदान प्रलंबित असून त्यांना नवीन योजनेनुसार अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील उद्योगाला चालना मिळणार असल्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान पंचवार्षिक योजना बंद केल्याने मराठवाड्यातील उद्योजकांचे नुकसान झाल्याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य कुणाल पाटील, डी.पी.सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना कृषी मंत्री यांनी म्हटले आहे की, या योजनेच्या निकषांन्वये 111 प्रस्तावांना पूर्व संमती देण्यात आली, पैकी 64 प्रस्तावांना पूर्ण अनुदान देण्यात आले. उर्वरित 47 प्रस्तावांचे अंशत अनुदान प्रलंबित असून नवीन योजनेनुसार त्यांना अनुदान देण्यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget