नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा लक्षवेधी )

मुंबई केईएम रुग्णालयात फ्रॅक्सीनेशन सेंटर प्रस्तावित-
आरोग्यमंत्र्यांची माहिती

नागपूर, दि. 14 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रक्तातील प्लाझमा विलगीकरणासाठी फ्रॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याचे विचाराधीन असून, मुंबई येथील केईएम रुग्णालयात फ्रॅक्सीनेशन सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहे. कालबाह्यतेमुळे रक्त वाया जाण्याचे प्रमाण एकूण रक्त संकलनाच्या 1.80 टक्के एवढे आहे. रक्ताच्या विहित दरापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या 72 रक्त पेढ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात 328 परवानाधारक व नोंदणीकृत रक्तपेढ्या आहेत. त्यांच्या माध्यमातून सन 2016 मध्ये 15.70 लाख युनिट रक्त संकलित करण्यात आले होते. राज्याला 11.23 लाख युनिट रक्ताची गरज आहे. रक्त वाया जाण्याची वेगवेगळी कारणे आहेत. देशात 1.8 टक्के एकूण रक्त वाया जाण्याचे प्रमाण असून, राज्याचे हे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी आहे.

परवानाधारक 328 रक्तपेढ्या यांच्या माध्यमातून रक्त संकलन केले जाते. त्यामध्ये ए-निगेटिव्ह, एबी-निगेटिव्ह आणि ओ-निगेटिव्ह या रक्त गटाचे संकलन गरजेप्रमाणे केले जाते. रक्त संकलन करणाऱ्या संस्था आणि वारंवार रक्तदान करणारे रक्तदाते यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनस्तरावर योजना सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील रक्तपेढ्यांना आरोग्य विभागामार्फत ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते. मात्र त्यांना परवाना देण्याचा अधिकार अन्न व औषधे प्रशासन विभागाकडे आहे. 

विहित दरापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या 72 रक्तपेढ्यांवर कारवाई येत्या 3 महिन्यात करण्यात येणार असून त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला कळविण्यात येईल. रक्तातील प्लाझमा विलगीकरण करुन रक्त वाया
जाऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फ्रॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याचे विचाराधीन आहे. मुंबई येथील केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीत फ्रॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याचे प्रस्तावित केले असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी
सांगितले.

राज्यात केंद्र शासनाचा क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट राज्यात लागू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासंदर्भात नियोजन विभागाकडे अभिप्रायार्थ फाईल पाठविण्यात आली आहे. त्यानंतर हा कायदा लागू
करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, सुभाष साबणे, शशिकांत शिंदे, मंगलप्रभात लोढा यांनी भाग घेतला. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget