नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा लक्षवेधी सूचना )

ठाणे शहर परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार -डॉ. रणजित पाटील
नागपूर, दि. 21 : ठाणे शहरातील तसेच ठाणे-बेलापूर रस्ता कळवा, मुंब्रा व घोडबंदर परिसरातील वाहतूक सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात
प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय आठवड्याभरात घेऊ, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले की, मुंबई प्राधिकरण क्षेत्रातून लाखो नागरिक कामानिमित्त येत असतात. मुंबईतील नागरी
सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा विस्तार मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वसई, विरार, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली, कल्याण व डोंबिवली क्षेत्रामध्ये करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
 
मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्याकरिता विटावा ते कोपरी दरम्यान खाडी पूलाची उभारणी करणे आहे कळवा ते आत्माराम पाटील चौक दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करणे. या संबंधीचे प्रस्ताव मुंबई
महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त झाले आहेत. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या स्तरावर तपासण्यात येत आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, संदीप नाईक यांनी भाग घेतला.

00000

मालाड पूर्व परिसरात महापालिकेमार्फत डायलिसिस केंद्रासाठी निधी उपलब्ध करुन देणार - डॉ. रणजित पाटील

मालाड पूर्व परिसरात मुंबई महापालिकेच्या पाच दवाखान्यांमार्फत आरोग्य सेवा पुरविल्या जाते. या भागात चार डायलिसिस केंद्र असून महापालिकेमार्फत डायलिसिस सुविधा सुरु करण्यासाठी दोन महिन्यात निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. 

सदस्य सुनिल प्रभू यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले की, मालाड दिंडोशी परिसरात खासगी संस्थांमार्फत तीन डायलिसिस केंद्र व म.वा.देसाई महापालिका रुग्णालयामार्फत एक असे एकूण चार डायलिसिस केंद्र सुरु आहेत. तथापी मालाड पूर्व विभागात महापालिकेमार्फत डायलिसिसकरिता सुविधा उपलब्ध नाही. त्यासाठी दोन महिन्यांमध्ये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य योगेश सागर यांनी भाग घेतला.

000

वाळू, मुरुमाचे पट्टे शासकीय कामांसाठी राखीव ठेवणार -महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
राज्यात शासकीय प्रकल्पांच्या बांधकामांकरिता लागणाऱ्या वाळू, मुरुम यासाठीचे लिलाव पट्टे राखीव ठेवण्यात येतील. त्यानंतर अन्य पट्टयांचा लिलाव केला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज
विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. सदस्य सुनिल केदार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले की, नागपूर जिल्ह्यात गौण खनिजाच्या स्वामित्त धनापोटी एप्रिल ते 15 डिसेंबर, 2017 पर्यंत 64.77 कोटी रुपये तसेच गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीच्या 590 प्रकरणात एक कोटी 15 लाख दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. शासकीय कामांसाठी गौण खनिजांना
प्राधान्य देण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात तात्पूरते 24 परवाने जे देण्यात आले आहेत त्याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत आठ दिवसात चौकशी केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाग घेतला.

000

ओखी वादळामुळे नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरु - मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील
ओखी वादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून त्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येईल. यासंदर्भात कोकण विभागातल्या आमदारांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य सुभाष पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले की, ओखी चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात 16.72 मि.मी. अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 हेक्टरवरील आंबा व काजू पिकांचा मोहोर गळून पडला आहे. त्याचबरोबर पेरणी झालेल्या कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे सुरु आहेत.

या वादळाची सूचना मिळाल्यानंतर समुद्रात गेलेल्या 2600 बोटी परत आणण्यास यश आले आहे. तर अन्य राज्यातील 389 बोटी राज्याच्या किनाऱ्याला आल्या होत्या. त्यातील खलाशांच्या राहण्याची-जेवणाची तसेच
वैद्यकीय उपचाराची सोय करण्यात आली आहे. ज्या बोटींचे अंशत: नुकसान झाले आहे त्यांना चार हजार रुपये, पुर्णत: नुकसान झालेल्या बोटींना 9,600 रुपये, मच्छीमार जाळीचे अंशत: नुकसान झाल्यास 2,100 रुपये, पुर्णत: नुकसान झाल्यास 2,600 रुपये तर फळबाग नुकसानीसाठी 18,000 हेक्टरी मदत देण्यात येणार आहे. सध्या पंचनामे सुरु असून त्यानंतर नुकसान भरपाई अदा केली जाईल.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान एका उपप्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले की, सीआरझेड 50 मिटरपर्यंत ठेवावे असा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला आठ दिवसात
पाठविण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, अशोक पाटील यांनी भाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget