नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा प्रश्नोत्तरे )

हाफकिन महामंडळ फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार - गिरीश बापट
नागपूर, दि. 18 : पोलिओ लस निर्मितीच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रेसर असलेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी अधिकचा निधी देऊन जागतिक स्तरावर क्रमांक एकची कंपनी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी हाफकिन महामंडळात पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना बापट म्हणाले की, पोलिओ निर्मूलनासाठी लस निर्मितीच्या
कामात हाफकिनचे मोठे कार्य आहे. पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेत तांत्रिक मुद्यांची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमण्यात आली असून तीन महिन्यात या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी भाग घेतला.
000

द्वारपोच धान्य योजनेसाठी 29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट

राज्याच्या 29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करुन द्वारपोच धान्य योजना सुरु आहे. वाई येथे खासगी गोदामात सार्वजनिक वितरणाचे धान्य छापा टाकून जप्त केल्या प्रकरणाची पोलिस उपायुक्त
दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

वाई, जिल्हा सातारा येथे अवैध विक्रीकरिता पाठविण्यात येत असलेले धान्य जप्त केल्याबाबत सदस्य शंभूराजे देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बापट म्हणाले की, वाई येथील
औद्योगिक विकास महामंडळालगतच्या खासगी जागेतील पत्र्यांच्या शेडमधून 9 हजार 300 किलो गहू व 2 हजार 150 किलो तांदूळ असा माल संयुक्त कारवाईत पकडण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

शिधापत्रिकांना आधार जोडणीच्या कामात सातारा जिल्हा पूढे आहे, असे सांगत बापट पुढे म्हणाले की 29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस यंत्रणेचा वापर करीत धान्य पुरवठा केला जात आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, अजित पवार, भिमराव धोंडे यांनी भाग घेतला.
000

राज्यातील 23 पाणीपुरवठा योजनांसाठी 15 दिवसात कार्यारंभ आदेश देणार - बबनराव लोणीकर


राज्यातील 23 पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, 15 दिवसात त्यासाठी कार्यारंभ आदेश देऊन त्याचे काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मुक्ताईनगर-बोदवड-वरणगाव परिसरातील 81 गावांची पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत सदस्य एकनाथ खडसे यांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना लोणीकर म्हणाले की, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील 51 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रस्तावास 5 डिसेंबर, 2017 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी कार्यारंभ आदेश आठ दिवसात देण्यात येतील. भुसावळ तालुक्यातील 31 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकरिता 15 दिवसात कार्यारंभ देऊन दोन्ही योजना
लवकरात लवकर सुरु करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात विलंब का झाला याची चौकशी अपर मुख्य सचिव पाणीपुरवठा विभाग यांच्यामार्फत केली जाईल, असेही लोणीकर यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार यांनी भाग घेतला.
000

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत राज्यात एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त -गिरीश बापट

राज्यात छूप्या मार्गाने विक्रीस उपलब्ध होत असलेल्या गुटख्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. राज्यात केलेल्या कारवाईत आतापर्यंत एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

यासंदर्भात डॉ. संतोष टारफे, निर्मला गावीत, कुणाल पाटील, अमिन पटेल, डी. पी. सावंत, मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य सदस्यांनी मुंबईसह राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात बापट यांनी म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी यासंदर्भात कारवाई केली जाते.

सी.बी.कंट्रोल आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली असून, दि. 3 ऑक्टोबर, 2017 रोजी 28 लाख 87 हजार 150 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर 4 ऑक्टोबर व 10 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत अनुक्रमे 12 लाख 65 हजार आणि 9 लाख 31 हजार 460 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या लातूर कार्यालयाने 27 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत 42 लाख 12 हजारांचा प्रतिबंधीत अन्नसाठा जप्त केला आहे. मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे 10 लाख रुपये किंमतीचा परराज्यातून विक्रीस येणारा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे सुमारे एक कोटी दोन लाख 96 हजार 210 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

000

हाफकिनचे जळगांव युनिट बंद करणार नाही - गिरीश बापट

जळगांव येथील हाफकिनचे युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

सदस्य सर्वश्री डॉ. सतीश पाटील, राहूल जगताप, प्रदीप नाईक आदींनी जळगांव येथील हाफकिन युनिट बंद करण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात बापट यांनी
म्हटले आहे की, हाफकिन महामंडळाचे सहयोगी कंपनी असलेल्या हाफकिन अजिंठा फार्मा लिमिटेड, जि. जळगांव युनिटमध्ये केवळ क्षार संजीवनी, प्रतिजैवके, ज्वरनाशकाची औषधे, क्षयरोग औषधे, पोटदुखी व ॲलर्जीवरील औषधे यांचे उत्पादन करण्यात येते. या युनिटमध्ये पोलिओची लस अथवा इंजेक्शनचे उत्पादन
केले जात नाही. हाफकिन व्यवस्थापकीय संचालक मंडळाकडून हाफकिनचे जळगांव येथील युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.
000
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget